पुढील १५ दिवसांत हलाल उत्पादने दुकानांतून परत घ्या ! – उत्तरप्रदेश सरकार

  • उत्तरप्रदेश सरकारचा ९२ आस्थापनांना आदेश !

  • घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना हलाल उत्पादने हटवण्याचाही आदेश

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश सरकारने हलाल उत्पादन आणि त्यांना देण्यात येणारे प्रमाणपत्र यांवर बंदी घालण्यात आल्यानंतर १५ दिवसांत घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी त्यांच्याकडील हलाल उत्पादने हटवण्याचा आदेश दिला आहे. तसेच हलाल प्रमाणपत्र घेऊन वस्तूंची विक्री करणार्‍या ९२ आस्थापनांना, ‘त्यांनी दुकानांना विकलेला माल परत घेऊन त्यावर हलाल प्रमाणपत्राचा उल्लेख नसणार्‍या वेष्टनातून ते पुन्हा विकावे’, अशी सूचना करण्यात आली आहे.

उत्तरप्रदेशात आतापर्यंत ३ सहस्र किलो हलाल उत्पादने जप्त

यापूर्वीच राज्याच्या अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने हलाल उत्पादनांमध्ये भेसळ असण्याची शक्यता पहाता त्यांचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात ओल आहेत. या विभागाच्या आयुक्त अनीता सिंह यांनी सांगितले की, आतापर्यंत राज्यात ९२ ठिकाणी धाडी टाकण्यासह ५०० ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या. याद्वारे अनुमाने ३ सहस्र किलो हलाल उत्पादने जप्त करण्यात आली आहेत. याचे मूल्य ७-८ लाख रुपये आहे. यात साखर, तेल आणि बेकरी उत्पादने यांचा समावेश आहे. तसेच ८१ नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

संपूर्ण देशात हलाल प्रमाणपत्र देणार्‍या ७०० ते ८०० अनधिकृत संस्था !

अशा प्रकारे सरकारकडून मान्यता नसतांना इतक्या मोठ्या प्रमाणात हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संस्था कार्यरत असतांना केंद्र आणि राज्य स्तरांवरील प्रशासन झोपले आहे का ?

हलाल मांसाविषयी आयुक्त अनीता सिंह यांनी सांगितले की, हलाल मांस आणि त्याच्याशी संबंधित उत्पादने यांना प्रमाणपत्र देण्यासाठी देशभरात केवळ ३ आस्थापने अधिकृत आहेत. यांतील एक लक्ष्मणपुरीमध्ये आहे. सध्या संपूर्ण देशात ७०० ते ८०० अशा संस्था आहेत, ज्या हलाल प्रमाणपत्र देत आहेत. या सर्व संस्थांवर उत्तरप्रदेशात बंदी घालण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका 

देशविरोधी आणि हिंदु धर्मविरोधी गोष्टींवर कारवाई करून ती कशी मुळासकट नष्ट करायची, याचा आदर्श उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने या प्रकरणातून हिंदूंसमोर ठेवला आहे. अशाच शासनकर्त्यांची हिंदूंना आवश्यकता आहे, असे हिंदूंना वाटल्यास चुकीचे ते काय ?