इस्रायल आणि ‘हमास’ यांच्यातील ‘युद्धविराम’ नव्हे, ‘स्वल्पविराम’ !

आंतरराष्ट्रीय शक्तींच्या दबावामुळे अखेरीस इस्रायल आणि ‘हमास’ ही आतंकवादी संघटना यांच्यामध्ये ४ दिवसांचा युद्धविराम झाला खरा; पण या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली आहे ती, म्हणजे ‘हमास’सारख्या संघटनांना मुळापासूनच उखडून टाकावे लागेल. त्यांच्याकडून पश्चात्तापाची अपेक्षा करणेच व्यर्थ !

गाझा पट्टीत निदान ४ दिवस तरी युद्धाची धुमश्चक्री थांबण्याची चिन्हे आहेत. महिला आणि मुलांसह अनुमाने ५० परदेशी ओलिसांची मुक्तता करण्याची सिद्धता ‘हमास’ने दाखवल्यामुळे इस्रायलने ४ दिवस युद्धविराम घोषित केला आहे. इस्रायललाही अनुमाने ५० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करावी लागेल, असे दिसते. हा अल्पविराम गाझातील नागरिकांना श्वास घेण्याची उसंत देईल, अशी अपेक्षा आहे; पण ४ दिवसांनंतर गाडी पुन्हा मूळ पदावर येण्याचीच शक्यता अधिक; कारण मूळ रोगावर इलाज झालेला नाही. केवळ मलमपट्टी करण्यात आली आहे. ही मलमपट्टी फार दिवस चिकटून रहाणार नाही आणि जखम पुन्हा भळभळून वाहू लागेल.

१. गाझा पट्टीतील ‘अल् शिफा’ रुग्णालयामागील इस्रायलने उघड केलेले कटूसत्य !

रुग्णालये, शाळा, निर्वासितांचे कॅम्प्स (छावण्या), मशिदी यांसारख्या पूर्णपणे अराजकीय स्थळांचा वापर ‘हमास’कडून केवळ राजकीय उद्दिष्टांसाठी केला जातो, असे नव्हे, तर या ठिकाणी इस्रायलच्या विरोधात हिंसक कारवायांची केंद्रे सज्ज केली जातात. ‘अल् शिफा’ हे गाझातील एक मोठे रुग्णालय. त्या रुग्णालयाच्या तळघरात भुयारे खोदण्यात आली असून त्यात घातक शस्त्रास्त्रे तर ठेवण्यात आली होतीच; पण ‘हमास’ने पकडलेल्या ओलिसांनाही तेथे बंदीवान म्हणून ठेवण्यात आले होते. या रुग्णालयावर ताबा मिळवल्यावर इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने तर अशा भुयारांचा व्हिडिओच जगापुढे सादर केला. त्यात ‘हमास’ने कशा प्रकारे शस्त्रास्त्रे ठेवली होती ? ओलिसांना कुठे बांधून ठेवले होते ? वगैरे अनेक तपशील दाखवण्यात आले. मुळात या रुग्णालयात असे तळघर आणि भुयार सापडणे, हाच ‘हमास’च्या विरोधातील पुरावा आहे. इतकेच नव्हे, तर या रुग्णालयातून २ परदेशी ओलिसांना कसे घाईघाईने आणि फरफटवत एका जागेवरून दुसरीकडे हलवण्यात आले, त्याची दृश्येही जगापुढे आली आहेत.

२. रुग्णालयाच्या आडून ‘हमास’ करत असलेली आतंकवादी कृत्ये !

रुग्णालयात लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी येतात. अशा ठिकाणाचा वापर ओलिसांना बंदीवासात ठेवण्यासाठी आणि इस्रायलवर हिंसक आक्रमणे करण्यासाठी करून ‘हमास’ने शाळा, रुग्णालये, मशिदी यांसारख्या स्थळांचे पावित्र्य भंग केले आहे. त्यामुळे इस्रायलकडून या ठिकाणांवर होत असलेल्या बाँबआक्रमणांचे समर्थनच करावे लागते. रुग्णालये, शाळा आणि शरणार्थींचे कॅम्प येथे आतंकवाद्यांना दडवून त्यांच्याकडून इस्रायलवर आक्रमण करणे, हे चुकीचे आहे. ‘इस्रायलचे रुग्णालयावर बाँब आक्रमण, अनेक रुग्ण ठार’ असे मथळे हे फसवे आणि अर्धसत्य कथन करणारे आहेत. या रुग्णालयांमध्ये इस्रायलवर डागण्यात येणार्‍या रॉकेटची यंत्रणा बसवली होती, हा या मथळ्याचा उत्तरार्ध असतो; पण कथित सेक्युलर (निधर्मी) आणि शांतीप्रिय ‘इकोसिस्टिम’ (विरोधकांची प्रणाली) हा भाग दडवून ठेवते. इस्रायलच्या खर्‍या-खोट्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या बातम्या ठळकपणे देणारी माध्यमे ‘हमास’च्या या अमानवी आणि अनैतिक कृत्ये यांविषयी मौन पाळून आहेत.

