शासन धर्मांतरावर बंदी घालण्यास अयशस्वी होण्यामागील हिंदु धर्माचे अभ्यासक डॉ. डेव्हिड फ्रॉले यांनी सांगितलेली कारणमीमांसा !

डॉ. डेव्हिड फ्रॉले

अमेरिकेच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक स्टडीज’चे निर्देशक आणि हिंदु धर्माचे अभ्यासक डॉ. डेव्हिड फ्रॉले म्हणतात, ‘‘भारताला आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचा पुनरुद्धार करणे, हे ध्येय गाठायचे आहे. हे ध्येय गाठण्यामुळे केवळ भारताचेच नाही, तर संपूर्ण मानवतेचे कल्याण होणार आहे. जेव्हा भारताचे बुद्धीजीवी लोक आधुनिकतेचा मोह त्यागून आपला धर्म आणि अध्यात्म यांविषयी कडवट टीका करणे सोडून देतील, तेव्हाच हे शक्य होईल. धर्मनिरपेक्षतेच्या नावावर शासन जेव्हा सर्व धर्म समान घोषित करत असेल, तर त्या शासनाने त्वरितच धर्मांतर करण्यावर बंदी घातली पाहिजे; कारण की जर सर्व धर्म समान आहेत, तर कुणालाच धर्म पालटण्याची आवश्यकता का पडेल ?

तरीही ‘शासन धर्मांतर करण्यावर बंदी घालण्यास अयशस्वी का होत आहे ?’, याचे उत्तर देतांना डॉ. डेव्हिड फ्रॉले लिहितात, ‘‘स्वातंत्र्यानंतर एका बाजूला हिंदुविरोधी प्रचार करणे आणि दुसर्‍या बाजूने साम्यवाद, इस्लाम अन् ख्रिस्ती धर्म यांच्या प्रचाराद्वारे भारताचे तुकडे तुकडे करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्यामुळे भारतातील समस्या पुष्कळ वाढल्या आहेत. जे भ्रष्ट राजकारणी आहेत, ते ढोंगीपणे उदार धर्मनिरपेक्ष आहेत. ते स्वतःची खुर्ची आणि सत्ता यांच्या लालसेने भारतीय हिंदु समाजाला जातीयवाद अन् धर्म यांच्या नावाखाली स्वतःची मतपेटी (व्होट बँक) वाढवण्यासाठी भडकवत आहेत आणि समाजात आपापसांत द्वेष पसरवून ते भ्रष्ट राजकारणी स्वतःचा स्वार्थ साधत आहेत.’’

(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, ऑगस्ट २००६)