|
पाटलीपुत्र (बिहार) – बिहार सरकारच्या शिक्षण विभागाने वर्ष २०२४ मध्ये शाळांना देण्यात येणार्या सुट्यांची सूची प्रसारित केली आहे. यानुसार शाळांना मकरसंक्रात, रक्षाबंधन, हरितालिका आणि जितिया (आश्विन मासामध्ये मुलांसाठी मातांनी करण्याचे व्रत) या सणांसह गांधी जयंतीची सुटी रहित करण्यात आली आहे. यासह दिवाळी आणि छठपूजा यांच्या सुट्या अल्प केल्या आहेत. दुसरीकडे उन्हाळी सुट्यांसह ईद, बकरी ईद आणि मोहरम यांच्या सुट्या वाढवल्या आहेत. इस्लामी शाळा आणि मदरसे यांची साप्ताहिक सुटी पालटून शुक्रवार करण्यात आली आहे. रविवारी या शाळा चालू रहाणार आहेत. एवढेच नाही, तर कोणतीही शाळा मुसलमानबहुल भागांत असल्यास आणि उर्दू शाळेप्रमाणे त्यांना शुक्रवारी साप्ताहिक सुटी घ्यायची असेल, तर ते जिल्हाधिकार्यांची अनुमती घेऊ शकतात. बिहार सरकारने उर्दू आणि सामान्य शाळा यांच्या सुट्यांसाठी स्वतंत्र कॅलेंडर प्रसारित केले आहे.
सौजन्य इंडिया टूडे
उन्हाळी सुट्या २० वरून ३० दिवसांनी वाढवण्यात आल्या आहेत. उन्हाळी सुटीत इतर दिवसांप्रमाणेच शिक्षक आणि कर्मचारी शाळेत उपस्थित रहाणार आहेत. दिवाळीत १ दिवस, तर छठपूजेच्या (उत्तर भारतात केल्या जाणार्या सूर्याच्या पूजेच्या व्रताच्या) कालावधीत ३ दिवस सुटी असेल. हरितालिका व्रताच्या कालावधीत २ दिवसांची आणि जितियाला १ दिवसाची सुटीही रहित करण्यात आली आहे.
भाजपकडून टीका
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी बिहार सरकारवर टीका करतांना म्हटले की, लालू यादव आणि नितीश कुमार यांचे सरकार ज्या प्रकारे हिंदूंवर आक्रमण करत आहेत, ते पहाता भविष्यात ते महंमद नितीश आणि महंमद लालू म्हणून ओळखले जातील.
भाजपचे राज्यसभा खासदार सुशील मोदी म्हणाले की, बिहार सरकारने पुन्हा एकदा शाळांमधील जन्माष्टमी, रक्षाबंधन, शिवरात्री या हिंदु सणांच्या सुट्या रहित केल्या आहेत. हिंदूंना जातींमध्ये विभागून आणि अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करून नितीशकुमार मतांच्या राजकारणात गुंतले आहेत.
नितीश कुमार सरकारच्या एका मंत्र्याचा विरोध, तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्याकडून बचाव !
नितीश सरकारचे मंत्री अशोक चौधरी म्हणाले की, अशा निर्णयामुळे जनभावना दुखावल्या जातील. हे चुकीचे आहे. शिक्षण विभागाच्या मंत्र्यांना ते दिसले नसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांना कळले, तर ते नक्कीच नोंद घेतील.
जनता दल(संयुक्त)चे नेते नीरज कुमार म्हणाले की, शब-ए-बरातच्या सुट्ट्या अल्प करण्यात आल्या आहेत, त्यावर कोणतीही चर्चा नाही. हिंदूंच्या सुट्यांमध्ये कोणतीही कपात केलेली नाही. वाढीव सुट्ट्यांचे कारण शिक्षण विभागच सांगू शकेल. याकडे राजकीय दृष्टीकोनातून न पहाता शिक्षण विभागाचा खुलासा पाहूनच निवेदन देणे योग्य ठरेल.
सुट्यांची सूची
गेल्या वर्षी ईदची सुट्टी केवळ २२ एप्रिलला होती, तर यंदा १०, ११ आणि १२ एप्रिलला ईदची सुटी देण्यात आली आहे. गतवर्षी बकरी ईदमध्ये २ दिवसांची सुटी होती, ती यंदा वाढवून १८, १९ आणि २० जून असे ३ दिवस करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मोहरमची सुटी १ दिवसाची होती, तर यंदा १७ आणि १८ जुलैला सुटी देण्यात आली आहे.
हिंदूंसाठीच्या या सुट्या रहित !
महाशिवरात्री, रामनवमी, श्रावणातील अंतिम सोमवार, हरितालिका, जितिया , श्रीकृष्ण जन्माष्टमी, अनंत चतुर्दशी, भाऊबीज, गोवर्धन पूजा, गुरुनानक जयंती आणि कार्तिक पौर्णिमा
संपादकीय भूमिका
|