१. साधनेला आरंभ केल्यानंतर घशाचा त्रास कायमचा दूर होणे
‘साधनेला आरंभ करण्यापूर्वी मला घशाचा तीव्र त्रास होता. त्या त्रासामुळे मला गिळणे आणि बोलणे या कृती करतांना त्रास होत होता. एका आधुनिक वैद्यांनी कर्करोगाची तपासणी करण्यासाठी बायोप्सी चाचणी (Biopsy Test) (रोगनिदान करण्यासाठी शरिरातील उतींना छेद घेऊन त्यांची सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने करायची परीक्षापद्धती) करण्यास सांगितले होते. देवाच्या कृपेने वर्ष २००७ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार माझी साधना चालू झाली आणि घशाचा त्रास कायमचा दूर झाला. काही दिवसांनंतर मी पूर्ण वेळ साधना करण्याचे ठरवले.
२. पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक शारीरिक त्रास चालू होणे
१८.५.२०१७ या दिवशी प.पू. गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा) जन्मोत्सव होता. त्याच दिवशी पूर्णवेळ साधना करण्याचा माझा प्रथम दिवस होता. ही देवाचीच कृपा ! साधनेत पूर्णवेळ होण्याचा निर्णय घेतल्यापासून मला शारीरिक आजार चालू झाले. नोकरीचे त्यागपत्र (राजीनामा) देण्याअगोदर ‘उच्च रक्तदाबा’चे निदान झाले. मी त्यागपत्र (राजीनामा) दिल्यानंतर कार्यालयातून मुक्त होण्यापूर्वीच्या मुदतीच्या कालावधीत (नोटीस पिरीयडमध्ये) एकदा कार्यालयात जात होतो. तेव्हा मी नवी मुंबई येथील एका पुलावर चक्कर येऊन पडलो आणि बेशुद्ध झालो. पडतांना माझा चेहरा पुलावर आदळल्याने दात ओठात जाऊन मला जखम झाली. सुदैवाने मी पडलो त्या ठिकाणी एक पाईप हाेता, नाहीतर मी तोल जाऊन वर्दळ असलेल्या मार्गावर (रस्यावर) पडलो असतो. (या आधीही मी अशा प्रकारे बेशुद्ध होऊन पडलो होतो आणि अनेक चाचण्या करूनही त्याचे काहीच निदान झाले नव्हते.)
३. गोव्यात स्थलांतरित होण्याचा निर्णय घेणे
कार्यालयातून मुक्त होऊन मी जिल्ह्यात सेवा करत होतो. काही दिवसांनी मी गोवा येथे स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा गोव्यातील साधकांच्या साहाय्याने गोव्यात घर पहाणे चालू होते. पत्नी आणि मुलगी यांनी एक घर पाहिले होते. ते त्यांना आवडले. त्यामुळे मी स्वतः घर न पहाता भ्रमणभाषवर ते अंतिम केले. काही दिवसांत ‘ते घर पाहून घरात काही दुरुस्तीचे काम करायचे आहे का ?’, हे पहाण्यासाठी मी गोव्यात जायचे ठरवले.
४. डाव्या पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या (डिप व्हेन थ्रोम्बोसिस) झाल्याचे निदान झाल्याने रुग्णालयात भरती व्हावे लागणे, त्याच वेळी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने मधुमेहाचेही निदान होणे, त्यामुळे गोव्यात जाता न आल्याने गोव्यातील साधकांनी घर घेऊन देण्यास साहाय्य करणे
त्या वेळी आधीपासून दुखत असणार्या माझ्या डाव्या पायाचे दुखणे वाढले. आधुनिक वैद्यांना दाखवले असता पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे (डिप व्हेन थ्रोम्बोसिस (Deep Vein Thrombosis, DVT)), या आजाराचे निदान झाले. त्यामुळे मला रुग्णालयात भरती व्हावे लागले. रुग्णालयात भरती झालो असतांना एकदा नेहमीच्या रक्त तपासणीमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण पुष्कळ असल्याचे लक्षात आले. तेव्हा मला ‘मधुमेह’ असल्याचे निदान झाले. त्या वेळी माझ्या मनावर शारीरिक आजारांचा ताण नव्हता; पण ‘मला घराच्या कामासाठी गोव्याला जाता येत नाही’, याचे वाईट वाटत होते. तेव्हा मी गोव्यातील साधकांना भेटलो नसतांनासुद्धा त्यांनी भ्रमणभाषवरील माझ्या बोलण्यानुसार घर घेऊन दिले आणि त्याचे आतील कामही करवून घेतले. ही माझ्यासाठी मोठी कृपाच होती.
