स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे थोरले बाजीराव पेशवे !

वर्ष १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी इहलोक सोडल्यानंतर औरंगजेब प्रचंड दळभार घेऊन दख्खन काबीज करण्याच्या इच्छेने औरंगाबादेत दाखल झाला. त्याने जंग जंग पछाडले आणि महाराजांनी उभे केलेले स्वराज्य जवळ जवळ बुडवत आणले; पण मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली आणि पराक्रम करत राहिले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांच्या छत्राखाली पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी स्वराज्याची घडी परत बसवासला प्रारंभ केला. पहिले (थोरले) बाजीराव पेशवे यांनी अवघ्या २० व्या वर्षी पेशवेपद स्वीकारले आणि आपल्या मुत्सद्दीपणाने अन् मर्दुमकीने स्वराज्याच्या विस्ताराचा धडाका लावला.

७०० वर्षांनंतर प्रथमच मराठ्यांच्या फौजा उत्तरेकडे झेपावल्या आणि दिल्लीपार धडकल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची निर्मिती केली, तर थोरल्या बाजीराव पेशव्यांनी स्वराज्याला आक्रमकांच्या विध्वंसापासून वाचवले आणि त्याचे साम्राज्यात रूपांतर केले.

कु. जयेश कापशीकर

थोरल्या बाजीरावांची अद्वितीय पालखेडची लढाई !

बाजीरावांचे प्रमुख शस्त्र हे त्यांचे घोडदळ होते. अत्यंत वेगाने केलेल्या हालचालींमुळे ते सहज शत्रूला कोंडीत पकडायचे. बाजीरावांच्या सेनेत इतर अवजड तोफा आणि अन्य सामान नसायचे. तत्कालीन इतर सेनांशी तुलना केल्यास असे आढळते की, शत्रूसेना प्रतिदिन साधारण २० ते २५ किलोमीटरची, तर बाजीराव प्रतिदिन अनुमाने १०० किलोमीटर, म्हणजे चौपट वेगाने मजल मारत. यामुळे बाजीराव आणि त्यांचे सैन्य नेमके कुठे आहे अन् पुढील काही दिवसांत कुठे पोचेल ? याचे नेमके अनुमान कुणालाही करता येत नसे.

याचे उत्तम उदाहरण, म्हणजे पालखेडची लढाई. वर्ष १७२७ मध्ये जेव्हा मुख्य फौजा कर्नाटकात अडकल्या आहेत, हे पाहून निजामाने मराठ्यांच्या विरोधात हालचाली चालू केल्या. ‘बाजीराव आला’, हे कळताच बाजीरावांनी आपल्या घोडदळाच्या एका मोठ्या तुकडीसह निजामाच्या प्रदेशावर औरंगाबादच्या दिशेने चढाई करून जालनापर्यंतच्या मुलुखाचा विध्वंस केला आणि अपेक्षेप्रमाणे निजामाने चिडून त्याच्या सेनेसह बाजीरावाचा पाठलाग चालू केला. इथून पुढे बाजीरावाने इतक्या हुलकावण्या दिल्या आणि इतका विध्वंस केला की, निजाम त्रस्त झाला. त्याला नेमके कळेना की, बाजीराव कुठे आहे ? निजामाचा सुरतेपर्यंतचा मुलुख बाजीरावाने लुटला. तिकडे निजाम आणखी त्रस्त झाल्याने त्याने बाजीरावांचा पाठलाग सोडून स्वतःचा मोर्चा पुण्याकडे वळवला. निजाम पुण्याजवळ येताच, त्याला खबर मिळाली की, बाजीराव औरंगाबादच्या दिशेने गेला. औरंगाबाद वाचवण्यासाठी निजामाने नगरला तोफा, साहित्य आणि थोडी सेना ठेवून कासारबाडी खिंडीकडे लगाम खेचला. त्याने गोदावरी ओलांडली आणि मागून त्याला सरदार होळकर यांनी घेरले. पुढे जाऊन बघतो, तर बाजीराव पालखेडला तळ ठोकून होते. तो चहूबाजूंनी घेरला. निजामाची पाचावर धारण बसली आणि तो शरण आला.

पालखेडच्या लढाईत थोरल्या बाजीरावांनी वापरलेली क्लृप्ती

थोरल्या बाजीरावांनी परिस्थिती स्वतःला अनुकूल असेपर्यंत निजामाशी सरळ लढाई केलीच नाही. त्याने स्वतःला हवा होता, तसा शत्रू बनवला, म्हणजेच दमलेला, कमी सेना असलेला, तोफखाना नसलेला ! प्रारंभीला स्वतःकडे असलेली केवळ १५ सहस्रांची फौज ऐनवेळी त्यांनी ४० ते ५० सहस्रांपर्यंत नेली. या संपूर्ण काळात बाजीरावाने ६ मासांत ३ सहस्र २०० किलोमीटरहून अधिक घोडदौड केली. मराठी सैन्याला लढाई न करता आणि सैन्याची काहीही हानी न होता युद्ध सामुग्रीचा किरकोळ वापर करून स्वराज्यावर आलेल्या प्राणांतिक संकटातून केवळ सुखरूप सुटकाच नाही, तर निजामासारख्या मातब्बर राजाला बाजीरावाने धूळ चारली. पालखेडच्या लढाईवरून अनेक देशांतील सैन्य अधिकार्‍यांना युद्धनीतीचे शिक्षण दिले जाते. यामुळेच थोरले बाजीराव पेशवे यांना ‘स्वराज्य साम्राज्यक’ म्हटले जाते.

– कु. जयेश कापशीकर (वय १६ वर्ष), पुणे. (३.१२.२०२३)