कट्टर इस्लामी समीक्षक आणि राष्ट्रवादी असणारे गीर्ट विल्डर्स हे नेदरलँड्सचे पंतप्रधान होण्याची केवळ औपचारिकताच आता शेष आहे. त्यांनी नुकताच युरोपीय राष्ट्र नेदरलँड्समध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. नेदरलँड्सच्या एकूण १५६ जागांच्या संसदेत एकट्या गीर्ट विल्डर्स यांच्या ‘पार्टी फॉर फ्रीडम’ने ३७ जागा जिंकल्या आहेत. गेल्या २ दशकांच्या नेदरलँड्सच्या राजकीय इतिहासात कोणत्याही पक्षाला इतक्या मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांच्या या अनपेक्षित विजयामुळे सर्वत्रच्या हिंदूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे; पण पाश्चिमात्य माध्यमांनी (मिडियाने) गीर्ट यांच्या ऐतिहासिक विजयाला ‘भयंकर’ असे संबोधले आहे, तसेच ‘अत्यंत उजवे’ आणि ‘इस्लामविरोधी’ म्हणत त्यांची छेड काढण्याचाही प्रयत्न केला जात आहे. ‘जिथे यश, तिथे विरोध’ हे साहजिकच आहे; पण विल्डर्स यांनी लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणुका जिंकल्या आहेत, हे आपण विसरू शकत नाही. अर्थातच हा नेदरलँड्सच्या सामान्य जनतेचा विजय आहे.
नेदरलँड्स ही युरोपमधील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. केवळ २.२५ कोटी लोकसंख्येचा हा देश विकसित राष्ट्र म्हणून ओळखला जातो. असे असले, तरी गेल्या काही वर्षांत लाखो मुसलमान निर्वासितांनी या देशाला जणू त्यांचे घरच बनवले आहे. सीरिया, अफगाणिस्तान आणि उत्तर आफ्रिका येथील लाखो लोक युरोपमध्ये त्यांचा तळ ठोकून आहेत. हे सूत्र विल्डर्स यांनी निवडणुकीचा ‘अजेंडा’ म्हणून घेतले होते; म्हणून त्यांनी ‘नेदरलँड्स फर्स्ट’ ही राष्ट्रवादी मोहीम आरंभली. साम्यवादी आणि धर्मनिरपेक्ष पक्ष यांनीही या अजेंड्यावर आपापली मते व्यक्त केल्याने देशाच्या समस्यांमध्ये ती एक मोठी समस्या म्हणून उदयास आली. विल्डर्स यांनी देशात कुराणवर बंदी घालून निर्वासितांवर निर्बंध लादणार असल्याचे आश्वासन दिले होते. ‘याविषयी आता भविष्यात काय होणार ?’, हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल ! विल्डर्स हे मुसलमानांच्या नव्हे, तर इस्लामच्या विरोधात आहेत. याचमुळे गेल्या १८ वर्षांपासून त्यांना वैयक्तिक स्वातंत्र्यच उरलेले नाही. त्यांना पोलिसांच्या संरक्षणाविना बाहेर पडताच येत नाही. जिहाद्यांकडून त्यांना जिवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत.
भारत आणि गीर्ट विल्डर्स !
विल्डर्स यांचा विजय भारतासाठी आनंददायीच आहे; कारण त्यांचे भारतासमवेतचे संबंध चांगले आहेत. ते भारताला आपला मित्र मानतात. प्रखर राष्ट्रवाद आणि हिंदुत्व या सूत्रांना त्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याने भारतासाठी त्यांचे समर्थन निश्चितच परिणामकारक ठरते. भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी इस्लामच्या विरोधात केलेले कथित आक्षेपार्ह विधान सर्वांच्या टीकेस कारणीभूत ठरले; पण विल्डर्स यांनी त्यांना उघडपणे पाठिंबा दिला होता. नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट करणार्या कन्हैयालाल यांचीही २ मुसलमान तरुणांनी निर्घृण हत्या केली. गीर्ट यांनी हत्याकांडाचा निषेध करत म्हटले, ‘‘हा सर्वांत घृणास्पद गुन्हा आहे. भारताने असहिष्णुता सहन करणे थांबवावे. आतंकवादी आणि कट्टरतावादी यांच्यापासून हिंदुत्वाचे रक्षण करा. इस्लामचे लांगूलचालन करू नका, अन्यथा किंमत चुकवावी लागेल. हिंदूंना १०० टक्के संरक्षण देणारा नेता हवा.’’ यावरूनच त्यांचे भारतासमवेतचे सख्यत्वाचे संबंध उघड होतात.
