ब्रह्मोत्सवाला जाण्यासाठी प्रवास करतांना साधकांनी केलेले साधनेचे प्रयत्न आणि त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

मुंंबई, ठाणे आणि रायगड येथील साधकांनी अनुभवलेला ‘न भूतो न भविष्यति ।’, असा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

(भाग ६)

लेखाचा भाग ५ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/738760.html

डावीकडून कु. वैभवी सुनील भोवर , सौ. ऋचा किरण सुळे आणि सौ. मानसी जोशी

५. श्री. अभय वर्तक, नागोठणे, रायगड.

५ अ. प्रवासात नामजप होणे आणि श्री गुरूंच्या आठवणीने मन भरून येणे : ‘प्रवास चालू झाल्यापासून माझ्या मनात निरर्थक विचार आले नाहीत. त्या वेळी माझा नामजप होत होता. श्री गुरूंच्या आठवणीने माझे मन भरून येत होते. ‘हे केवळ श्री गुरूंमधील चैतन्यामुळे होत आहे’, असे मला जाणवत होते.

५ आ. ‘श्री गुरु सतत समवेत आहेत आणि ते प्रवासात प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहेत’, असे जाणवणे : प्रवास करत असतांना बाहेर पुष्कळ उष्णता होती. ‘अशा वेळी अल्पाहार आणि महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी कुठे
थांबायचे ? सर्व साधकांना उष्णतेचा त्रास होऊ शकतो’, असे मला वाटत होते; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आम्हाला प्रवासात कोणताही त्रास झाला नाही. श्री गुरूंच्या कृपेने महाप्रसाद घेण्यासाठी थांबण्याची व्यवस्था इतकी उत्तम होती की, आम्ही कल्पनाच करू शकत नाही. संपूर्ण प्रवासात प्रत्येक गोष्टीची उत्तम व्यवस्था होती. ‘श्री गुरु सतत समवेत आहेत आणि ते प्रत्येक लहान गोष्टीचीही काळजी घेत आहेत’, असे मला जाणवत होते.

५ इ. गुरुदेवांच्या कृपेने वाहनचालकही साधक वृत्तीचा असणे : प्रवासाच्या वेळी साधक मोठ्याने जयघोष आणि नामजप करत होते. आमच्या समवेत आलेले वाहनचालक श्री. रोशन हेही साधकांसह मोठ्याने नामजप करत होते. ‘देवाने आम्हाला बसचालकही साधक वृत्तीचा दिला’, याबद्दल माझ्याकडून देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’

६. सौ. नंदा बळवंत खोत, खांदा कॉलनी, रायगड.

६ अ. एरव्ही प्रवास करतांना होणारा शारीरिक त्रास गुरुकृपेने या वेळी न होणे : ‘अन्य वेळी मी गावी जाते, तेव्हा गाडीत माझे पाय सुजतात; मात्र या वेळी त्यापेक्षाही अधिक प्रवास करूनही माझे पाय सुजले नाहीत. मला गुडघेदुखीचा त्रास असूनही माझे गुडघे दुखले नाहीत. गुरुदेवांच्या कृपेनेच मला ही अनुभूती आली.’

७. कु. सिद्धि डुबे, खांदा कॉलनी, रायगड.

अ. ‘गुरुदेवांशी झालेली पहिली भेट आणि शिकायला मिळालेली सूत्रे’, यांविषयी साधकांचे सुंदर अनुभव ऐकतांना माझ्या मनातील अस्थिरता दूर झाली आणि माझ्या मनातील शंकांचे निरसन होऊन माझे मन शांत झाले.

आ. भजनातील ‘नारायण’ हा शब्द ऐकल्यावर माझी भावजागृती होत होती. मी प्रथमच अशी आनंदावस्था अनुभवली.’

८. सौ. अमृता जुनघरे, खांदा कॉलनी, रायगड. 

८ अ. ‘प्रवासात भावजागृतीचा प्रयोग चालू असतांना माझे ध्यान लागत होते.

८ आ. श्री गुरूंना भावपूर्ण प्रार्थना होणे : माझ्याकडून सतत श्री गुरूंना प्रार्थना होत होती, ‘हा ब्रह्मोत्सव मला सूक्ष्म स्तरावर अनुभवता यावा’, यासाठी मला दिव्य दृष्टी प्रदान करा. आपण जे देणार आहात, ते मला ग्रहण करता येऊ दे. माझा प्रत्येक श्‍वास आपल्या चरणी कृतज्ञतेने समर्पित होऊ दे. माझी भावभक्ती वाढू दे.’

