सुवर्णक्षणांचे भाग्यविधाते !

‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’च्या पदाधिकार्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन अयोध्या येथील राममंदिरामध्ये प्रभु श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अयोध्या येथे येण्याचे निमंत्रण काही दिवसांपूर्वी दिले. त्या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘हे माझे सौभाग्य आहे की, या ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार आहे. आजचा दिवस माझ्यासाठी पुष्कळ महत्त्वाचा आहे. आजचा दिवस माझ्यासाठी भावनांनी भरलेला आहे.’’ पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलेल्या भावना या केवळ त्यांच्याच आहेत, असे नाही, तर प्रत्येक श्रीरामभक्तासाठी तो दिवस महत्त्वाचा असणार आहे; त्यामुळे पंतप्रधानांचे हे उद्गार ऐकल्यानंतर रामभक्तांनाही कृतकृत्य वाटल्याविना रहाणार नाही; कारण हिंदु ज्या क्षणाची ५०० वर्षांपासून वाट पहात होते, तो क्षण आता जवळ आला आहे. या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत !

ज्या प्रभु श्रीरामांना इतकी वर्षे पडक्या मंदिरात रहावे लागत होते, त्यांना लवकरच एका सुंदर आणि सात्त्विक मंदिरात प्राणप्रतिष्ठा करून विराजमान करण्यात येणार आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर गेली ६ दशके काँग्रेसचे राज्य असतांना त्यांनी याविषयी काहीही प्रयत्न केला नाही. एवढेच नव्हे, तर ‘श्रीराम हे एक काल्पनिक पात्र आहे, श्रीराम नव्हताच’, अशी हेटाळणी करून भारताचे अंगप्रत्यंग असणार्‍या प्रभु श्रीरामांना भारतातून हद्दपारच केले होते !

मोदींचे शासन आल्यावर साकार होणारे हे श्रीराममंदिर गेली ५०० वर्षे त्यासाठी लढाया करणार्‍या हिंदूंना होत असलेल्या जखमा काही प्रमाणात भरून काढणार आहे. श्रीराम मंदिरासाठी प्राणार्पण कराव्या लागणार्‍या कारसेवकांच्या आत्म्यांनाही यामुळे शांती लाभेल. त्यामुळे हिंदूंसाठी हा क्षण सुवर्णाक्षरात लिहिला जाणार आहे !

हे श्रीराममंदिर म्हणजे येणार्‍या हिंदु राष्ट्राचा एकप्रकारे दीपस्तंभच आहे. रामासारखे राज्य हा आपला सुवर्ण इतिहास आहे आणि सध्याच्या काळात प्रत्येक भारतियाला तसेच आदर्श राज्य अपेक्षित आहे. आदर्श रामराज्य सहस्रो वर्षे चालवणार्‍या प्रभु श्रीरामाच्या मंदिराची पुनर्स्थापना आणि मूर्तीप्रतिष्ठापना अशा राष्ट्रकार्य करणार्‍या पंतप्रधान मोदी यांना करण्याची संधी मिळावी, हे त्यांचेही भाग्य आहे ! प्रभु श्रीराम सर्वार्थाने आदर्श होते. हाच आदर्श आपण प्रत्येकाने समोर ठेवून कृती केल्यास त्यांच्याप्रमाणे आदर्श रामराज्य, म्हणजेच हिंदु राष्ट्र आपण स्थापू शकू !

– वैद्या (सुश्री) माया पाटील, देवद, पनवेल.