रुग्‍णाईत असूनही सतत सकारात्‍मक रहाणारे आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव असणारे अकोला येथील (कै.) मधुकर काशीराम रेवेकर (वय ६४ वर्षे)!

‘अकोला येथील मधुकर काशीराम रेवेकर यांचे १६.९.२०२३ या दिवशी निधन झाले. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या कुटुंबियांना त्‍यांच्‍या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कै. मधुकर रेवेकर

१. श्रीमती संजीवनी रेवेकर (कै. मधुकर रेवेकर यांची पत्नी)

१ अ. विवाहानंतर घरी धार्मिक आणि सात्त्विक वातावरण असणे : ‘माझा विवाह झाल्‍यावर मी रेवेकर कुटुंबात आले. सासरी पूर्वीपासून सर्व कुलाचार पाळले जायचे आणि सर्व सण साजरे व्‍हायचे. माझे यजमान देवीचे भक्‍त होते. ते गावदेवीचे दर्शन घेऊनच कामावर जात असत. त्‍यामुळे घरात आरंभीपासून सात्त्विक वातावरण होते.

श्रीमती संजीवनी रेवेकर

१ आ. यजमानांनी सेवा करण्‍यासाठी कुटुंबियांना सहजपणे अनुमती देणे : माझे यजमान पोलीस खात्‍यात कामाला होते. त्‍यांच्‍या कामावर जाण्‍याच्‍या वेळा सतत पालटत असत. त्‍यामुळे ‘मला सेवेसाठी बाहेर पडता येईल कि नाही ?’, अशी शंका माझ्‍या मनात होती. माझ्‍या दोन्‍ही मुली (सौ. अश्‍विनी सरोदे (पूर्वाश्रमीची कु. अश्‍विनी रेवेकर) सौ. शुभांगी म्‍हात्रे (पूर्वाश्रमीची कु. शुभांगी रेवेकर) आणि माझे दोन मुलगे (श्री. शैलेंद्र रेवेकर आणि सागर रेवेकर) स्‍वसंरक्षण प्रशिक्षणाच्‍या सेवेसाठी जात असत. ‘हे सर्व यजमानांना आवडेल कि नाही ?’, असे मला वाटत असे. मला प्रवचने आणि सत्‍संग घेण्‍याचे दायित्‍व मिळाल्‍यावर मी यजमानांकडे सेवेला जाण्‍यासाठी अनुमती मागितली. तेव्‍हा त्‍यांनी कुठलीही आडकाठी न घेता मला अनुमती दिली. मला गुरुदेवांनी (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी) ही मोठी अनुभूतीच दिली.

१ इ. गंभीर रुग्‍णाईत असतांनाही अनुसंधानात राहून शारीरिक त्रास सहन करणे : मागील ६ वर्षांपासून यजमानांची दोन्‍ही मुत्रपिंडे निकामी झाल्‍यामुळे ते केवळ डायलिसिसवर (टीप) जगत होते. ‘निवृत्त झाल्‍यावर मी पुष्‍कळ सेवा करणार आहे’, असे ते म्‍हणत असत; परंतु आता ‘प्रारब्‍धानुसार ही स्‍थिती ओढवली आहे, तर त्‍याला सामोरे जाणे आपले कर्तव्‍य आहे’, असा त्‍यांचा सकारात्‍मक भाग होता. ते सतत गुरुमाऊलींच्‍या अनुसंधानात रहात होते. त्‍यांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ सतत डोळ्‍यांसमोर दिसत असत. ते म्‍हणायचे, ‘‘सद़्‍गुरुद्वयी माझ्‍याकडे बघून हसतात. त्‍यातून मला चैतन्‍य मिळते. त्‍यामुळेच मी हे सर्व सहन करू शकत आहे.’’

(टीप : डायलिसिस – मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्याने रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया)

केवळ प.पू. गुरुमाऊलींच्या कृपेमुळेच आम्ही कुटुंबीय स्थिर राहू शकलो. यासाठी गुरुमाऊलींच्या प्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

२. सौ. अश्‍विनी सरोदे (कै. मधुकर  रेवेकर यांची मोठी मुलगी), अकोला

सौ. अश्‍विनी सरोदे

२ अ. प्रेमभाव : ‘माझे बाबा घरी आलेले पाहुणे आणि साधक यांचे प्रेमाने आदरातिथ्‍य करायचे. ते कुणाचेही मन दुखावत नसत.

२ आ. पोलीस खात्‍यात प्रामाणिकपणे नोकरी करणे : बाबांनी पोलीस खात्‍यात अत्‍यंत प्रामाणिकपणे नोकरी केली. आमची आर्थिक स्‍थिती जेमतेम होती. ‘आम्‍हा ४ भावंडांचे शिक्षण चांगल्‍या प्रकारे व्‍हावे’, असे त्‍यांना वाटत असे; परंतु आमच्‍या शिक्षणासाठी पैसा उपलब्‍ध व्‍हावा; म्‍हणून त्‍यांनी कधीच वाममार्ग अवलंबला नाही. त्‍यांचा अधिकारीवर्ग त्‍यांचे नेहमी कौतुक करत असे.

२ इ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव

१. आम्‍ही साधनेत आल्‍यापासून बाबांची परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती पुष्‍कळ श्रद्धा वाढली. ‘जे काही बरे वाईट घडते, त्‍यातून गुरुदेवच मार्ग काढतात’, असा त्‍यांचा सकारात्‍मक भाग असायचा.

२. त्‍यांना घरी किंवा रुग्‍णालयात साधक भेटायला आल्‍यावर ‘साधकांच्‍या रूपात प्रत्‍यक्ष गुरुमाऊली येतात’, असा त्‍यांचा भाव असायचा.

२ ई. कुटुंबातील सर्वांना समष्‍टी सेवेला अनुमती देऊन स्‍वतःही प्रासंगिक सेवा करणे : आम्‍ही साधनेत आल्‍यावर प्रसारासाठी बराच वेळ घराबाहेर असायचो. आई प्रसाराच्‍या सेवेत आणि मी, लहान बहीण शुभांगी अन् माझे २ भाऊ स्‍वसंरक्षण प्रशिक्षण सेवेत असायचो. बाबांना नोकरीमुळे केव्‍हाही कामावर जावे लागायचे. ते आम्‍हाला म्‍हणायचे, ‘समष्‍टी सेवा करणे आवश्‍यक आहे.’ गुरुपौर्णिमा आणि धर्मजागृती सभा असतांना ते सामानाची ने-आण करण्‍यासाठी चालक म्‍हणून सेवा करत असत. ते सतत कुलदेवीचा नामजप करत असत. ते नेहमी सांगायचे, ‘‘मी निवृत्त झाल्‍यावर सेवाच करणार आहे.’’

२ उ. नोकरीतून निवृत्त झाल्‍यावर व्‍याधीग्रस्‍त होणे आणि सर्व भार गुरुमाऊलींवर सोपवून सकारात्‍मक रहाणे : सेवानिवृत्त झाल्‍यानंतर काही मासांतच त्‍यांना मधुमेह झाल्‍याचे लक्षात आले. त्‍याचबरोबर त्‍यांना रक्‍तदाबाचा त्रासही चालू झाला. आध्‍यात्मिक उपायांच्‍या समवेत त्‍यांनी सर्व प्रकारचे वैद्यकीय उपचार घेतले; परंतु त्‍यांचा आजार बळावतच गेला. पुढे त्‍यांची दोन्‍ही मुत्रपिंडे कार्यरत राहिली नाहीत. त्‍याही परिस्‍थितीत बाबा सकारात्‍मक रहायचे. त्‍यांनी सर्व भार गुरुमाऊलीवर सोपवला. ‘मला जिवंत ठेवायचेच असेल, तर देवच माझी काळजी घेणार’, असे ते सांगत असत.

२ ऊ. रुग्‍णालयात नातेवाईक किंवा कार्यालयातील लोक भेटायला आल्‍यावर ते त्‍यांना नामजपाचे महत्त्व सांगत असत.

२ ए. रुग्‍णाईत असतांनाही कुटुंबियांना सेवा करण्‍याची अनुमती देणे

२ ए १. आईला नियोजनानुसार सेवेस जाण्‍यास सांगणे : बाबा रुग्‍णाईत असतांना ‘सेवेला कसे जायचे ?’, असा आईला प्रश्‍न पडत असे. तेव्‍हा बाबा आईला म्‍हणायचे, ‘‘तू तुझ्‍या नियोजनानुसार सेवेला जा. माझी काळजी करू नकोस. तुझ्‍या रूपात गुरुदेवांनी मला एक साधिकाच दिली आहे.’’

२ ए २. कोरोना महामारीच्‍या कालावधीत आईने बाबांच्‍या खोलीत बसून ‘ऑनलाईन’ सत्‍संग घेणे आणि ‘गुरुमाऊलीने घरीच माझ्‍यासाठी सत्‍संगाचे नियोजन केले’, असा बाबांचा भाव असणे : कोरोना महामारीच्‍या कालावधीत सर्व सत्‍संग ऑनलाईन (संगणकीय प्रणालीद्वारे) असत. आई बाबांच्‍या खोलीतच बसून ऑनलाईन सत्‍संग घेत असे. त्‍यामुळे बाबांना पुष्‍कळ आनंद होत असे. ‘गुरुमाऊलीने माझ्‍यासाठीच घरी सत्‍संगाचे नियोजन केले’, असा त्‍यांचा भाव असायचा.

२ ए ३. बाबांची प्रकृती गंभीर असतांनाही गुरुपौर्णिमेनिमित्त कुटुंबियांना सेवा करता येणे : वर्ष २०२३ च्‍या गुरुपौर्णिमेनिमित्त आम्‍हा दोघींनाही (मला आणि आईला) दायित्‍वाच्‍या सेवा मिळाल्‍या होत्‍या. आम्‍ही घरी नसतांना बाबा अकस्‍मात् घरी बेशुद्ध झाले. माझे यजमान श्री. सतीश सरोदे आणि माझा लहान भाऊ शैलेश रेवेकर यांनी बाबांना रुग्‍णालयात भरती केले. काही वेळाने बाबा शुद्धीवर आले आणि म्‍हणाले, ‘‘आईला कळवू नका. मी आता बरा आहे. गुरुमाऊली सतत माझ्‍या समवेत आहेत.’’ असे बर्‍याच प्रसंगांत बाबा नेहमी सकारात्‍मक रहायचे.

२ ऐ. पू. अशोक पात्रीकर यांच्‍या संदर्भात बाबांना आलेल्‍या अनुभूती

२  ऐ १. पू. अशोक पात्रीकर यांना पाहून प.पू. गुरुमाऊलीच घरी आली असल्‍याचे बाबांना वाटणे : बाबांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्‍यांचे निधन होण्‍याच्‍या ६ दिवस आधी सनातनचे ४२ वे (समष्‍टी) संत पू. अशोक पात्रीकरकाका त्‍यांच्‍या प्रकृतीची विचारपूस करण्‍यासाठी घरी आले होते. बाबांना नुकतेच डायलिसिस करून घरी आणले होते. त्‍या वेळी त्‍यांना श्‍वास घ्‍यायला त्रास होत असल्‍याने ‘ऑक्सिजन’ द्यावा लागला होता. पू. पात्रीकरकाका आल्‍यावर त्‍यांना बरे वाटले. त्‍याही स्‍थितीत ते उठून बसण्‍याचा प्रयत्न करत होते. त्‍यांच्‍या चेहर्‍यावर आनंद जाणवत होता. पू. पात्रीकरकाकांना पाहून त्‍यांचा शरणागतभाव आणि कृतज्ञताभाव दाटून आला. ‘प्रत्‍यक्ष गुरुमाऊलीच पू. पात्रीकरकाकांच्‍या माध्‍यमातून घरी आले आहेत’, असे त्‍यांना वाटत होते. या आधी त्‍यांना प.पू. डॉक्‍टर डोळ्‍यांसमोर दिसत नव्‍हते; पण ‘आज मला प्रत्‍यक्ष गुरुमाऊलींनीच दर्शन दिले’, असे त्‍यांनी सांगितले.

हे दयानिधी गुरुमाऊली, ‘केवळ आपल्‍या असीम कृपेमुळेच अशा कठीण परिस्‍थितीत बाबांची सेवा आणि समष्‍टी सेवा आपण माझ्‍याकडून अन् घरातील सर्वांकडून करवून घेतली. शेवटपर्यंत आम्‍हाला स्‍थिर ठेवले, याबद्दल आम्‍ही आपल्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

 ३. सौ. शुभांगी म्‍हात्रे (कै. मधुकर रेवेकर यांची धाकटी मुलगी), पुणे 

सौ. शुभांगी म्‍हात्रे

३ अ. इतरांचा विचार करणे : ‘लहान-सहान गोष्‍टींमध्‍येही बाबा आधी इतरांचाच विचार करत असत. ‘माझ्‍यामुळे इतरांना त्रास होणार नाही ना ?’, हे ते आधी बघत असत.

३ आ. बाबा नेहमी सकारात्‍मक असायचे.

३ इ. बाबांच्‍या निधनानंतर जाणवलेली सूत्रे

१. बाबांचे निधन झाल्‍यावर मला पुण्‍याहून अकोल्‍याला यायला बरेच घंटे लागले. बाबांच्‍या निधनानंतर पुष्‍कळ घंट्यांनी बाबांना पाहूनही मला त्‍यांचा चेहरा आनंदी आणि शांत वाटला.

२. ‘त्‍यांचा नामजप आतून चालू आहे’, असे मला जाणवले.

३. बाबांनी मागील ६ वर्षे शारीरिक त्रास सहन केला. त्‍याचा लवलेशही त्‍यांच्‍या चेहर्‍यावर दिसत नव्‍हता. त्‍यामुळे गुरुदेवांप्रती पुष्‍कळ कृतज्ञता वाटून माझे मन स्‍थिर झाले.

गुरुमाऊलींच्‍या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’
(सर्व सूत्रांचा दिनांक ऑक्‍टोबर २०२३)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक