पुणे येथील सनातनच्या ११० व्या संत पू. (श्रीमती) उषा मधुसूदन कुलकर्णी यांचा आज कार्तिक कृष्ण सप्तमी (४ डिसेंबर २०२३) या दिवशी ८२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आपण त्यांचा साधनाप्रवास पाहूया.
‘पू. श्रीमती उषा कुलकर्णीआजी लहानपणी एकत्र कुटुंबात रहात असल्याने त्यांना लहानपणापासूनच ‘सर्वांशी जुळवून घेणे आणि समाधानी रहाणे’ याचे बाळकडू मिळाले. त्या भावंडांत मोठ्या असल्यामुळे त्यांच्यात लहानपणापासूनच सहनशीलता हा गुण आहे. त्यांना त्यांच्या वडिलांमुळे एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथील विठ्ठलमंदिराच्या गाभार्यात जाण्याचे भाग्य लाभले. त्यांचा शिवणाचा कोर्स झाला असल्याने त्या शिवणकाम करून संसाराला हातभार लावत असत.
त्यांच्या मुलीच्या घरी त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रथम दर्शन झाल्यावर त्या भेटीतच त्यांचा भाव जागृत झाला. त्यांना साधनेची तळमळ असल्याने त्यांनी स्वतःकडून झालेल्या चुकांविषयी मुलीकडून जाणून घेतले. त्यांनी अनेक सेवा तळमळीने केल्या. त्या जीवनातील अनेक कठीण प्रसंगांत साधनेच्या बळावर स्थिर राहू शकल्या.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आशीर्वाद लाभल्याने आयुष्याचे सोने झाले’, असा भाव असलेल्या पू. श्रीमती उषा कुलकर्णीआजी यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे.
या लेखात आपण पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांचे बालपण आणि त्यांनी इतरांना केलेल्या साहाय्याविषयी जाणून घेऊया.
पू. (श्रीमती) उषा मधुसूदन कुलकर्णी यांना ८२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. बालपण आणि शिक्षण
१ जन्म : ‘११.११.१९४१ या दिवशी माझा जन्म धुळे येथे माझ्या मामाच्या घरी झाला.
१ आ. बालपण
१ आ १. एकत्र कुटुंबात रहाणे आणि कुटुंबियांत वडील एकटेच नोकरी करत असल्याने कुटुंबाचा भार त्यांच्यावर असणे : माझे सर्व बालपण नगर येथे गेले. आमचे एकत्र कुटुंब होते. माझ्या बाबांना (कै. माधव वैद्य यांना) सख्खे ५ भाऊ होते. आम्ही सख्खे आणि चुलत अशी २८ भावंडे होतो. आमची आई कै. (सौ.) मालती वैद्य सतत कामात व्यस्त असे. माझे बाबा महसूल खात्यात नोकरी करत होते. माझे अन्य काका नोकरी करत नव्हते. त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याचा भार माझ्या बाबांवर होता. घरची शेती असल्यामुळे आम्हाला धान्य, भाजीपाला, दूध, तूप इत्यादी विपुल प्रमाणात मिळत असे. मोठे काका-काकू सोनई (नगर) येथे राहून शेती करत असत.
१ आ २. बालपणापासून ‘सर्वांशी जुळवून घेणे आणि समाधानी रहाणे’ याचे बाळकडू मिळणे : आम्हा सर्व भावंडांमध्ये १ – २ वर्षाचे अंतर असल्याने आम्हाला सर्वांशी जुळवून घ्यायची सवय लागली. आमच्यात भांडणे झाली, तरीही आम्हीच ती सोडवून नंतर पुन्हा एकत्र खेळत असू. घरात खाऊ आणल्यावर आम्हा सर्व मुलांना देत असत. सणासुदीला म्हणजेच दिवाळी आणि गुढीपाडवा या सणांच्या वेळी कापडाचा एक तागा आणला जात असे. त्यातून माझे काका सर्व मुलींना ‘फ्रॉक’ शिवत असत. मुलांचा पांढरा शर्ट आणि खाकी पँट असा पोशाख देत असत. आम्हा सर्व भावंडांना जे मिळेल, त्यात समाधानी आणि आनंदी रहाण्याचे बाळकडू मिळाले होते. मी भावंडांत मोठी असल्यामुळे मला भावंडांना सांभाळावे लागत असे.
१ आ ३. शारीरिक आणि मानसिक त्रास होत असतांना सहनशक्ती वाढणे : माझ्या आईचा स्वभाव थोडा तापट होता. त्यामुळे घरात काही कुरबुरी झाल्या, तर तिचा राग माझ्यावर निघत असे; पण मी ते सर्व निमुटपणे सहन करत असे. लहानपणी मला ‘टॉन्सिल्स’चा पुष्कळ त्रास असल्यामुळे मी सतत तापाने रुग्णाईत असायचे.
