सिंधुदुर्ग : दोडामार्ग येथे विजेच्या धक्क्याने २ म्हशींचा मृत्यू, तर १ गंभीररित्या घायाळ

महावितरणच्या दायित्वशून्यतेमुळे घटना घडल्याचा ग्रामस्थांचा आरोप

दोडामार्ग : दोडामार्ग शहरातील सावंतवाडा येथील चंद्रकांत बाबली शिरोडकर हे येथील पास्कूची तळी येथे १९ नोव्हेंबर या दिवशी सकाळी गुरांना चरण्यासाठी घेऊन गेले होते. त्या परिसरात एक विद्युत् खांब तारांसह पडलेला होता. या तारांना शिरोडकर यांच्या २ म्हशींचा स्पर्श होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. एक म्हैस यातून वाचली आहे; मात्र विजेच्या धक्क्याने ती गंभीररित्या घायाळ झाली आहे. यामुळे शिरोडकर यांची २ लाख रुपयांची हानी झाली आहे.

या घटनेनंतर घटनास्थळी आलेल्या महावितरणच्या अधिकार्‍यांना ग्रामस्थांनी चांगलेच खडसावले. ‘गेले ४ मास हा विद्युत् खांब पडलेला आहे. असे असतांना यावरील विद्युत् वाहिन्यांतून वीजप्रवाह कसा चालू राहिला ? त्यामुळे या घटनेला महावितरण आस्थापन उत्तरदायी आहे. महावितरणच्या दायित्वशून्यतेमुळे निष्पाप जिवांचा नाहक बळी गेला आहे. त्यामुळे शिरोडकर यांना अधिकाधिक हानीभरपाई द्यावी’, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. (खाली पडलेल्या खांबातील वीजवाहिन्यांमधून वीजप्रवाह चालू ठेवणे म्हणजे जनतेच्या जिवाशी खेळण्यासारखेच आहे ! या चुकीसाठी संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)