प्रत्‍येक सेवा नियोजनबद्ध आणि परिपूर्ण करणारे अन् साधकांना सातत्‍याने साहाय्‍य करणारे सनातनचे १०२ वे (समष्‍टी) संत पू. शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे) !

‘पू. शिवाजी वटकर यांनी साधनेच्‍या आरंभापासूनच मला कसे शिकवले ? आणि माझ्‍याकडून कशी साधना करून घेतली ?’, याविषयी मला जाणवलेली सूत्रे मी कृतज्ञताभावाने पू. वटकरकाकांच्‍या चरणी अर्पण करत आहे.

 ‘वर्ष १९९७ पासून प.पू. गुरुदेवांच्‍या कृपेमुळे पू. वटकरकाका आमच्‍या (मी आणि माझी पत्नी सौ. हेमलता यांच्‍या) जीवनात आले. ‘प.पू. गुरुदेवांनी त्‍यांना अपेक्षित अशी आमची साधना होण्‍यासाठी पू. वटकरकाकांना आमच्‍याशी जोडून दिले’, असे मला वाटते. माझ्‍या लक्षात आलेले त्‍यांचे काही वैशिष्‍ट्यपूर्ण गुण येथे दिले आहेत.

पू. शिवाजी वटकर

१. प्रेमभाव

पू. वटकरकाका आमच्‍याकडे येतांना प्रतिदिन त्‍यांच्‍या घरासमोरच्‍या बागेतील ८ – १० फुले घेऊन यायचे आणि ती देवपूजेसाठी माझ्‍या पत्नीकडे द्यायचे. पत्नीला या गोष्‍टीचे पुष्‍कळ कौतुक वाटायचे. त्‍यातून मला त्‍यांच्‍या मनात आमच्‍या कुटुंबाविषयी असलेला प्रेमभाव जाणवायचा.

२. नियोजनकौशल्‍य

श्री. यशवंत वसाने

‘पू. वटकरकाका प्रत्‍येक छोट्या-मोठ्या कृतीही अगदी नियोजनबद्ध करतात’, हे त्‍यांच्‍या समवेत राहून माझ्‍या लक्षात आले आणि शिकता आले. ‘ते प्रत्‍येक सेवेचे नियोजन करतात आणि त्‍याचे काटेकोरपणे पालन कसे करायचे ?’, ते आम्‍हाला स्‍वतःच्‍या कृतीतून शिकवतात.

३. साधनेसाठी केलेले साहाय्‍य !

अ. आम्‍हा पती-पत्नीकडून चिकाटीने नामजप आणि मीठ-पाण्‍याचे उपाय करून घेणे : ते प्रतिदिन पहाटे ५ ते ६ वाजता शुचिर्भूत होऊन आमच्‍याकडे येत असत. ते स्‍वतःही नामजप आणि मीठ-पाण्‍याचे उपाय करत अन् आमच्‍याकडूनही करून घेत असत. तेव्‍हा मला त्‍यांच्‍यातील चिकाटी आणि तळमळ हा गुण प्रकर्षाने जाणवला.

४. सेवेची तळमळ आणि नियोजनबद्ध सेवा करणे

४ अ. सत्‍संगातील जिज्ञासूंची रुची पाहून ‘सत्‍संगात कुठली सूत्रे घ्‍यायची’, याचे नियोजन करणे : त्‍यांच्‍या प्रयत्नाने चेंबूर (मुंबई) मधील सुभाषनगर येथील हनुमान मंदिरात सत्‍संग चालू झाला. पू. वटकरकाकांनी पहिले ५ – ६ सत्‍संग घेतले. सत्‍संग घेतांना ते सत्‍संगातील जिज्ञासूंचा बारकाईने अभ्‍यास करायचे. ‘जिज्ञासूंना साधनेची कितपत आवड आहे ?,त्‍यांची ऐकण्‍याची आणि कृती करण्‍याची तळमळ किती आहे ?’, हे लक्षात घेऊन ते पुढील सत्‍संगात कुठली सूत्रे सांगायची’, याचा अभ्‍यास करत असत. जिज्ञासूंना साधनेत साहाय्‍य होण्‍यासाठी ते प्रयत्न करत असत. त्‍यांच्‍या अशा कृतीतून आम्‍हाला पुष्‍कळ शिकायला मिळायचे.

४ आ. आषाढी एकादशीच्‍या वेळी तळमळीने आणि नियोजनपूर्वक केलेली सेवा !