युरोपीय राजकारण राष्ट्रवादाकडे !
गेल्या दशकभरापासून युरोपच्या राजकारणात गोंधळ चालू आहे. व्हिक्टर ओर्बन यांचा उजवा पक्ष वर्ष २०१० पासून हंगेरीमध्ये सत्तेत आहे. जर्मनीमध्ये ‘सोशल डेमोक्रॅटिक’ पक्षाचे ओलाफ स्कोल्झ हे देशाचे चान्सलर असले, तरी त्यांना राष्ट्रवादी पक्षांचा वाढता पाठिंबा सातत्याने मिळत आहे. ‘पॉलिटिको’ या युरोपियन मासिकाने या उजव्या विचारसरणीच्या पक्षाच्या विजयावर ‘अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी’ या शीर्षकाचा लेख प्रकाशित केला आहे. ‘अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी’ (‘ए.एफ्.डी.’चा) उदय कसा थांबवायचा ?’, याचा विचार करून जर्मनी देशही त्रस्त झाला आहे. ‘ए.एफ्.डी.’च्या वाढत्या समर्थनामुळे जर्मनीला धक्का बसला आहे. गेल्या २ वर्षांत ‘ए.एफ्.डी.’चे आधारबळ दुप्पट झाले आहे. ‘ए.एफ्.डी.’च्या विरोधात सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. स्वतःला आधुनिक समजणारा फ्रान्सही राष्ट्रवादाच्या भूकंपापासून अस्पर्श राहिला नाही. गेल्या निवडणुकीत मुसलमान शरणार्थी विरोधी मेरी ले पेन यांना इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हातून पराभव स्वीकारावा लागला होता; पण गेल्या काही वर्षांत फ्रान्समधील जिहादी आक्रमणे पाहून डाव्या पक्षाचे प्रमुख मॅक्रॉन यांना कट्टर राष्ट्रवादी भूमिका घेणे भाग पडले. शेवटी त्यांनी तेथील काही मशिदी आणि मदरसे यांच्यावर बंदी घातली, तसेच सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालणे बंद केले. डाव्या विचारसरणीच्या राष्ट्रप्रमुखांच्या विचारसरणीत अचानक झालेले परिवर्तन ही ऐतिहासिक घटनाच म्हणावी लागेल. यातूनच युरोपीय लोकांच्या आशा-आकांक्षा कुठे झुकलेल्या आहेत, ते लक्षात येते. ‘जी -२०’च्या शिखर परिषदेसाठी देहलीत आलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी अलीकडच्या काळात भारतियांमध्ये विशेष लोकप्रिय ठरल्या आहेत. मेलोनी याही कट्टर राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या आहेत. स्विडन आणि फिनलंड येथे झालेल्या निवडणुकांतही कट्टर राष्ट्रवादी पक्षांनीच सत्ता प्राप्त केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘नेदरलँड्सचे भावी पंतप्रधान गीर्ट विल्डर्स यांचा विजय जागतिक राजकारणात पालट घडवून आणेल’, हे वरील उदाहरणांतून लक्षात येते. हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाविषयीही अनेक पॅलेस्टिनी समर्थकांनी हिंसक निदर्शने केली. असे असतांना केवळ युरोपच नव्हे, तर संपूर्ण जगच टोकाच्या राष्ट्रवादाच्या दिशेने झुकले, तर आश्चर्य वाटणार नाही. थोडक्यात काय, तर जेव्हा देशावर संकट असतांना विकास कि राष्ट्रवाद यांच्यात निवड करण्याची वेळ जनतेवर येते, तेव्हा जनता राष्ट्रवादाची निवड करते, हेच गीर्ट विल्डर्स यांच्या विजयातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
जगात उजव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांना मिळणारा प्रतिसाद, ही धर्मनिरपेक्षतेची पुंगी वाजवणार्यांना चपराक ! |