१. रामनाथी आश्रमात येतांना प्रवासामध्ये अनेक अडचणी आल्याने नियोजित वेळेपेक्षा पुष्कळ अधिक वेळ लागूनही संपूर्ण प्रवासात भावजागृती होणे
‘गुरुदेवांच्या कृपेने मला पहिल्यांदाच रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात यायला मिळाले. मला गोव्याला येतांना पुष्कळ अडचणी येत होत्या. नियोजित वेळेपेक्षा रेल्वे २० घंटे उशिरा येणार होती आणि पुढील रेल्वेची तिकिटेही रहित करण्यात आली होती. मला येथे येण्यासाठी एकूण ४ दिवस लागले; परंतु रेल्वेने एवढा दीर्घ प्रवास करूनही मला म्हणावा तेवढा थकवा जाणवत नव्हता. संपूर्ण प्रवासात माझी भावजागृती होत होती.
२. आश्रमात आल्यावर कृतज्ञतेमुळे डोळ्यांत अश्रू येणे आणि सेवा केल्यावर सर्व थकवा दूर होणे
मी आश्रमात येण्याचा मार्ग, मार्गातील वृक्ष, आश्रमात रहाणार्या सर्व सजीव आणि निर्जीव वस्तू यांच्याकडे कृतज्ञताभावाने पहात होतो. आश्रमात आल्यावर मला उत्साह जाणवला. माझ्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू होते. दुसर्या दिवशी सकाळी मी सेवा केल्यानंतर माझा सर्व थकवा दूर झाला.
३. आश्रमात येण्यापूर्वी साधनेविषयी ध्येय घेणे आणि आश्रमात असतांना स्वभावदोषांचे निर्मूलन करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणे
मी वाराणसीहून निघण्यापूर्वी ‘सतत शिकण्याच्या स्थितीत नसणे, स्वीकारण्याची वृत्ती नसणे, स्वतःला श्रेष्ठ समजणे, शिकवण्याच्या भूमिकेत रहाणे’ इत्यादी स्वभावदोषांवर मात करण्याचे ध्येय घेतले होते. आश्रमात असतांना मला यांविषयी संत आणि इतर सर्व साधक यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले, तसेच मी माझ्या अंगी गुण बाणवू शकलो. मी स्वभावदोषांचे निर्मूलन करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला.
४. साधक घरी गेल्यावर त्याने आश्रमात शिकलेल्या सूत्रांनुसार त्याच्याकडून कृती करवून घेणार असल्याचे गुरुदेवांनी सूक्ष्मातून सांगणे
मी ध्यानमंदिरात नामजप करतांना गुरुदेवांशी मानसरित्या बोलत होतो, ‘आपण मला जे आश्रमात शिकवले आहे, ते मी घरी गेल्यावर माझ्याकडून कृतीत आणून घ्यावे.’ तेव्हा गुरुदेवांनी माझ्या डोक्यावर हळूवारपणे थोपटत म्हटले, ‘असेच होईल.’ त्यांच्या दैवी हातातून माझ्या संपूर्ण शरिरात चैतन्य पसरले आणि माझी भावजागृती झाली.
५. आश्रम परिसरातील फुलांकडून गुरुचरणी अर्पण होण्यास शिकणे आणि परिसरातील फुले, वृक्ष, वस्तू यांच्याशी कृतज्ञताभावाने बोलणे
आश्रम परिसरात सेवा करतांना मी फुलांकडे पाहिले. तेव्हा ती फुले उमललेली होती. त्यांना पहाताच मी त्यांना मानसरित्या म्हणालो, ‘तुम्ही तर या वैकुंठधामात आहात. तुमचे प्रारब्ध चांगले आहे. तुम्ही तर गुरुचरणी अर्पण होणार. तुम्हाला मुक्ती मिळणार.’ तेव्हा फुलांनी मला म्हटले, ‘तूसुद्धा असेच प्रयत्न करत रहा. या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेव. लवकरच तूसुद्धा गुरुचरणी अर्पण होशील.’ तेव्हा माझी भावजागृती झाली आणि त्या भावावस्थेत माझी सेवा पूर्ण झाली. मी आश्रम परिसरात सेवा करतांना सर्व फुले, वृक्ष, वस्तू यांच्याशी कृतज्ञताभावाने बोलत होतो. पहाटे ४ वाजता चोहीकडे सुगंधच सुगंध दरवळत होता. त्यामुळे माझ्या मनाला पुष्कळच उत्साह आला.
६. साधक घरी गेल्यावरही गुरुदेव त्याच्या समवेत असतील, याविषयी गुरुदेवांनी आश्वस्त करणे आणि ‘संघटितपणे धर्मप्रसाराची सेवा केल्याने प्रगती होईल’, असे सांगणे
२२.६.२०२३ या दिवशी मी स्वच्छता सेवा केल्यानंतर ध्यानमंदिरात नामजप करत होतो. तेव्हा मनातल्या मनात गुरुदेवांचे स्मरण करून बोलत होतो, ‘गुरुदेव आपण मला एवढे दिवस वैकुंठधामात ठेवून घेतले. आज रात्री मी घरी परत जाणार आहे. तेव्हा आपण माझ्या समवेत रहाणार ना ?’ तेव्हा मला गुरुदेव म्हणाले, ‘मी तर सदैव तुझ्या समवेतच असतो. तुला येथे जे जे शिकायला मिळाले, त्याचा पूरेपूर उपयोग कर. संघटितपणे धर्मप्रसाराची सेवा कर. त्यातूनच तुझी उन्नती होणार आहे. तू साधना मार्गात पुढे जाशील.’ नंतर मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. जणू माझ्या डोळ्यांतील अश्रूंनी गुरुचरणांवर अभिषेक होत होता. गुरुदेव मला पाहून हसत आशीर्वाद देत होते, ‘तू निश्चिंत होऊन वाराणसीला घरी जा.’
मी गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. दिलीप राय (वय ३२ वर्षे), नटवां, वाराणसी. (२२.६.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |