निरागसतेमागील राष्‍ट्रघातकी चेहरा !

संपादकीय

जल आणि वायू प्रदूषणसंदर्भातील रॅलीत ‘पॅलेस्टिनी समर्थक’ घोषणा दिल्यानंतर एका संतप्त माणसाने ग्रेटा थनबर्गचा ध्वनिवर्धक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला

नेदरलँड येथे जल आणि वायू प्रदूषण यांच्‍या संदर्भात नुकतीच एक रॅली काढण्‍यात आली होती. अशा रॅलीत चर्चा व्‍हायला हवी, ती खरेतर प्रदूषणमुक्‍तीच्‍या संदर्भात; पण चर्चा झाली ती पॅलेस्‍टाईनच्‍या मुक्‍तीसाठी अन् इस्रायलच्‍या विरोधात ! हे घडवले ग्रेटा थनबर्ग हिने. ग्रेटा खरेतर पर्यावरणवादी म्‍हणून ओळखली जाते. त्‍यामुळे तिचे रॅलीत सहभागी होणे स्‍वाभाविकच होते; परंतु इस्रायलच्‍या विरोधात घोषणा देऊन ती पॅलेस्‍टाईनच्‍या मुक्‍तीविषयी बोलू लागल्‍याने सर्वांनाच प्रश्‍न पडला. या प्रकारामुळे रॅलीतील एका तरुणाने संतप्‍त होऊन तिच्‍या हातातून ध्‍वनीवर्धक हिसकावून घेतला आणि तिला विषयांतर न करता प्रदूषणाच्‍या संदर्भात बोलण्‍यास सांगितले. उपस्‍थितांनीही तरुणाला दुजोरा दिल्‍याने ग्रेटा आणि तिचे समर्थक चिडले. त्‍यांनी तरुणाला व्‍यासपिठावरून खाली उतरवले. इतकी वर्षे पर्यावरणवादी म्‍हणवल्‍या जाणार्‍या ग्रेटाचा मुखवटा टराटरा फाडला गेला. तिचे खरे रूप सर्वांसमोर उघड झाले. ‘पॅलेस्‍टाईन मुक्‍त झाल्‍यासच जलवायूला न्‍याय मिळेल’, यासाठी हा खटाटोप असल्‍याचे तिने सांगितले; पण सत्‍य काही वेगळेच आहे. अल्‍प कालावधीत प्रसिद्धी मिळालेल्‍या अशा व्‍यक्‍तीमत्त्वाच्‍या आडून एकप्रकारे ‘हमास’चे समर्थन करण्‍याचाच हा प्रकार आहे, हे वेगळे सांगायला नको ! ‘आपल्‍याला लोक मानत असल्‍याने आपण जे सांगू, त्‍यावर ते विश्‍वास ठेवतील’, असे तिला वाटत असावे; पण नागरिक इतकेही दूधखुळे नाहीत की, कुणाचे समर्थन करावे ? आणि कुणाला विरोध करावा ?, हे त्‍यांना कळणार नाही ! हे ग्रेटाने लक्षात ठेवावे.

ग्रेटा थनबर्ग : ‘हमास’चे समर्थन करण्‍याचाच हा प्रकार !

असंवेदनशील ग्रेटा !

नेदरलँडमधील ही घटना ताजी आहेच; पण काही दिवसांपूर्वी ग्रेटाने सामाजिक माध्‍यमांवर एक पोस्‍ट केली होती. त्‍यात तिने लिहिले होते, ‘मी गाझाच्‍या लोकांसमवेत आहे. जगाने एकत्र येऊन तातडीने युद्धबंदीची मागणी केली पाहिजे. पॅलेस्‍टिनींना न्‍याय आणि स्‍वातंत्र्य मिळायला हवे.’ वयाच्‍या अवघ्‍या २० व्‍या वर्षी ग्रेटाने अशी मागणी करणे आश्‍चर्यकारक; पण तितकेच संतापजनकही आहे. ‘युद्धबंदीची मागणी करणारी ग्रेटा स्‍वतःला अधिक शहाणी समजते का ?’ अशा स्‍वरूपात नागरिकांच्‍या प्रतिक्रिया उमटल्‍या. तिच्‍या मागणीवरून ‘ती आतंकवादाचे समर्थन करते’, हे उघड आहे. पॅलेस्‍टाईनविषयी ग्रेटाला असणारी सहानुभूती तिच्‍यातील कथित मानवतावादच दर्शवते. अशी ग्रेटा पर्यावरणवादी म्‍हणून जगासमोर, तसेच विद्यार्थ्‍यांसमोर आदर्श कशी काय असू शकते ? खरेतर तिच्‍यापासून सर्वांनी सावध रहायला हवे. अशा ग्रेटाला आदर्श मानणे बंदच करावे. तिला पर्यावरण, तसेच प्रदूषण यांविषयी बोलण्‍याचा अधिकारच नाही. ज्‍या आतंकवादी संघटनेने (हमासने) अनेक लोकांना ओलीस ठेवले आणि अनेकांच्‍या हत्‍या केल्‍या, अशा संघटनेला पाठिंबा देणे चुकीचे आहे. हमासने लहान मुलांनाही अतिशय क्रूर पद्धतीने मारून टाकले. अनेक मुली आणि महिला यांच्‍यावर पाशवी बलात्‍कार केले. हे ग्रेटाला कधी दिसले नाही का ? त्‍यांचा आक्रोश आणि किंकाळ्‍या ग्रेटाला ऐकू गेल्‍या नाहीत का ? पर्यावरणाचा पुळका असलेली ग्रेटा मानवतेविषयी इतकी असंवेदनशील कशी ? हमासमुळे जग तिसर्‍या महायुद्धाकडे चालले असतांना थेट व्‍यासपिठावरून ग्रेटाने केलेले विधान, तसेच सामाजिक माध्‍यमांवरील पोस्‍ट ही संपूर्ण जगासाठी धोकादायकच आहे. पॅलेस्‍टाईनचे समर्थन आणि इस्रायलला विरोध केल्‍याने इस्रायलच्‍या शिक्षण मंत्रालयाने ग्रेटा थनबर्ग हिचा धडा शालेय अभ्‍यासक्रमातून काढून टाकण्‍याचा निर्णय घेतला. हा निर्णय अतिशय योग्‍यच म्‍हणावा लागेल; कारण प्रसिद्धीची हवा डोक्‍यात गेल्‍यावर जगातील मान्‍यवर मंडळी बेताल विधाने करायला मोकळी होतात. साहजिकच अशा स्‍वरूपाच्‍या निर्णयामुळे त्‍यांच्‍या बोलण्‍याला चाप तरी बसेल, तसेच अन्‍य पर्यावरणवादीही सतर्क होतील. आतंकवाद, तसेच खलिस्‍तानवाद यांची पाठराखण करणार्‍यांचे धडे वाचून विद्यार्थी काय बोध घेणार ? त्‍यापेक्षा ते धडे वगळलेलेच बरे ! इस्रायलने ज्‍याप्रमाणे लगेच उपाययोजना केली, त्‍याप्रमाणे अन्‍य राष्‍ट्रांनीही अशा राष्‍ट्रघातक्‍यांच्‍या विरोधात सडेतोड भूमिका घ्‍यायला हवी.

‘ग्रेटा थनबर्ग’ यापुढे शैक्षणिक आणि नैतिक आदर्श नाही’ : इस्रायलने ग्रेटा थनबर्गला शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकले !

दुटप्‍पी पर्यावरणवादी !

एरव्‍ही मानवाधिकाराचा ठेका घेऊन मिरवणारे पर्यावरणवादी ग्रेटाच्‍या या भूमिकेविषयी आता मूग गिळून गप्‍प का ? पर्यावरण आणि आतंकवाद हे दोन्‍ही विषय जरी संपूर्ण जगाशी संबंधित असले, तरी ते पूर्णतः वेगळे आहेत. त्‍यामुळे ग्रेटाने यापुढे काहीही बरळू नये, असे सर्वांना वाटते. वयाच्‍या ११ व्‍या वर्षापासून जरी स्‍वत: पर्यावरणाविषयी कामे करत असली, तरी ‘मला सर्वकाही कळते’, अशा आविर्भावात न रहाता वास्‍तवाचे भान राखायला तिने शिकावे. वर्ष २०२१ मध्‍ये भारतातील देहलीत झालेल्‍या शेतकरी आंदोलनाला ग्रेटाने पाठिंबा देत खलिस्‍तानवादाचे समर्थन केले होते; पण अमेरिकेतील वर्णद्वेषी अत्‍याचार, काश्‍मीरमधील हिंदूंचा वंशसंहार, तसेच पाकिस्‍तानमधील अल्‍पसंख्‍यांकांवर होणारे अत्‍याचार, यांविरोधात तिने कधी आवाज उठवल्‍याचे ऐकिवात नाही. हा दुटप्‍पीपणा नव्‍हे का ?

खर्‍या प्रदूषणकर्त्‍यांना शोधा !

इस्रायलच्‍या ठिकाणी मुसलमान राष्‍ट्र निर्माण करण्‍याची स्‍वप्‍ने राष्‍ट्रघातकी लोक पहात आहेत. इस्रायल आणि हमास यांच्‍या माध्‍यमातून जग तिसर्‍या महायुद्धाकडे सरकत असल्‍याचे अनेक मान्‍यवरांनी सांगितलेही आहे. असे असतांना आतंकवादाचे समर्थन करण्‍याच्‍या माध्‍यमातून हे पर्यावरणवादी जगातील वातावरण दूषित करू पहात आहेत. एरव्‍ही प्रदूषणाला विरोध करणारे हेच लोक वैचारिक आणि राष्‍ट्रविरोधी प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत, हेही तितकेच खरे आहे. अशांचे कुणाकुणाशी संबंध आहेत ? तसेच त्‍यांची मानसिकता कशी आहे ? ही माहिती घेणे अपरिहार्य आहे. ते जाणून घेतल्‍यासच पर्यावरणप्रेमाच्‍या निरागसतेमागील राष्‍ट्रघातकी चेहरे आपसूकच सर्वांच्‍या समोर येऊन त्‍यांचे बिंग फुटेल, हे निश्‍चित !

ग्रेटा थनबर्ग हिचा धडा अभ्‍यासक्रमातून वगळणार्‍या इस्रायलप्रमाणे अन्‍य राष्‍ट्रांनी राष्‍ट्रविरोधकांना सडेतोड प्रत्‍युत्तर द्यावे !