१ इ. घरी धार्मिक वातावरण असणे
१ इ १. प्रतिदिन संध्याकाळी श्लोक म्हणणे आणि आईच्या समवेत देवळात जाणे : घरी सर्व कर्मकांडातील विधी होत असत. सणावाराला सोवळे पाळले जात असे. संध्याकाळी दिवा लावल्यावर आम्ही सर्व मुले श्लोक आणि पाढे म्हणत होतो. आम्ही प्रतिदिन संध्याकाळी देवाला नमस्कार करत होतो आणि आईच्या समवेत देवळात जात होतो.
१ इ २. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दिवशी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या गाभार्यात जाण्याचे भाग्य लाभणे : बाबा नोकरीनिमित्त पंढरपूर येथे होते. त्या वेळी आम्ही प्रतिदिन विठ्ठलाच्या मंदिरात काकड आरतीला जात होतो. पू. मामासाहेब दांडेकर आमच्या घरी येऊन गेल्यामुळे थोडे फार अध्यात्म घडत गेले. आम्हाला त्यांचा आशीर्वाद लाभला. मी ह.भ.प. गोविंदराव आफळे (राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे वडील) आणि निजामपूरकर बुवा यांच्या कीर्तनाला जात होते. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन्ही दिवशी विठ्ठलाची पूजा करण्याचा मान माझ्या वडिलांना मिळाला होता. त्या वेळी मला गाभार्यात जाऊन मूर्तीला स्पर्श करण्याचे भाग्य लाभले आणि एक अनोखा अनुभव अन् आनंद मिळाला. आमचे पंढरपूर येथील दिवस फार चांगले गेले. त्यानंतर २ वर्षांनी माझ्या वडिलांचे स्थलांतर कोल्हापूर येथे झाले.
१ ई. शिक्षण
१ ई १. बाबांच्या नोकरीमुळे आम्हाला सतत स्थलांतर करावे लागत असे. त्यामुळे माझे चवथ्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण वेगवेगळ्या गावी झाले. त्यानंतर आम्ही नगर येथेच राहिलो आणि बाबा एकटेच नोकरीच्या गावी जात असत.
१ ई २. अकरावीपर्यंत शिक्षण होणे आणि महाविद्यालय जवळ नसल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेऊ न शकणे : माझे चौथी ते दहावी इयत्तेपर्यंतचे शिक्षण नगर येथे झाले. नंतर बाबा मामलेदार झाल्यामुळे त्यांचे स्थलांतर वडुज येथे झाले. आम्ही बाबांच्या समवेत वडुजला गेलो. वडुज हे खेडेगाव असल्यामुळे तेथे कुठल्याच सुविधा नव्हत्या. तेथे पाणी आणि वीज नव्हती. त्यामुळे दिवसा प्रकाश असतांनाच मला अभ्यास करावा लागत असे. शाळेत अकरावीचा वर्ग नुकताच चालू झाल्यामुळे वर्गात आम्ही चारच मुली आणि अन्य सर्व मुले होती. त्या काळी वडुज खेडेगाव असल्यामुळे मला अवघड वाटत असे. मला अकरावीची परीक्षा देण्यासाठी फलटण येथे जावे लागले. माझी परीक्षा झाल्यावर वडिलांचे स्थलांतर बार्शी (जि. सोलापूर) येथे झाले. तेथे महाविद्यालय नसल्यामुळे मी पुढे शिक्षण घेऊ शकले नाही. मी लहान भावाचा अभ्यास घेत असे.
१ ई ३. शिवणकामाचा १ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि हिंदी राष्ट्रभाषेच्या ४ परीक्षा देणे : ‘शिवणकाम आणि विणकाम करणे’, हाच माझा विरंगुळा होता. मी शिवणकामाचा १ वर्षाचा अभ्यासक्रम (कोर्स) पूर्ण केला. बार्शी येथून बाबांचे स्थलांतर लगेच पंढरपूर येथे झाले. तेथे मी हिंदी राष्ट्रभाषेच्या ४ परीक्षा दिल्या.
१ उ. आई रुग्णाईत असल्याने स्वयंपाक करावा लागणे : बाबा मामलेदार असल्यामुळे आमच्या घरी पुष्कळ पाहुणे येत असत. घरी आई-वडील, आजी आणि आम्ही ६ भावंडे होतो. आई रुग्णाईत असे. मी मोठी असल्यामुळे मला स्वयंपाक करावा लागत असे. आम्ही कोल्हापूर येथे असतांनाच माझे लग्न झाले.
(क्रमशः उद्याच्या अंकात)
– (पू.) श्रीमती उषा मधुसूदन कुलकर्णी, पुणे (१६.३.२०२३)