Action Against Illegal Construction : सांकवाळ (गोवा) कोमुनिदादकडून ६२ अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाईला प्रारंभ

निम्म्या घरांना वीज आणि पाणी यांचीही जोडणी

६२ अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई

वास्को, २९ नोव्हेंबर (वार्ता.) : सांकवाळ कोमुनिदादने २९ नोव्हेंबर या दिवशी सकाळपासून कोमुनिदाद भूमीतील २ वेगवेगळ्या भूमींवरील ६२ अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई चालू केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही अनधिकृत बांधकामे या ठिकाणी होती. तेथे अनधिकृत बांधकाम करणारे कोमुनिदाद प्रशासनाला दाद देत नव्हते.

सांकवाळ कोमुनिदाद प्रशासनाने २९ नोव्हेंबर या दिवशी सकाळी मोठ्या पोलीस फौजफाट्यासह पहिल्या भूमीवरील ३१ अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या कारवाईला प्रारंभ केला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत यांपैकी १० घरे भूईसपाट करण्यात आली. सांकवाळ कोमुनिदाद संस्थेचे अध्यक्ष प्रताप म्हार्दाेळकर म्हणाले, ‘‘ही कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार होत आहे. आम्ही अनधिकृत बांधकाम करणार्‍यांना अनेक वेळा तसे न करण्याविषयी वेळोवेळी चेतावणी दिली होती; मात्र संबंधितांनी आम्हाला शिवीगाळ करून अनधिकृत बांधकामे बांधणे चालूच ठेवले.’’

 (सौजन्य : Prudent Media Goa)

निम्म्या घरांना दिली होती वीज आणि पाणी यांची जोडणी

सांकवाळ कोमुनिदाद प्रशासनाने ज्या ६४ बांधकामांच्या विरोधात कारवाई केली, तेथील निम्म्या घरांना वीज आणि पाणी यांची जोडणी देण्यात आली होती. (यातून या दोन्ही खात्यांतील भ्रष्टाचार दिसून येतो किंवा तेथील राजकीय दबावामुळेही प्रशासकीय अधिकार्‍यांना वीज आणि पाणी यांची जोडणी द्यावी लागली असू शकते ! – संपादक)

संबंधित यंत्रणा कारवाई करत नसल्याने एटर्नी यांनी मागितली होती न्यायालयात दाद !

अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याविषयी संबंधित प्रशासकीय यंत्रणांना सांगूनही ते कारवाई करत नसल्याने कोमुनिदादचे एटर्नी जयेश फडते यांनी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात धाव घेतली होती. या वेळी त्यांनी याचिकेत राज्य सरकार, मुरगाव नियोजन जिल्हाधिकारी, दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासक, सांकवाळ पंचायत, पंचायत उपसंचालक आणि ३ व्यक्ती यांना प्रतिवादी केले होते.

संपादकीय भूमिका

अनधिकृत घरांना वीज आणि पाणी यांचा पुरवठा देणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी !