आगरतळा (त्रिपुरा) – यावर्षी त्रिपुरातील भारत-बांगलादेश सीमेवर एकूण ७१६ घुसखोरांना अटक करण्यात आली, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्याने दिली. यामध्ये ११२ रोहिंग्या मुसलमान आणि ३१९ बांगलादेशी घुसखोरांचा समावेश आहे. सीमा सुरक्षा दलाने नुकताच ५९ वा स्थापना दिवस साजरा केला. या वेळी सीमा सुरक्षा दलाच्या त्रिपुरा मुख्यालयात सैनिकांना संबोधित करतांना उपमहानिरीक्षक आर्.के. सिंह म्हणाले, ‘सीमा सुरक्षा दल बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पहारा देत आहे. परिणामी त्यांनी वर्ष २०२३ मध्ये घुसखोरी करतांना ११२ रोहिंग्या मुसलमान, ३१९ बांगलादेशी घुसखोर आणि २८५ भारतियांना पकडले आहे. यावर्षी सीमा सुरक्षा दलाने सीमेवर २३ कोटी १२ लाख रुपयांचे अमली पदार्थही जप्त केले. भारताच्या या ईशान्येकडील राज्याची बांगलादेशशी ८५६ कि.मी. लांबीची सीमा आहे.