‘कृण्वन्तो विश्वमार्यम् ।’ (ऋग्वेद, मण्डल ९, सूक्त ६३, ऋचा ५) म्हणजे ‘संपूर्ण जगाला आर्य (सुसंस्कृत) करू.’
‘भारत सर्वदूर कसा पसरला होता, हे जसे भूगोल आणि इतिहास यांवरून समजते; तसेच ते संस्कृती, भाषा, धर्म, रूढी अन् परंपरा यांवरून अधिक स्पष्ट होते. ‘कृण्वन्तो विश्वमार्यम् ।’ हा घोष, ही घोषणा याचा इतिहास पाहूया.
हिंदुत्वाच्या पुरातन अस्तित्वाचे जगभरातील पुरावे विविध देश, धर्म, इतिहासकार आणि संशोधक यांच्या मतांमधून बघितले, तर जगातील विविध देशांपासून अन् सर्वदूर पसरलेल्या अनेक राष्ट्रांत हे पुरावे आढळून येतात. यांचा शोध घेण्याच्या प्रवासाला आपण दक्षिणेकडून पूर्वेकडे आणि पूर्वेकडून उत्तर अन् पश्चिम दिशेला आरंभ करूया.
१. श्रीलंका आणि तिचा हिंदु संस्कृतीशी असलेला पुरातन संबंध
पूर्वीचा सिलोन, म्हणजेच श्रीलंका ! लंका नावाचा हा देश भारताच्या दक्षिण नैऋत्य दिशेला आहे. श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये समुद्रात छोट्या बेटांची अन् दगडांची रांग आहे, त्याला ‘रामसेतू’ म्हणतात. रामायणानुसार ‘श्रीलंका’ हे रावणाचे साम्राज्य होते. श्रीलंकेला ‘सोन्याची लंका’ असे म्हणत. रावणाने सीतेचे अपहरण करून तिला लंकेत ठेवले असता प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण हे सीतेचा शोध घेत असता रामभक्त हनुमानाने आपल्या अनेक सहकार्यांच्या साहाय्याने श्रीलंकेला जोडणारा हा रामसेतू बांधला होता. पुरातन हिंदु वाङ्मयातील भौतिक पुरावे आजही सबंध जगभरात आढळून येतात.
अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन केंद्राने उपग्रहाच्या माध्यमातून या पुलाविषयीची अशीच अनेक छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. त्यात भारतातील दक्षिण सागरी किनारपट्टीपासून श्रीलंकेपर्यंत जाणार्या पुलाचे विहंगम दृश्य दिसते. येथील ‘सिंहल’ लोकांची संस्कृती हिंदु संस्कृतीशी मिळतीजुळती असून त्यांची ‘सिंहली’ भाषाही संस्कृत भाषेतूनच निर्माण झालेली आहे.
श्रीलंकेत कोलंबोपासून अनुमाने १५० किलोमीटर अंतरावर माणिकगंगा नदीच्या किनारी एक पुरातन गणेश मंदिर आहे. तेथे आजही वैदिक बौद्ध पगोड्यांचा रक्षक-देव ‘श्री गणेश’. हिंदु विधींप्रमाणेच श्री गणेशाचे पूजन केले जाते. श्रीलंकेतील एका पर्वतावर एक भव्य जुना खडक आहे. खडकावर २ मीटर लांब पावलाची खूण (प्रतिबिंब) खाच आहे. याला ‘शिवशंकराचे पाऊल’ म्हटले जाते. श्रीलंकेत रामायणाचा पुष्कळच प्रभाव आहे. इथे मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्म असून त्याचे प्रमाण जवळपास ७० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. हिंदूंचे प्रमाण जवळजवळ १३ टक्के आहे. ‘शिव’ हे येथील एक प्रमुख दैवत मानले जाते. ‘मुरुगन’ या देवालासुद्धा मोठ्या प्रमाणावर पूजले जाते. रामायणकालीन अनेक गोष्टी येथे आजही पहायला मिळतात. श्रीलंका हिंदु देशच होता. तेथील कंडास्वामी मंदिर, पंचईश्वरम् आणि कतारगाम मंदिर प्रसिद्ध आहेत.
२. ‘हिंद महासागर’ (इंडियन ओशन) हे नाव का पडले ?
आजच्या भूगोलातही इंडो-चायना, इंडोनेशिया, इंडो-आर्यन, इंडियन ओशन (हिंद महासागर) आदी नावे पूर्वापार हिंदुस्थानचे साम्राज्य आणि त्याचे नाव सबंध जगात गाजत असल्याची साक्ष देतात. पृथ्वीच्या नकाशात अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंतच्या लांबलचक सागरपट्ट्यास ‘हिंद महासागर’ (इंडियन ओशन) हे नाव का पडले ? हे यातून लक्षात येईल. हिंदुस्थान हा देश तर त्या महासागराच्या उत्तरेस बराच वर आशिया खंडातील एका कपारीत बसलेला दिसतो.
३. ऑस्ट्रेलियात प्राचीन वैदिक हिंदु संस्कृती नांदत असणे
हा खरेतर ‘अस्रालय’ असा संस्कृत शब्द आहे. ‘महाभारत’कालीन युद्ध सबंध जगभर चालले असता अस्रालय खंडात विविध अस्रे सिद्ध करण्याच्या दृष्टीने अस्रांचा स्फोट केल्याने मोठ्या प्रमाणात जीवित हानी होऊन तो खंड ओसाड पडला अन् उरलेले लोक रानटी अवस्थेत जीवन कंठू लागले, तरी त्या लोकांत कपाळावर गंध रेखाटण्याची प्राचीन हिंदु प्रथा अजूनही शेष आहे’, असे मत सुप्रसिद्ध इतिहासकार आणि संशोधक पु.ना. ओक यांनी त्यांच्या ‘हिंदु विश्व राष्ट्राचा इतिहास’, या ग्रंथात व्यक्त केले आहे. या पुस्तकात त्यांनी कपाळावर गंध लावलेल्या मूळ ऑस्ट्रेलियन पुरुषाचे छायाचित्रही दिलेले आहे. ‘ऑस्ट्रेलियातसुद्धा प्राचीन काळी वैदिक हिंदु संस्कृतीच नांदत होती’, असे त्यांचे ठाम मत होते.’
– सुधा साठ्ये