श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे कपडे धुण्याची सेवा करतांना विविध प्रसंगांत कु. गुलाबी धुरी यांनी ठेवलेला भाव आणि त्यांना आलेल्या अनुभूती

‘रामनाथी आश्रमात काही दिवस मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे कपडे धुण्याची सेवा मिळाली. ही सेवा करत असतांना मी विविध प्रसंगांत ठेवलेला भाव आणि मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

कु. गुलाबी धुरी

१. विविध प्रसंगांत ठेवलेला भाव

१ अ. सेवा स्वीकारतांना

१. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंचे कपडे, म्हणजे चैतन्याची खाण आहे’, असे वाटून माझा भाव जागृत व्हायचा. एकदा सेवा देणार्‍या साधिकेने मला विचारले, ‘‘तुला कपडे धुवायला वेळ आहे का ?’’ त्या वेळी ‘देव मला विचारत आहे, ‘मी तुला आशीर्वाद द्यायला आलो आहे. तुला आशीर्वाद घ्यायला वेळ आहे का ?’, असे मनात येऊन मला कृतज्ञता वाटली.

२. काही वेळा कपडे अधिक असल्यास सहसाधिका मला विचारायची, ‘‘आज कपडे अधिक आहेत. तुला ते धुवायला जमतील ना ? तू थोडे कपडे धुतलेस, तरी चालेल !’’ तेव्हा मला वाटले, ‘या सेवेच्या माध्यमातून देव मला भरभरून चैतन्य देत आहे, तर मी थोडेच चैतन्य का घेऊ ?’ उलट अधिक कपडे धुवायचे असल्यामुळे मला चैतन्यही अधिक मिळणार आहे आणि माझी क्षमताही वाढणार आहे.’

१ आ. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंचे कपडे म्हणजे देवीचेच कपडे आहेत’, असा भाव ठेवल्यावर

१. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंचे कपडे, म्हणजे साक्षात् श्री विद्याचौडेश्वरीदेवीचीच वस्त्रे आहेत’, असा भाव ठेवल्यावर मला देवीचे अस्तित्व अनुभवायला मिळाले.

२. ‘ही वस्त्रे माझी कुलदेवता श्री सातेरीदेवी हिचीच आहेत. मी तिच्या मंदिरात जाऊन तिची प्रत्यक्ष सेवा करू शकत नाही; म्हणून देवाने मला ही सेवा दिली आहे’, असे वाटून मला कृतज्ञता वाटली.

१ इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या कपड्यांच्या रंगांवरून ठेवलेला भाव

१ इ १. निळा रंग : ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंचे निळ्या रंगाचे कपडे माझ्यामध्ये भक्ती जागृत करत आहेत. या भक्तीने मला गुरूंचे मन जिंकायचे आहे’, असा भाव ठेवल्यावर मला सेवा करतांना उत्साह यायचा.

१ इ २. पिवळा रंग : ‘हे कपडे माझ्यात चैतन्य निर्माण करत आहेत. माझ्यातील सात्त्विकता वाढण्यासाठी देवाने मला हे कपडे धुवायला दिले आहेत.’

१ इ ३. हिरवा रंग : ‘हे कपडे मला अनेक गुणांनी समृद्ध बनवणार आहेत. माझ्यातील गुणांची वृद्धी करणार आहेत. मला ही सेवा परिपूर्ण रीतीने करायची आहे’, असा भाव ठेवल्यावर सेवा परिपूर्ण होण्याकडे माझे लक्ष असायचे.

१ इ ४. ‘पांढर्‍या रंगाचे कपडे मला साधनेत स्थिर करत आहेत’, असे वाटायचे.

१ इ ५. ‘केशरी आणि लाल रंग : ‘हे कपडे माझ्यातील लढाऊ वृत्ती वाढवत आहेत. सेवा करण्यासाठी बळ देत आहेत’, असे मला वाटायचे.

अशा प्रकारे वेगवेगळा भाव ठेवून सेवा करतांना मला पुष्कळ आनंद मिळत असे.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे कपडे धुण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

२ अ. ‘कपडे धुतलेले पाणी म्हणजे गंगामातेचे तीर्थ आहे’, असा भाव ठेवून ते पाणी स्वतःला लावल्यावर ‘त्रासदायक आवरण नष्ट होत आहे’, असे साधिकेला जाणवणे आणि अन्य साधिकांनी ते पाणी पाहिल्यावर त्यांचा भाव जागृत होणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या कपड्यांमध्ये चैतन्य असून ‘त्या कपड्यांतील पाणी म्हणजे गंगामातेचे तीर्थ आहे’, असा मी भाव ठेवायचे. ते पाणी मी हातात घेऊन माझ्या चेहर्‍याला आणि हाता-पायांना लावायचे. त्या वेळी ‘माझ्यावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होत आहे’, असे मला जाणवत असे. मी कपडे धूत असतांना तेथे असणार्‍या साधिका मला विचारायच्या, ‘‘तू कुणाचे कपडे धूत आहेस ?’’ मी त्यांना सांगायचे, ‘‘हे देवीचे कपडे आहेत आणि देवीच्या वस्त्रांनी भारित झालेले हे पाणी म्हणजे तीर्थ आहे.’’ मी ते पाणी हातात घेऊन त्यांना दाखवायचे. तेव्हा त्यांचाही भाव जागृत होऊन त्या पाण्याला स्पर्श करायच्या.

२ आ. नकारात्मक विचार नष्ट होणे : कपडे धुवून झाल्यानंतर माझ्या मनातील नकारात्मक विचार नष्ट होऊन सकारात्मक विचार यायचे. माझ्या मनाला आलेली मरगळ नष्ट व्हायची. मला उत्साह यायचा आणि पुढील सेवा करायला आध्यात्मिक ऊर्जा मिळायची.

२ इ. कपडे धुतांना मला सुगंधाची अनुभूती आली.

‘संतांचे कपडे धुण्याच्या सेवेतून देव कशी साधना करवून घेतो ?’, हे मला शिकता आले आणि मला कृतज्ञताभावात रहाता येऊ लागले.

देवानेच मला हे सर्व सुचवले आणि अनुभवायला दिले, यासाठी श्री गुरुचरणी कृतज्ञता !’

– कु. गुलाबी धुरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक