‘माझा सेवेनिमित्त सौ. संगीता कडूकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५० वर्षे), सौ. तनुजा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ३५ वर्षे) आणि श्री. रमेश लुकतुके (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ७४ वर्षे) या साधकांशी संपर्क होतो. तेव्हा माझ्या लक्षात आलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. सौ. संगीता कडूकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५० वर्षे), कोल्हापूर
१ अ. प्रेमभाव : ‘सौ. संगीता कडूकर प्रेमळ आहेत. मला त्यांना कोणतीही अडचण मनमोकळेपणाने सांगता येते.
१ आ. नम्र : त्या साधकांशी कधीही अधिकारवाणीने बोलत नाहीत.
१ इ. साधकांना साधनेत साहाय्य करणे : काकूंनी मला दायित्वाच्या विविध सेवा देऊन समष्टीत साहाय्य केले. त्यामुळे मला समष्टी सेवेतील आनंद घेता येऊ लागला. काकूंची निरीक्षणक्षमता चांगली आहे. त्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यात किंवा सत्संगात साधकांचे अचूक निरीक्षण करून साधकांना साहाय्य करतात. काकूंमुळे मला माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव झाली. ‘मी कुठे न्यून पडते ?’, हे माझ्या लक्षात येऊ लागले.
१ ई. चुकांविषयी संवेदनशीलता : काकू सत्संगात स्वत:ची चूक प्रांजळपणे सांगतात. त्यांना वाटत असलेली चुकांविषयीची खंत त्यांच्या बोलण्यातून लक्षात येते.’
२. सौ. तनुजा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ३५ वर्षे)
अ. ‘सौ. तनुजा गाडगीळ यांना सेवेतील अडचणी किंवा शंका विचारण्यासाठी केव्हाही भ्रमणभाष केल्यास त्या नम्रतेने अन् शांतपणे उत्तरे देतात.
आ. त्यांना सेवेविषयी काही विचारले आणि उत्तर मिळाले नाही, असे कधीही होत नाही. त्या सेवेत व्यस्त असूनही शांतपणे बोलतात. त्यांच्या बोलण्यात कधीही उतावळेपणा नसतो.
इ. मला त्यांच्याशी बोलल्यावर आधार वाटतो.
३. श्री. रमेश लुकतुके (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ७४ वर्षे)
३ अ. सेवेची तळमळ
१. काका त्यांना सांगितलेली प्रत्येक सेवा स्वीकारतात.
२. ते प्रत्येक सेवा चिकाटीने आणि परिपूर्ण करतात. रात्री कितीही उशीर झाला, तरीही ते दिवसभरातील सर्व सेवा आणि व्यष्टी साधना पूर्ण करतात. त्यांना रात्री झोपायला कितीही उशीर झाला, तरीही ते पहाटे लवकर उठून ध्यानमंदिरातील पूजेची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करतात. ‘उशीर झाला; म्हणून सेवा जमणार नाही’, असे त्यांना कधीही वाटत नाही. ते कधीच कोणतीही सवलत घेत नाहीत.
३. ते मला ‘सेवा परिपूर्ण कशी करायची ?’, याविषयी सांगतात.
३ आ. इतरांचा विचार करणे : साधकांना सेवेशी संबंधित पाकिटे पाठवतांना साधकांना ‘पाकिटात काय आहेे ?’, ते पाकीट पहाताक्षणी लक्षात यावे, अशा प्रकारे ते पाकिटावर लिहितात.
‘प.पू. गुरुदेव, मला अशा गुणवान साधकांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळत आहे’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘त्यांच्यामधील गुण शिकून मला पुढे जाता येऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. अर्पिता देशपांडे, सनातन आश्रम, मिरज. (२१.११.२०२२)