सीलबंद खाद्य उत्पादनातील रसायनांचा वापर; शेतमालावर होणारी रासायनिक फवारणी; फळे, भाज्या लवकर पिकवण्यासाठी केलेली रासायनिक प्रक्रिया, वाढते प्रदूषण, हवामानातील अनियमितता या सर्वांमुळे सामान्य माणसाचे आरोग्य धोक्यात आले आहे. २०-२५ वर्षांपूर्वी जे रोग केवळ श्रीमंतांच्या घरात पहायला मिळत, ते आता सामान्य माणसांनाही जडले आहेत. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, हाडांचे विकार आता घरोघरी होऊ लागले आहेत. या सर्वांवर प्रतिदिन औषधे खाणार्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. या आजारांवरील बनावट औषधे बनवणारी आस्थापने आणि ही औषधे ग्राहकांपर्यंत पोचवणार्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. सध्याच्या प्रमाणित आस्थापनांच्या नावांची आणि औषधांच्या वेेष्टनांची हुबेहूब नक्कल करून बनावट औषधे बाजारात विकली जात आहेत. उत्तरेतील राज्यांनी औषध उत्पादकांना अधिक सवलती दिल्या. परिणामी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, मिझोराम आदी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात औषध कारखाने उभे राहिले आहेत. त्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे बनावट औषधांच्या निर्मितीला मोकळे रान मिळाले आहे. अन्य राज्यांत ही औषधे मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याने बनावट औषधांचे जाळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही पसरले आहे. महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाने १६ ऑक्टोबरला एक परिपत्रक काढून राज्यातील औषध विक्रेत्यांनी बाहेरील राज्यांतून विकत घेतलेल्या प्रत्येक औषधाचे देयक प्रतिदिन ई-मेल करणे बंधनकारक केले आहे. सवलतीच्या दरात ऑनलाईन औषध पुरवणार्या आस्थापनांकडूनही बनावट औषधे पुरवली जात असल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. बनावट औषधांच्या सुळसुळाटामुळे औषधे खरेदी करतांना सावध रहाण्याचे आवाहन राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने केले आहे; मात्र ‘बनावट औषधे ओळखायची कशी ?’ हे नागरिकांना माहिती नाही. विश्वासाने औषधे घेणार्या रुग्णाला बनावट औषध त्याच्या जिवाचे बरे-वाईट करू शकते, याची काय कल्पना असणार ? सध्या ‘इतरांचा जीव गेला तरी चालेल; पण माझा लाभ झाला पाहिजे’, अशी राक्षसी प्रवृत्ती बोकाळली आहे. त्यामुळे प्रत्येक औषध डॉक्टरांना दाखवणे आणि ते ग्रहण करतांना धन्वंतरि देवतेला प्रार्थना करून ग्रहण करणेच इष्ट ठरेल !
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.