८ इ. गुरुदेवांच्या कृपेने स्वीकारण्याच्या स्थितीत रहाता येऊन आनंद मिळणे : संपूर्ण प्रवासात मला काही त्रास झाला नाही. प्रवासात किंवा सोहळ्याच्या ठिकाणी माझ्या मनात साधक किंवा परिस्थिती यांविषयी कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. ‘गुरुदेव मला स्वीकारण्याच्या स्थितीत ठेवून आनंद मिळवून देत आहेत’, असे मला जाणवत होते. माझ्या अंतर्मनावर बाह्य परिस्थितीचा काहीच परिणाम होत नव्हता.

८ ई. पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सांगितलेल्या साधनेविषयीच्या सूत्रांची आठवण येऊन त्याप्रमाणे कृती होणे : पू. जाधवकाकूंनी (पू. (सौ.) संगीता जाधव यांनी) सांगितलेल्या ‘आपल्याला न्यूनपणा घ्यायचा आहे. सर्व स्वीकारायचे आहे. इतरांचा विचार करायचा आहे. सोहळा सूक्ष्म स्तरावर अनुभवायचा आहे’, या सूत्रांची सतत आठवण होऊन माझ्याकडून त्याप्रमाणे कृती होत होती.

८ उ. साधक गुरुदेवांविषयीची सूत्रे सांगत असतांना भाव जागृत होणे आणि गुरुदेव जीवनात आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त होणे : ‘साधकांच्या अनुभूती आणि साधकांची गुरुदेवांशी झालेली प्रथम भेट’, यांविषयी ऐकत असतांना माझा भाव जागृत होत होता. मला समजू लागल्यापासून केवळ आणि केवळ गुरुदेवच माझ्या जीवनात होते, आहेत अन् यापुढेही ते कायम रहाणार आहेत. ‘माझ्या मनात गुरुदेवांप्रती कोणतेच प्रश्‍न, विकल्प किंवा द्वंद कधीच आले नाही’, याची जाणीव होऊन माझ्याकडून श्री गुरुचरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती.’

९. श्री. सुदेश पालशेतकर, महाड, रायगड.  

९ अ. ब्रह्मोत्सवासाठी जायला सुटी मिळण्यासाठी कार्यालयात सलग रात्र आणि दिवस पाळी करावी लागूनही प्रवासात कोणताही शारीरिक त्रास न होता आनंद मिळणे : ‘ब्रह्मोत्सव सोहळ्यासाठी गोव्याला जायला सुटी मिळण्यासाठी मला कार्यालयात रात्रपाळी करून पुन्हा दिवसपाळी करावी लागली. तेव्हा माझ्या मनात ‘कितीही शारीरिक त्रास झाला, तरीही ब्रह्मोत्सव सोहळ्यासाठी जायचेच’, असा विचार होता. त्या वेळी सलग रात्र आणि दिवस पाळी करूनही मला कोणताही त्रास जाणवला नाही. ‘ब्रह्मोत्सव सोहळ्यासाठी जायला मिळणार आहे’, या विचारानेच मला पुष्कळ आनंद होत होता. रात्रीचा प्रवास असूनही नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची आठवण होत असल्याने प्रवासातही मला काहीच त्रास जाणवला नाही. ‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला हे अनुभवता आले’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

१०. सौ. वीणा म्हात्रे, नवीन पनवेल, रायगड.

अ. ‘मला प्रवासात त्रास होत असूनही माझ्या मनाला शांतता आणि आनंद जाणवत होता.

आ. आमची बस कोल्हापूर येथून जात असतांना कुंकवाचा सुगंध दरवळत होता. तेव्हा मला वाटले, ‘साक्षात् श्री महालक्ष्मीदेवी आमच्या समवेत ब्रह्मोत्सव सोहळ्यासाठी येत आहे.’

इ. ब्रह्मोत्सव सोहळा पाहून परत येत असतांना आमचे बस नागोठणे येथे थांबली. तेव्हा मला सच्चिदानंद परब्रह्म श्री गुरुमाऊलींची आठवण येऊन माझे मन शांत आणि निर्विचार झाले आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.’ (‘रायगड जिल्ह्यातील ‘नागोठणे’ ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जन्मभूमी आहे.’ – संकलक)

११. श्री. भारत ठाकूर, उरण, रायगड.

११ अ. पाऊस आल्यावर ‘साधकांप्रमाणे आम्ही देवताही गुरुदेवांच्या दर्शनासाठी आतुर झालो आहोत’, असे वरुणदेव सांगत असल्याचे जाणवणे : ‘आम्ही सकाळी कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे पोचल्यावर हलकासा पाऊस आला. तेव्हा मला जाणवले, ‘जणू साक्षात् वरुणदेव आम्हाला सांगत आहे, ‘तुम्हा साधकांप्रमाणे आम्ही देवताही गुरुदेवांच्या (श्रीविष्णूच्या) चरणांचे दर्शन घेण्यासाठी आतुर झालो आहोत.’

