धर्माची पुनर्स्थापनाच जग आणि मानवता यांना वाचवू शकेल ! – माता अमृतानंदमयी देवी

माता अमृतानंदमयी देवी

बँकॉक (थायलंड) – जगात सर्वत्र ‘अम्मा’ म्हणून भक्तीभावाने संबोधल्या जाणार्‍या माता अमृतानंदमयी देवी यांनी २६ नोव्हेंबर या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’च्या शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात मार्गदर्शन केले. या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘आपण आज येथे ‘जगातील सर्वांत प्राचीन आणि उदात्त संस्कृती’च्या नावाने एकत्र आलो आहोत. हिंदु श्रद्धा विविध तत्त्वे आणि मूल्ये यांचा संगम असून तिच्यात जगाचे कल्याण अन् समृद्धी साधण्याची क्षमता आहे. सनातन धर्माला नेहमीपासूनच जाणीव राहिली आहे की, मनुष्य आणि निसर्ग यांच्यात गहन संबंध आहे. हिंदु धर्मानेच जगाला धर्म आणि यज्ञ, गुण अन् ‘स्व’चा त्याग यांची शिकवण प्रदान केली. आज जगात ‘प्रेम’ आणि ‘नि:स्वार्थ भावाने सेवा करण्याची प्रवृत्ती’ लोप पावत चालली आहे. धर्माची पुनर्स्थापनाच जग आणि मानवता यांना वाचवू शकेल. शरणागत भावाने अशा प्रकारचे कार्यक्रम वरचेवर आयोजित करणे काळाची आवश्यकता आहे !’’

सौजन्य सौजन्य वर्ल्ड हिंदू कॉंग्रेस 

आधुनिक जगतामध्ये असलेला ताणतणाव धर्माला दुर्लक्षित केल्यानेच !

अम्मा पुढे म्हणाल्या की, आधुनिक जगतामध्ये असलेला सर्व ताणतणाव हा धर्माला दुर्लक्षित केल्याने आणि त्याचे आचरण न केल्याने निर्माण झाला आहे. आपण मानवनिर्मित कायद्यांचा अंगीकार करतो; परंतु या सर्वांवर दैवी कायदा आहे ज्यामुळेच आपण एका धाग्यात गुंफू शकलो. यालाच ‘धर्म’ म्हणतात. मानवनिर्मित कायद्यांच्या भयापोटी आपण चुकीची कृत्ये करण्याचे टाळतो. त्याप्रमाणेच धर्मनियमांचा भंग केल्याचा परिणामही जगाला भोगावा लागणार आहे. जसे गुरुत्वाकर्षण हा निसर्गनियम आहे, तसा धर्म हा संपूर्ण ब्रह्मांडाचा नियम आहे. राष्ट्राची राज्यघटना आणि कायदे सरकारे पालटू शकतात; परंतु ब्रह्मांडाचा कायदा म्हणजेच धर्म कुणीही पालटू शकत नाही. जेव्हा मानव धर्मापासून दूर जातात, तेव्हाच समाजातील सर्व समस्या तोंड वर काढून उभ्या रहातात, हे आपण विसरता कामा नये.

प्रत्येक मानवाने धर्माचरण केले पाहिजे !

या वेळी अम्मांनी रामायणातील जटायूचे उदाहरण सांगून म्हटले की, अधर्माला थांबवण्याचा प्रयत्न कधीही निष्फळ ठरत नाही. जेव्हा आपण आपल्या क्षमतेमध्ये धर्माचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा धर्म आपले रक्षण करतो. ऋषींनी ‘धर्म’ हे नाव दिले असून मानवसमूह, निसर्ग आणि भगवंत यांना तोच सुरेख आणि परिपूर्णता यांद्वारे जोडण्याचे कार्य करतो. प्रत्येक मानवाने धर्माचरण केले पाहिजे.