पणजी, ५ डिसेंबर (वार्ता.) : गोव्यात १८ ते ४९ वर्षे वयोगटातील २० टक्के महिला घरगुती हिंसाचाराच्या बळी बनल्या आहेत, तर ४ टक्के महिला लैंगिक अत्याचाराला सामोर्या गेल्या आहेत, अशी माहिती वर्ष २०१९ ते २०२१ साठीच्या ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणा’त दिली आहे.
याविषयी अधिक माहिती देतांना ‘अन्याय रहित जिंदगी’ या अशासकीय संस्थेचे संचालक अरुण पांडे म्हणाले, ‘‘सरकारने आता घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी पूर्णवेळ संरक्षण अधिकारी नेमणे आणि प्रत्येक तालुक्यात पीडितांच्या समस्यांच्या निवारणार्थ केंद्रे खुली करणे, ही काळाची आवश्यकता आहे. घरगुती हिंसा प्रकरणात पीडितेला अपेक्षित सहकार्य मिळत नाही आणि यामुळे पीडित आणि त्यांचे कुटुंब यांच्यावर सामाजिक, मानसिक, आर्थिक आदी सर्वच दृष्टीकोनातून परिणाम होतो. याचा घरातील पुढील पिढीवरही विपरीत परिणाम होत असतो.