खलिस्‍तानच्‍या माध्‍यमातून भारताला उद़्‍ध्‍वस्‍त करू पहाणारा पाकिस्‍तान !

१. खलिस्‍तानच्‍या विचारांची वाढती तीव्रता आणि परिणाम !

खलिस्‍तानचा विषय अनेक वर्षांपासून देशात चर्चिला जात आहे. पंजाबला भारतापासून तोडण्‍याचा प्रयत्नही वारंवार होत आहे. ‘खलिस्‍तान’ बनवण्‍याच्‍या षड्‌यंत्राला भारत स्‍वतंत्र झाल्‍यापासून प्रारंभ झाला; परंतु पंजाबची तीन भागांत वाटणी झाल्‍यामुळे आणि ‘पंजाब शिरोमणी अकाली दला’चा पंजाबवरील प्रभाव अल्‍प झाल्‍यामुळे खलिस्‍तानच्‍या विचारांचा जोर अधिक वाढला. त्‍याच वेळी जरनैलसिंह भिंदरवाला याचा उदय झाला. प्रारंभीच्‍या काळात तत्‍कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि पंजाब काँग्रेसचे अध्‍यक्ष ज्ञानी झैलसिंग यांनी शिरोमणी अकाली दलाला कमकुवत करण्‍यासाठी भिंदरवाला याचा उपयोग करून घेतला; परंतु कालांतराने भिंदरवाला याचा प्रभाव वाढत गेला. त्‍याचा परिणाम ‘ऑपरेशन ब्‍ल्‍यू स्‍टार’ आणि इंदिरा गांधी यांची हत्‍या या स्‍वरूपात दिसून आला.

मध्‍यंतरीच्‍या काळात खलिस्‍तानच्‍या मागणीचा आवाज न्‍यून झाला होता; पण शांत झालेला नव्‍हता. आता अमृतपाल सिंहच्‍या रूपाने तो पुन्‍हा वाढला आहे. ‘भिंदरवाला – २’ म्‍हणून हा अमृतपालसिंह स्‍वतःची ओळख करून देत आहे.

२. खलिस्‍तानकडून उघड होणारे नकाशे आणि त्‍यामागील षड्‍यंत्र !

खलिस्‍तानी संघटना प्रत्‍येकी २ – ४ मासांनी परदेशात आंदोलने करतात. त्‍यांनी खलिस्‍तानचा नकाशाही सिद्ध केला आहे. खलिस्‍तानवाद्यांनी आजपर्यंत जे नकाशे उघड केले आहेत, त्‍या नकाशात केवळ भारतातील राज्‍यांचाच समावेश आहे. याचा अर्थ पाकिस्‍तानच्‍या कह्यात असलेल्‍या पंजाबला खलिस्‍तानवादी आपला पंजाब मानत नाहीत. पाकिस्‍तानात असलेल्‍या ‘नानकाना साहब’लासुद्धा खलिस्‍तानी मानत नाहीत का ? कारण नानकाना साहब हे असे स्‍थान आहे की, जेथे शिखांचे पहिले गुरु नानकदेव यांचा जन्‍म झाला होता. शिखांसाठी हे अत्‍यंत पवित्र स्‍थान आहे. याचा खलिस्‍तानवाद्यांना कसा विसर पडला ? अर्थात् हा विसर पडलेला नाही, तर तो एका षड्‌यंत्राचा एक भाग आहे.

३. पाकिस्‍तानी गुप्‍तहेर संघटनेची खलिस्‍तानवाद्यांना फूस !

भारताविरुद्ध कटकारस्‍थान रचण्‍यासाठी पाकिस्‍तानी गुप्‍तहेर संघटना ‘आय.एस्.आय.’ खलिस्‍तानवाद्यांना निधी पुरवते. त्‍यामुळे खलिस्‍तानी आपल्‍या नकाशात पाकिस्‍तानच्‍या हिश्‍श्‍यात असलेल्‍या पंजाबचा भूभाग कशाला दाखवतील ?

४. पाकचे विकृत स्‍वप्‍न कधीच साकार होणार नाही !

पाकिस्‍तान अनेक वर्षांपासून काश्‍मीर आणि भारताच्‍या उत्तर पूर्वेकडील क्षेत्र हस्‍तगत करण्‍याची स्‍वप्‍ने पहात आहे. खलिस्‍तानवादी आपल्‍या नकाशात प्रामुख्‍याने पंजाब, हरियाणा, राजस्‍थान आणि हिमाचल प्रदेश दाखवत आहेत. थोडक्‍यात काय, तर खलिस्‍तानी भारताला तोडण्‍यात यशस्‍वी झाले, तर जम्‍मू-काश्‍मीर आणि लडाख भारतापासून वेगळे होतील. त्‍यामुळे पाकिस्‍तान त्‍यांच्‍यावर सहजगत्‍या नियंत्रण मिळवू शकेल; पण पाकिस्‍तानच्‍या हे लक्षात येत नाही की, आपले हे विकृत स्‍वप्‍न साकार होण्‍यापूर्वी भारतच आपल्‍याला संपवून टाकेल.

५. खलिस्‍तानी आतंकवाद्यांचे सिमलावर वर्चस्‍व !

जून २०२२ मध्‍ये ‘सिख फॉर जस्‍टीस’ या अतिरेकी संघटनेने सादर केलेल्‍या नकाशात वर्ष १९६६ पूर्वी जे पंजाबचे क्षेत्र दाखवले होते, त्‍यात हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि राजस्‍थान होते, तसेच उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडातील काही भाग जेथे शिखांची संख्‍या मोठ्या प्रमाणात आहे, तो भागही दाखवला होता. आतंकवादी गुरपतवंतसिंह पन्‍नू याने पाकिस्‍तानच्‍या माध्‍यमांना छातीठोकपणे सांगितले, ‘‘सिमला हे शिखांचे जन्‍मस्‍थान असेल. ती उद्याची खलिस्‍तानची राजधानी असेल.’’ ‘ऑपरेशन ब्‍ल्‍यू स्‍टार’ला ३८ वर्षे पूर्ण झालेल्‍या दिवशी हे घडवून आणले होते. या नकाशातही ना पाकिस्‍तानचा हिस्‍सा, ना जम्‍मू-काश्‍मीरचा !

६. पाकिस्‍तानची ‘ब्‍लीड इंडिया’ नीती

खलिस्‍तानच्‍या या खेळातील फासे पाकिस्‍तान आपल्‍या मर्जीने टाकण्‍याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्‍तानच्‍या ‘ब्‍लीड इंडिया’ नीतीनुसार त्‍याला भारताचे अनेक तुकडे करायचे आहेत. पाकिस्‍तान याआधी पूर्व पाकिस्‍तानच्‍या आधारे भारताच्‍या पूर्व भागातील क्षेत्रावर नियंत्रण मिळवू पहात होता. त्‍याला कोणत्‍याही परिस्‍थितीत काश्‍मीर गिळंकृत करायचे होते. भारताला तोडण्‍यासाठी आणि भारतात अस्‍थिरता निर्माण करण्‍यासाठी पाकिस्‍तान खलिस्‍तानचा उपयोग करून घेत आहे, हेच खरे !

(साभार : nedricknews.com आणि ‘सांस्‍कृतिक वार्तापत्र’)