‘अल् शिफा’ रुग्णालयाखाली सापडलेला बोगदा

३. सर्वत्रच्या इस्लामी आतंकवाद्यांची जुनी खोड आणि भारताची कथित उदारता !

‘निरपराध लोकांच्या आडून सैन्यावर आक्रमणे करणे’, ही इस्लामी आतंकवाद्यांची जुनीच खोड आहे. काश्मीरमध्येही पाकिस्तानपुरस्कृत आतंकवादी अनेक गावांतील घरांमध्ये दहशतीच्या जोरावर आश्रय घेत. त्यामुळे लष्कराला सार्‍या गावाला वेढा घालावा लागत असे. अनेक विद्यार्थ्यांना पैशाच्या मोबदल्यात भारतीय लष्करावर दगडफेक करण्यास उद्युक्त केले जाई. भारताच्या उदारतेच्या मूल्यांमध्ये अशा निरपराध विद्यार्थ्यांवर पाशवी बळाचा वापर करणे बसत नसल्याने अनेक सैनिकांना घायाळ व्हावे लागले. असे असले, तरी त्या बदल्यात एकाही विद्यार्थ्याचा मृत्यू लष्कराच्या हातून झालेला नाही. भारतीय लष्कराने इस्रायलचे तत्त्व अंगीकारले नव्हते, तर भीष्मांप्रमाणे अर्जुनाच्या बाणांनी रक्तबंबाळ होणे स्वीकारले.

४. अल्पसा युद्धविराम इस्रायलसाठी पूर्वसिद्धता करण्याची संधी !

सध्याचा युद्धविराम हा तात्पुरता असून स्वतःच्या जिवावर उठलेल्या ‘हमास’ला कायमचे गाडण्याची आलेली ही सुवर्णसंधी इस्रायल सोडणार नाही. त्यामुळे सर्व ओलिसांची बिनशर्त मुक्तता करण्याविषयी इस्रायल आग्रही आहे. ‘आताचा युद्धविराम हा इस्रायलला मनापासून मान्य नसला, तरी जागतिक दबावापोटी तो स्वीकारून आपण तडजोडीला सिद्ध आहोत’, हे इस्रायल दाखवून देत आहे. या काळात इस्रायललाही स्वतःच्या पुढील रणनीतीसाठी पूर्वसिद्धता करण्यास अवधी मिळेल. यानंतर इस्रायलकडून गाझावरील आक्रमणे पुन्हा चालू होतील. ‘हमास’ला या ५ दिवसांनी तसा काही लाभ होणार नाही. गाझावर इस्रायलचे पूर्ण नियंत्रण बसले असून या पुढील अनेक वर्षे ते तसेच राहील, हे ‘हमास’ने ओळखले आहे.

५. युद्धविरामामुळे मूळ प्रश्न सुटणार का ?

इस्रायलने स्वतःचा सुरा त्याच्या (हमासच्या) गळ्याशीच टेकवल्यामुळे जीव वाचवण्यासाठी त्या संघटनेने एक पाऊल मागे घेतले आहे इतकेच ! या संघटनेने खरोखरच काही ओलिसांची मुक्तता केली, तर ते ओलिस ‘हमास’चे पितळ अधिकच लखलखीतपणे जगापुढे आणतील. त्यामुळे ‘हमास’ ओलिसांची मुक्तता करील कि नाही ? हेच आधी पडताळून पहावे लागेल. जरी सुटका केली, तरी त्यामुळे मूळ प्रश्न सुटणार नाही; कारण इस्रायलला ‘हमास’चे आणि ‘हमास’ला इस्रायलचे अस्तित्वच नष्ट करायचे आहे. इस्रायलला स्वतःच्या नागरिकांची, म्हणजेच ज्यू धर्मियांची मुक्तता हवी आहे आणि ‘हमास’ला ते करायचे नाही. त्यामुळे हा युद्धविराम नसून स्वल्पविराम आहे.

– राहुल बोरगावकर

(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)