४ आ १. आषाढी एकादशीनिमित्त अध्‍यात्‍मप्रचारासाठी पंढरपूर येथे जाणे : एका वर्षी मुंबईतून आम्‍ही ७ – ८ साधक आषाढी एकादशीनिमित्त अध्‍यात्‍मप्रचार करण्‍यासाठी पंढरपूर येथे गेलो होतो. तिथे ४ – ५ दिवस प्रचार, ग्रंथप्रदर्शन आणि वैयक्‍तिक संपर्क इत्‍यादी करून आम्‍ही मुंबईला परत निघालो.

४ आ २. आषाढी एकादशीनिमित्त काढलेल्‍या साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या विशेषांकांचे वितरण करून घेणे : आषाढी एकादशीनिमित्त साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक काढला होता. आम्‍ही पंढरपूरहून निघतांना पू. वटकरकाकांनी साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चे ३० विशेषांक विकत घेतले. बस चालू झाल्‍यानंतर त्‍यांनी ते अंक माझ्‍याकडे देऊन मला बसमध्‍ये त्‍याचे वितरण करायला सांगितले. मी थोडा भांबावलो. मी त्‍यांना म्‍हणालो, ‘‘मला जमेल का ?’’ तेव्‍हा ते मला म्‍हणाले, ‘‘जमणार. प्रयत्न करा.’’ तेव्‍हा ‘प.पू. गुरुदेवच मला सांगत आहेत’, असे मला जाणवले.

४ आ ३. बसमध्‍ये साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या सर्व अंकांचे वितरण होणे : मी प्रार्थना करून प्रथम बसवाहकाची अनुमती घेतली आणि बसमध्‍ये पुढे जाऊन उभा राहिलो. तेव्‍हा ‘मी काय बोललो ?’, ते मला समजले नाही; मात्र सर्व ३० ही साप्‍ताहिकांंचे वितरण झालेे आणि ४ जणांनी वर्गणीदार होण्‍यासाठी त्‍यांचे पत्ते दिले. ते पत्ते मी त्‍या त्‍या गावातील उत्तरदायी साधकाला कळवले. यामध्‍ये ‘पंढरपूरपासून पुण्‍यापर्यंतचा ४ घंट्यांचा प्रवास कधी संपला ?’, हे मला समजलेही नाही.

४ आ ४. पू. वटकर यांनी विशेषांक वितरणासाठी केलेले नियोजन : या प्रसंगातून माझ्‍या लक्षात आले, ‘ते त्‍यांच्‍या समवेत असलेल्‍या साधकांच्‍या सेवेचेही नियोजन करून त्‍याच्‍याकडून सेवा करून घेतात.’ त्‍यांंनी साप्‍ताहिकाच्‍या विशेषांकांच्‍या वितरणाचे सुयोग्‍य नियोजन करून साप्‍ताहिकाचे ३० विशेषांक आणि वितरणासाठी लागणारे थोडे सुटे पैसे समवेत घेतले होते.

४ इ. महाशिवरात्रीच्‍या ग्रंथप्रदर्शनाचे केलेले नियोजन !

४ इ १. दिवसभर साधिका उन्‍हामध्‍ये छत्रीखाली उभे राहून ग्रंथवितरण करतांना पाहून पू. वटकर यांनी पुढच्‍या वर्षी आधीच योग्‍य नियोजन करण्‍याचे ठरवणे : आम्‍ही मंडला (मानखुर्द, मुंबई) येथे रहात होतो. तेथे ‘श्री नर्मदेश्‍वर’ नावाचे शिवमंदिर आहे. तिथे महाशिवरात्रीनिमित्त सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावले जाते. एकदा दिवसभर २ साधिका तिथे उन्‍हामध्‍ये छत्रीखाली सेवा करत होत्‍या. ते पाहून पू. वटकरकाका मला भेटून म्‍हणाले, ‘‘पुढील वर्षी आपण मोठी जागा पाहू.’’

४ इ २. पुढच्‍या वर्षी ग्रंथप्रदर्शनाचे चांगले नियोजन केल्‍यामुळे पुष्‍कळ वितरण होणे : पुढच्‍या वर्षी पू. वटकरकाकांनी महाशिवरात्रीच्‍या एक मास आधीच ग्रंथप्रदर्शनाचे नियोजन करायला आरंभ केला. ते मला पुढे करून स्‍वतः नेतृत्‍व करत होते. परिणामी मुंबईत सर्वांत अधिक दुसर्‍या क्रमांकाचे वितरण होऊन पुष्‍कळ चांगला प्रचार झाला.

४ ई. दिवाळीच्‍या वेळी २५ आकाशकंदिलांचे सहजतेने वितरण करून देणे : ‘सेवा करतांना मला कुठलीही अडचण आली, तर प.पू. गुरुदेव पू. वटकरकाकांच्‍या माध्‍यमातून माझी अडचण सोडवतात’, असे मी नेहमीच अनुभवतो. दीपावलीसाठी सनातनचे आकाशकंदील कुर्ला आणि मानखुर्द (मुंबई) येथील सेवाकेंद्रात सिद्ध केले जात असत. माझ्‍याकडे कुर्ला सेवाकेंद्रातून २५ आकाशकंदिल आणून ते मानखुर्द ते चेंबूर परिसरात वितरण करायची सेवा होती. दिवाळीसाठी केवळ ४ दिवस राहिले होते. त्‍यामुळे मला ताण आला. माझी पत्नी मला म्‍हणाली, ‘‘पू. वटकरकाकांना सांगूया.’’ मी तिला म्‍हणालो, ‘‘त्‍यांच्‍याकडे पुष्‍कळ सेवा असतात. त्‍यांना वेळ नसतो.’’ ती म्‍हणाली, ‘‘विचारून तर पहा.’’ शेवटी तिनेच पू. वटकरकाकांना ही अडचण सांगितली. लगेच दुसर्‍याच दिवशी पू. वटकरकाका त्‍यांच्‍या कार्यालयातून एक-दीड घंटा लवकर घरी आले. त्‍यांनी त्‍यांच्‍या चारचाकी गाडीत मला समवेत घेतले आणि कुर्ल्‍याहून २५ आकाशकंदिल आणून त्‍यांचे वितरणही करून दिले.

वरील सर्व प्रसंगांतून ‘मी केले, तर काही होत नाही; परंतु प.पू. गुरुदेवांच्‍या कृपेने पू. वटकरकाकांना अडचण सांगितल्‍यावर सेवा चांगली होऊन आनंद मिळतो’, असे माझ्‍या लक्षात आले.

५. पत्नी रुग्‍णाईत असतांना साहाय्‍य करून दिलेला आधार !

माझी पत्नी रुग्‍णाईत झाल्‍यावर तिला ‘जसलोक’ रुग्‍णालयामध्‍ये भरती केले होते. तेव्‍हा पू. वटकरकाका प्रतिदिन २ वेळा भ्रमणभाष करून तिची विचारपूस करत असत. तिला रक्‍त द्यावे लागायचे, तेव्‍हा ते उत्तरदायी साधकांना सांगून मला साधकांचे साहाय्‍य आणि ‘ब्‍लड डोनेटर कार्ड’ उपलब्‍ध करून देत असत. त्‍यांना वेळ मिळाल्‍यावर ते पत्नीला भेटायला रुग्‍णालयात यायचे आणि तिच्‍या त्‍या स्‍थितीतही तिच्‍या साधनेचा पाठपुरावा घ्‍यायचे, उदा. ‘नामजप होतो का ?, किती होतो ?’

ते भेटून गेल्‍यानंतर २ – ३ दिवस पत्नी आनंदात असायची. ‘जणू परम पूज्‍यच भेटून गेले’, असे तिला वाटायचे. पू. वटकरकाका तिच्‍याशी भ्रमणभाषवर बोलले, तरी तिला आनंद होत असे.

६. साधकांना सातत्‍याने साधनेसाठी साहाय्‍य करणारे पू. वटकरकाका !

२१.३.२०२२ पासून मी देवद आश्रमामध्‍ये वास्‍तव्‍यासाठी आलो आहे. तिथेही गुरुकृपेने त्‍यांचे माझ्‍याकडे सतत लक्ष असते. तसे त्‍यांचे सर्व साधकांकडे नेहमीच लक्ष असते. भोजनकक्षामध्‍ये प्रतिदिन साधकांसह प्रसाद-महाप्रसाद घेत असतांनाही ते नेहमीच साधकांशी साधनेसंदर्भात बोलतात; म्‍हणून त्‍यांच्‍या पटलावर जागा असल्‍यास आम्‍ही त्‍यांच्‍या शेजारी बसतो किंवा ते आमच्‍या शेजारी येऊन बसतात. ते तो वेळही साधनेसाठी उपयोगात आणतात.

ते साधकांच्‍या चुकाही वेळोवेळी लक्षात आणून देतात आणि ‘त्‍यात पालट होत आहे का ?’, हेही पहातात. ते आमच्‍याकडून लेख लिहून घेतात आणि ‘ते कसे लिहिले, तर ते प.पू. गुरुदेवांना आवडतील’, हेही शिकवतात.

गुरुदेवांच्‍या कृपेने पू. वटकरकाकांची कृती आणि बोलणे यांतून मला पुष्‍कळ शिकायला मिळते. त्‍यासाठी प.पू. गुरुदेव आणि पू. वटकरकाका यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. यशवंत दौलतराव वसाने (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ७५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.१०.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक