आस्‍तिकांची निरर्थक भीती !

वेदमूर्ती श्री. भूषण दिगंबर जोशी

१. समाजातील अनेक आस्‍तिक सश्रद्ध मंडळी मंदिरात जातांना सर्वप्रथम आधी आजूबाजूला पहातात, ‘आपणास कुणी बघत तर नाही ना ?’, ही निश्‍चिती करूनच मग मंदिरात जातात.

२. अनेक जण पूजा करतांना कपाळावर गंध अथवा कुंकूम तिलक किंवा भस्‍म लावतात आणि बाहेर जातांना तो व्‍यवस्‍थित पुसून बाहेर पडतात.

३. एखादे अनुष्‍ठान, पूजा, जप, यज्ञयाग करतात; पण त्‍याची प्रसिद्धी होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतात.

४. एखाद्या कर्माच्‍या आरंभी जानवे (यज्ञोपवीत) घातले जाते आणि कर्म संपल्‍यावर ते जानवे आठवणीने काढून ठेवले जाते अन् मगच कामाला जातात.

५. घरी सश्रद्ध असणारा, धर्मकृत्‍य करणारा बाहेर मात्र मित्रमंडळींमध्‍ये ‘आपण जास्‍त देव देव करत नाही. काम हाच माझा देव’, असे धादांत असत्‍य विधान करतात.

६. एखाद्या आस्‍तिक सश्रद्ध माणसाने घरी करत असलेल्‍या पूजेचे, यज्ञाचे, कुलाचार वगैरेंची छायाचित्रे ‘सोशल मिडिया’वर (सामाजिक माध्‍यमांवर) प्रसारित केले की, ‘देवधर्म आपल्‍यापुरता करावा, जगाला प्रदर्शन का करायचे ?’, ‘आम्‍हाला ही थेर मान्‍य नाहीत. असली प्रदर्शने करण्‍यापेक्षा देवधर्म न केलेला बरा !’, असे तत्त्वज्ञान मांडतात.

आस्‍तिकांनी स्‍वतःची आस्‍तिकता दाखवली, तर बिघडले काय ?

आपल्‍या सभोवताली अशी अनेक आस्‍तिक सश्रद्ध मंडळी या मानसिक दबावात असतात आणि हा दबाव वा न्‍यूनगंड त्‍यांच्‍यावर लहानपणापासून तथाकथित खोटे सुधारणावादी की, जे नास्‍तिक असतात, त्‍यांनी अप्रत्‍यक्षपणे बिंबवलेला असतो. जर नास्‍तिक जाहीर व्‍यासपिठावर, विविध वृत्तपत्रे, समाजमाध्‍यमे यांमधून स्‍वतःच्‍या नास्‍तिकतेचा डिंगोरा पिटतात, तर आस्‍तिकांनी स्‍वतःची आस्‍तिकता दाखवली, तर बिघडले काय ?

छत्रपती शिवरायांनी जर उघड उघड राज्‍याभिषेक सोहळा धार्मिक पद्धतीने केला, तर मग आपण आस्तिकता का लपवायची ?

छत्रपती शिवरायांचे स्‍वतःचे सैन्‍य, आरमार, किल्ले आणि सर्व वैभव होते. सर्वजण त्‍यांना राजा मानत होते. तरीही छत्रपतींनी स्‍वत:चा भव्‍य दिव्‍य असा राज्‍याभिषेक सोहळा धार्मिक पद्धतीने उत्‍साहात केला. देशोदेशीचे प्रतिनिधी बोलावून केला. याचे कारण त्‍यांना दिखावा करायचा नव्‍हता, तर हे ‘हिंदवी स्‍वराज्‍य आहे’, हे आजूबाजूच्‍या सर्व यवनी साम्राज्‍यांना ठामपणे दाखवून द्यायचे होते. ‘तुम्‍ही मंदिरांचा विध्‍वंस करून जर बुतशिकनसारख्‍या पदव्‍या अभिमानाने मिरवता, तर आस्‍तिक सश्रद्ध हिंदूंच्‍या रक्षणासाठी तत्‍पर असलेले हे प्रौढप्रताप पुरंदर राजा शिवछत्रपती आहेत, याची जरब बसणेही आवश्‍यक आहे’, याकरताचा हा प्रपंच होता.

जानवे शर्टच्‍या आत असते, त्‍याचा बाहेरच्‍या अन्‍य मंडळींना कोणताच त्रास होत नाही, तरीही ‘ते काय म्‍हणतील ?’, म्‍हणून मी माझे जानवे काढून का टाकावे ? ‘माझ्‍या आस्तिकपणामुळे दुसर्‍यांना वाईट वाटेल, ते माझी चेष्‍टा करतील’, याची भीती का धरावी ? आपण त्‍यांना ठामपणे ‘हा माझा श्रद्धेचा भाग आहे, याची चेष्‍टा केली, तर मला चालणार नाही’, असे ठामपणे सांगितले पाहिजे. नास्‍तिक जर उघड उघड चेष्‍टा करतात, तर आस्‍तिकांनीही स्‍वतःचे अस्‍तित्‍व ठामपणे दाखवलेच पाहिजे. त्‍यामुळे आपण आपल्‍या मनातील न्‍यूनगंड हटवायला हवा !

– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, जिल्‍हा सिंधुदुर्ग.