५. गोव्यात आल्यावर आयुर्वेदीय, पंचकर्म आणि बिंदूदाबन अशा विविध पद्धतींचे उपचार होणे आणि त्यामुळे आजाराचे प्रमाण न्यून होणे
गोव्याच्या घरी येतांना मी ‘मधुमेह’, ‘डिप व्हेन थ्रोम्बोसिस’, ‘उच्च रक्तदाब’ असे विविध आजार घेऊन आलो. रामनाथी आश्रमात प.पू. डॉक्टरांच्या कृपेने आधुनिक वैद्य श्री. पांडुरंग मराठेकाकांच्या माध्यमातून ॲलोपॅथीचे उपचार चालू होते. एकदा ‘डिप व्हेन थ्रोम्बोसिस’ या आजारानिमित्त मी ज्या रुग्णालयात भरती होतो, तेथील वैद्यांचा एक सल्ला भ्रमणभाषवर विचारायचा होता. त्यासाठी त्या वैद्यांनी आधी ५०० रुपये तपासणी शुल्क पाठवण्यास सांगितले आणि नंतर त्यांनी मला त्यांचे मत दिले. (‘आश्रमातील वैद्यकीय विभागातील साधकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायला हवी. ते आजाराचे निदान आणि औषधोपचारही विनामूल्य अन् प्रेमाने करतात.’ – संकलक) माझ्या रक्तातील ‘कोलेस्टेरॉल’ चे प्रमाण वाढत होते. त्यावर आयुर्वेदीय वैद्या कु. अपर्णा महांगडे यांच्या माध्यमातून आयुर्वेदीय उपचार चालू झाले. त्यांनी माझ्यावर पंचकर्म उपचारसुद्धा केले. त्यानंतर माझे व्यायामाचे पाच वर्ग झाले. त्यानंतर बिंदूदाबनाचे महत्त्व सांगून माझ्यावर बिंदूदाबन उपचार चालू झाले. ‘देव माझ्यासाठी एवढे करत आहे’, त्यासाठी केवळ क्रियमाण म्हणून मी नियमित व्यायाम, बिंदूदाबन आणि पथ्य पाळणे यांकडे कटाक्षाने लक्ष दिले. या सर्व उपायांमुळे पायामधील रक्ताच्या गुठळ्या पूर्णपणे गेल्या आणि ५ – ६ मासांत रक्तातील साखर आणि ‘कोलेस्टेरॉल’चे प्रमाण सर्वसाधारण आले. माझा रक्तदाबही सर्वसाधारण झाला. किती ही देवाची कृपा !
६. शरिरातील सर्व आजारांचे प्रमाण न्यून होणे आणि नातेवाइकांनी या पालटासंदर्भात विचारल्यावर त्यांना साधनेविषयी सांगणे
या सर्व आजारांतून वाचवणारे केवळ माझे प.पू. डॉक्टरच आहेत. ही त्यांचीच मोठी कृपा आहे. माझ्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जेव्हा नातेवाईक मला संपर्क करायचे, त्या वेळी मी त्यांना प्रकृतीत झालेला चांगला पालट सांगायचो. ‘हे कसे घडले. तू काय केलेस ?’, असे त्यांनी विचारल्यावर मी त्यांना साधनेसंदर्भात सांगायचो.
७. गुरुचरणी व्यक्त केलेली प्रार्थना आणि कृतज्ञता !
‘प.पू. गुरुमाऊली, जसे तुम्ही मला अनेक शारीरिक आजारांतून बरे करत आहात, तसेच माझे स्वभावदोष आणि अहं हे मनाचे आजारही बरे करून कायमचे मला तुमच्या चरणांशी स्थान द्या. जीवनाचे सार्थक होण्यासाठी तुम्हीच मला भाव, भक्ती, शक्ती आणि बुद्धी द्या, हीच शरणागतीने प्रार्थना !’
‘माझ्यावर उपचार करणारे सर्व वैद्य, स्वयंपाक घरातील पू. रेखाताई काणकोणकर आणि साधिका, व्यायाम अन् बिंदूदाबन शिकवणारे साधक अन् इतर सर्व साधकांप्रती कोटीशः कृतज्ञता !’कृतज्ञताभावाने ही अनुभूती मी गुरुचरणी अर्पण करतो.’
– श्री. अरुण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |