सांगली – अमली पदार्थ सेवन विरोधात व्यापक जनजागृती करणे आवश्यक असून यासाठी महाविद्यालयांमध्ये जनजागृतीसाठी विशेष शिबिर, कार्यक्रम आयोजित करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात अमली पदार्थ नियंत्रण समितीची बैठक झाली. या बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, सांगली-मिरज आणि कुपवाड महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थ सेवन विरोधात जनजागृती झाल्यास त्याद्वारे नशेखोरीस आळा बसेल. जिल्ह्यात अमली पदार्थाची विक्री होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी नेहमी सतर्क राहून पडताळणी मोहिमा राबवाव्यात. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने किरकोळ आणि घाऊक औषध विक्री करणार्या औषधी दुकानांची पडताळणी करावी.’’
संपादकीय भूमिका :शैक्षणिक अभ्यासक्रमात धर्मशिक्षणाचा अंतर्भाव करून विद्यार्थ्यांना धर्माचरण आणि साधना करायला शिकवणे आवश्यक आहे. अशा प्रकारची जनजागृती झाल्यासच खर्या अर्थाने विद्यार्थी सर्वांगाने घडतील ! |