‘माझी आजी श्रीमती चित्राबाई पाटील ही ८३ वर्षांची आहे. वयोमानानुसार तिला दिसणे किंवा ऐकू येणे न्यून झाले असून तिला सांधेदुखीसारखे अनेक शारीरिक त्रास होतात. असे असले, तरी ती प्रत्येक कृती व्यवस्थितच करते. मला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. स्वावलंबी
या वयातही आजी स्वतःची कामे स्वतःच करण्याचा प्रयत्न करते.
अ. ती प्रतिदिन स्वतःचे धुतलेले कपडे घड्या करून कपाटात व्यवस्थित ठेवते.
आ. ती अधूनमधून स्वतःचे कपाट आवरते आणि कपाटात अनावश्यक वस्तू असतील, तर त्या बाहेर काढते.
इ. आजीला शारीरिक व्याधींसाठी काही औषधे चालू आहेत. ‘ती औषधे कुठल्या वेळी आणि किती घ्यायची ?’, हे तिने समजून घेतले आहे. ती स्वतः काळजीपूर्वक आणि वेळेवर औषधे घेते.
२. स्वच्छतेची आवड
ती तिचे स्नान झाल्यावर प्रतिदिन स्नानगृह आणि अंघोळीची बालदी यांची स्वच्छता करते.
३. नीटनेटकेपणा
आजीला नीटनेटके रहायला आवडते. ती झोपून उठल्यावर पलंगावरील चादर झटकून नीट व्यवस्थित घालते आणि पांघरूण नीट घडी घालून ठेवते.
४. इतरांचा विचार करणे
अ. ‘स्वतःमुळे इतरांना त्रास होऊ नये’, या विचाराने ती स्वतःची कामे स्वतःच करण्याचा प्रयत्न करते. ती तिला नेहमी लागणार्या वैयक्तिक वस्तू, आध्यात्मिक उपायांचे साहित्य आणि औषधे तिच्याजवळच ठेवते.
आ. कधी माझ्या आईला साहाय्याची आवश्यकता असते, तेव्हा आजी तिला बसून जेे साहाय्य करणे शक्य असेल, ते सर्व साहाय्य करते, उदा., लसूण सोलणे, भाजी निवडणे, कपड्यांच्या घड्या घालणे, इत्यादी.
५. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
अ. कधी कधी आजीला ‘कुठली प्रार्थना करावी ?’, हे लक्षात येत नाही; म्हणून तिने माझ्याकडून एका कागदावर प्रार्थना आणि एका कागदावर कृतज्ञता लिहून घेतल्या आहेत. ती दिवसातून ४ – ५ वेळा त्या प्रार्थना वाचून करते आणि कृतज्ञता व्यक्त करते.
आ. काही मासांपूर्वी आजी धुळे येथे माझ्या आत्याकडे गेली होती. तेव्हा तिचे उपायांचे साहित्य आणि प्रार्थनेचे कागद आत्याकडेेच राहिले. घरी परत आल्यावर तिच्या ते लक्षात आले. ‘ते साहित्य लवकरात लवकर परत मिळावे’, यासाठी तिने सलग अनेक दिवस आत्याचा पाठपुरावा केला. त्यातून ‘स्वतःची व्यष्टी साधना थांबू नये’, यासाठी असलेली तिची तळमळ माझ्या लक्षात आली.
इ. प्रत्येक कृती झाल्यावर ‘देवानेच माझ्याकडून ही कृती करून घेतली’, असा तिच्या मनात कृतज्ञतेचा भाव असतो.
ई. कधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला व्यष्टी साधना करणे जमत नाही, तेव्हा तिला त्याची खंत वाटते.
६. भाव
६ अ. सद़्गुरु नंदकुमार जाधव यांच्याप्रती असलेला भाव !
१. आजीच्या मनात सद़्गुरु नंदकुमार जाधव यांच्याप्रती अपार भाव आहे. ‘सद़्गुरु जाधवकाका हे गुरुदेवांचे सगुण रूप आहेत’, असे ती मला नेहमी सांगते. सद़्गुरु जाधवकाका आमच्या घरी येतात, तेव्हा त्यांच्या दर्शनानेही तिचा भाव जागृत होतो.
२. मी जळगाव सेवाकेंद्रात असतांना आजीचा मला भ्रमणभाष आल्यावर मी तिला विचारते, ‘‘तुला सद़्गुरु जाधवकाकांची आठवण येते, तर त्यांच्याशी भ्रमणभाषवर बोलतेस का ?’’ तेव्हा ती मला सांगते, ‘‘त्यांचा वेळ घ्यायला नको. त्यांना केवळ माझा नमस्कार सांग.’’
६ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
१. आजीच्या खोलीमध्ये ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ एका आसंदीवर ठेवला आहे. आजी नियमितपणे आसंदी आणि ग्रंथ पुसते. त्या आसंदीवरील शाल पालटून पुन्हा तो ग्रंथ आसंदीवर नीट ठेवते.
२. तो ग्रंथ पहातांना तिचा भाव जागृत होतो. ती गुरुदेवांच्या छायाचित्राशी बराच वेळ बोलते.
३. आजी गुरुदेव, श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या सतत अनुसंधानात असते.’
– कु. सायली पाटील (आजींची नात), जळगाव सेवाकेंद्र. (३०.१०.२०२३)