१२. कु. पूजा पाटील, नवीन पनवेल, रायगड.

अ. ‘काही साधकांना शारीरिक त्रास असूनही ते एवढ्या मोठ्या प्रवासाला निघाले होते. त्यांच्याकडे पाहून मला त्यांची श्री गुरूंप्रतीची श्रद्धा शिकायला मिळली.

आ. मला बसच्या प्रवासात प्रथमोपचार सेवक म्हणून सेवा मिळाली होती. ती सेवा करतांना ‘गुरुमाऊलींचे सर्व साधकांकडे सतत लक्ष आहे आणि ते सूक्ष्मातून सर्वांची काळजी घेतच आहेत’, असे मला वाटत होते.

इ. प्रवासात बस एके ठिकाणी थांबल्यावर पाय धुतल्यानंतरही माझ्या पायांवर ८ – १० दैवी कण दिसत होते. त्या वेळी मला वाटले, ‘त्या दैवी कणांचीही गुरुदेवांना भेटायला येण्याची इच्छा आहे.’

ई. ‘मार्गात दिसणारी सर्व झाडे, प्राणी आणि आकाश नमस्कार करत आहेत आणि ते ‘आमचा नमस्कार गुरुचरणी सांगा’, असे सांगत आहेत’, असे मला वाटत होते.’

१३. सौ. वंदना आपटे, रायगड

अ. ‘प्रत्येक बसमध्ये एक प्रथमोपचारक हवा’, असे उत्तरदायी साधकांनी सांगितल्यावर ‘जिल्ह्यात प्रथमोपचारक साधकांची संख्या अल्प आहे’, असा विचार मनात येऊन मला थोडा ताण आला; मात्र गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर सहसाधक आणि दायित्व असणारे साधक यांच्या माध्यमातून ‘कोणते साधक प्रथमोपचारक म्हणून सेवा करू शकतात ?’, हे लक्षात येऊन त्यांचे नियोजन झाले.

आ. ‘प्रथमोपचार पेटी सिद्ध करून देणे आणि प्रथमोपचारक म्हणून सेवा करणार्‍या साधकांचा सराव घेणे’, या सेवा गुरुमाऊलींच्या कृपेने सहजतेने होऊन मला त्यांतून पुष्कळ आनंद मिळाला.

इ. ‘या सेवेतून जणूकाही परम दयाळू गुरुमाऊली आपत्काळाच्या दृष्टीने सर्व साधकांना शारीरिक आणि मानसिक स्तरावर सिद्ध करत आहेत’, असे मला जाणवले.’

१४. कु. श्रुति किचंबरे, रायगड

अ. ‘प्रवासात मला प्रथमोपचार सेविकेची सेवा होती. ‘एखाद्या साधकाला काही त्रास होत असल्यास त्याला कोणती गोळी द्यायची ? त्याचे म्हणणे कसे समजून घ्यायला हवे ? उत्तरदायी साधकांचे साहाय्य मिळेपर्यंत त्याला कसे हाताळायला हवे ?’, अशा विविध गोष्टी मला या सेवेतून शिकता आल्या.

आ. या सेवेतून स्वतःत ‘तत्परता, इतरांना समजून घेणे आणि प्रेमभाव’, अशा विविध गुणांची वृद्धी होते’, असे माझ्या लक्षात आले.

इ. ‘ब्रह्मोत्सवाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ कसा करून घ्यायचा ? श्री गुरूंना कसे अनुभवायचे ?’, याविषयी पू. जाधवकाकूंनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच साधकांना प्रयत्न करण्याची दिशा मिळाली. लांबचा प्रवास असूनही साधक चैतन्याच्या स्तरावर प्रवास अनुभवू शकले.’

१५. कृतज्ञता

‘अशा प्रकारे परम दयाळू गुरुमाऊलीने आमची कोणतीही पात्रता नसतांना, तसेच त्यांना अपेक्षित असे आमचे साधनेचे प्रयत्न होत नसतांनाही आम्हाला दिव्य असा ‘ब्रह्मोत्सव’ अनुभवण्याची संधी दिली. त्यांनी संतांच्या माध्यमातून ‘ते चैतन्य कसे अनुभवायचे आणि कसे ग्रहण करायचे ?’, हे शिकवले. त्यांनी आमच्याकडून तसे प्रयत्न करून घेऊन आम्हाला दैवी अनुभूती दिल्या आणि अपार चैतन्यात न्हाऊ घातले’, याबद्दल श्री गुरुचरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.’

– कु. वैभवी सुनील भोवर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय २६ वर्षे), सौ. ऋचा किरण सुळे आणि सौ. मानसी जोशी, मुंबई. (११.६.२०२३)

(समाप्त)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक