मातृभूमीविषयी जराही प्रेम नसणारे आणि शत्रूविषयी कळवळा असणारे नेहरूंसारखे पंतप्रधान होणे हे भारतियांचे दुर्दैव !

१. ‘नेहरूंना चीनविषयी विलक्षण पुळका आला. त्‍यांनी चीन आणि हिंदुस्‍थान यांना मान्‍य अशी पंचशील योजना सिद्ध केली अन् मग माओला (चीनचे तत्‍कालीन राष्‍ट्राध्‍यक्ष माओ त्‍से तुंग यांना) घेऊन नेहरू हिंदुस्‍थानभर फिरले. हिंदुस्‍थानभर काना-कोपर्‍यांतून ‘हिंदी-चिनी भाई भाई’चा डंका घुमला. नेहरू निर्धास्‍त होते. चिन्‍यांनी पंचशीलची ऐशी तैशी करून हिंदुस्‍थानवर आक्रमण केले. भारताच्‍या ईशान्‍य सरहद्दीवरील राज्‍यांना चीनपासून फार मोठा धोका होता; पण नेहरू मात्र निर्धास्‍त होते. चीनच्‍या आक्रमणाने त्‍यांचे डोळे पांढरे झाले. चिन्‍यांनी फार मोठा भूभाग कह्यात घेतला. सर्व हिंदुस्‍थान हादरला. शतशः साधूसंतांनी दैवी उपासना आणि साधना केली. करपात्रस्‍वामींनी कोटी चंडियाग केला. हिंदुस्‍थानभर हलकल्‍लोळ उडाला. ईश्‍वरी कृपा अशी की, चिनी अधिकार्‍यांना येथील हवामान आणि वातावरण पेलले नाही, ते रोगाच्‍या साथीमध्‍ये फसले. त्‍यामुळे चीनने सैन्‍य माघारी घेतले, तरी हिंदुस्‍थानचा पुष्‍कळसा भाग त्‍यांनी कह्यात घेतला.

२. माओ त्‍से तुंग हा साम्‍यवादी चीनचा हुकूमशाह ! त्‍याने तिबेटवर आक्रमण करायचे ठरवले. तिबेट चिन्‍यांकडे जाणे हिंदुस्‍थानला फार धोक्‍याचे होते. बहुधा तिन्‍ही दलांचे जनरल थिमय्‍या मुख्‍य सेनापती होते. ते नेहरूंना म्‍हणाले, ‘‘तिबेट चिन्‍यांकडे जाणे धोक्‍याचे आहे. आपण आज्ञा द्या. पहाता पहाता या चिन्‍यांना पळवून लावतो.’’ नेहरूंनी नकार दिला; कारण साम्‍यवादी चीन राष्‍ट्राविषयी त्‍यांना फार आपुलकी होती. हिंदुस्‍थानात सनातन हिंदु धर्माचे शासन येणे, हे त्‍यांना विहित नव्‍हते. त्‍यापेक्षा चिनी बरे, ही त्‍यांची भूमिका होती. चिन्‍यांनी तिबेट जिंकला. हिंदुस्‍थानची नाकेबंदी केली.

लोकप्रतिनिधींनी संसदेमध्‍ये नेहरूंना खडसावले. त्‍या प्रसंगी ते म्‍हणाले, ‘‘जो भूभाग चीनने घेतला, तिथे गवताची काडीही उगवत नाही. त्‍यामुळे फारसे बिघडत नाही.’’ राज गोपालाचारी यांनी आपली टोपी काढून आपले मस्‍तक दाखवले आणि म्‍हणाले, ‘‘हे टक्‍कल पाहिले का ? इथे एकही केस उगवत नाही; म्‍हणून का हे टक्‍कल कापून टाकायचे का ? याचा त्‍याग करायचा ?’’

पंचशीलला उघड उघड धुडकावून चीनने केलेल्‍या आक्रमणाने नेहरू हादरले. त्‍या जबरदस्‍त धक्‍क्‍याने त्‍यांचा अंत झाला.

हिंदुस्‍थानचा मोठा भूभाग ताब्‍यात येताच चिनी सरकारने उत्तमोत्तम रणगाडे आणून पाकिस्‍तानच्‍या राजधानीपर्ंयत मोठा रस्‍ता सिद्ध केला.’

देशविध्‍वंस करणारे थोर पुरुष नेहरू !

‘नेहरूंनी नवी परंपरा चालू केली, त्‍या परंपरेला ‘Nightmare of Nehruism’, असे नाव दिले जाते. याचा अर्थ ‘नेहरूवादाची भुताटकी’ ! या भुताटकीचे अतीभयानक असे परिणाम समस्‍त हिंदुस्‍थान भोगत आहे. या भुताटकीने स्‍वातंत्र्यापासून अवघ्‍या ७० वर्षांत ऋषिमुनींच्‍या या पवित्र भूमीचे वाटोळे केले. देशाचे तुकडे तुकडे उडवले. देश विघात करणारे ‘पाईक’ निर्माण केले. सनातन हिंदु धर्म संस्‍कृतीचे नाव जरी कानी आले, तरी नेहरू आणि नेहरूप्रणित भुताटकीची कानशीले ताडताड उडू लागतात. डोळे आग ओकू लागतात.

या नेहरूंना समाजवाद, साम्‍यवाद यांचे विलक्षण वेड. त्‍यांनी ‘हिंदुस्‍थानच्‍या राज्‍यघटनेला निर्मितीप्रक्रियेतील राष्‍ट्र’ (Nation in Making) असेच नाव दिले. ‘समाजवादी लोकशाही शासन’, असे म्‍हटले जाते. लोकशाही आणि समाजवाद एकत्र कसा नांदू शकेल ? त्‍याचे आग-पाण्‍यासारखे सख्‍य !’

– गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी

(साभार : साप्‍ताहिक ‘सनातन चिंतन’, २८.८.२००८)