अग्‍नीशमनाच्‍या पद्धती

१. जळण / इंधन मिळू न देणे (स्‍टार्व्‍हिंग) : आगीला इंधनापासून वंचित केले किंवा इंधनपुरवठा बंद केला, तर आग त्‍वरित विझते. या पद्धतीला ‘स्‍टार्व्‍हिंग’ असे म्‍हणतात, उदा. गॅसची शेगडी विझवतांना आपण गॅसचा पुरवठा बंद करतो. शेगडी इंधन न मिळाल्‍याने विझते.

२. थंड करणे (कूलिंग) : जळणार्‍या पदार्थाचे तापमान त्‍या पदार्थाच्‍या ज्‍वलनबिंदूच्‍या खाली आणल्‍यास, म्‍हणजेच पदार्थातील उष्‍णता घटल्‍यास आग त्‍वरित विझते. अग्‍नीशमनाच्‍या या प्रकाराला ‘थंड करणे’ म्‍हणतात, उदा. जळत्‍या लाकडावर पाणी घालणे, मेणबत्ती फुंकर मारून विझवणे.

३. वायू बंद करणे / वायू तोडणे (स्‍मॉदरिंग) : प्राणवायूचा पुरवठा आगीपासून पूर्णपणे तोडल्‍यास किंवा हवेतील प्राणवायूचे प्रमाण १६ टक्‍क्‍यांपेक्षा घटल्‍यास आग त्‍वरित विझते. जळत्‍या मेणबत्तीवर काच झाकण्‍याच्‍या प्रयोगावरून हे सिद्ध होते. यालाच ‘हवा तोडणेे’ (स्‍मॉदरिंग) असे म्‍हणतात.

४. साखळी अभिक्रिया तोडणे : काही विशिष्‍ट रसायनांचा वापर करून ज्‍वलनाची साखळी अभिक्रिया तोडली जाऊन आग विझवता येते, उदा. हॅलॉन वायू.