गोवत्‍स पूजनाची परंपरा केव्‍हापासून चालू झाली ?

याविषयी एक कथा असून ती सत्‍ययुगातील आहे. देवदर्शनासाठी सहस्रो ऋषींची तपश्‍चर्या भृगुआश्रमात चालू होती. एक दिवस त्‍या आश्रमात एक वृद्ध, अशक्‍त, ब्राह्मण काठीच्‍या साहाय्‍याने कसा तरी स्‍वतःला सावरत एक गाय आणि गोर्‍हा यांना घेऊन आला. तो म्‍हणाला, ‘‘मी पर्वणी स्नानासाठी दोन दिवसांत जंबू क्षेत्रात जाऊन येतो, तोपर्यंत या गोवत्‍साला सांभाळा. तशी शपथ घ्‍या.’’ ऋषींनी शपथ घेतली. वृद्ध ब्राह्मण निघून गेला. पाठोपाठच प्रचंड डरकाळी फोडत एक वाघ आश्रमात शिरला आणि गोवत्‍साच्‍या दिशेने चालू लागला. त्‍यामुळे तपस्‍वी घाबरले. वाघाला हाकलण्‍यासाठी प्रयत्न करू लागले. गाय जिवाच्‍या आकांताने ओरडू लागली. शेवटी ब्रह्मदेवाने दिलेली मोठा आवाज करणारी एक घंटा सर्व ऋषींनी शक्‍तीनिशी वाजवली. इतका मोठा आवाज झाल्‍याने वाघ घाबरून गुप्‍त झाला. गाय-वासरूही नाहीसे झाले. त्‍यानंतर महादेव-पार्वती कार्तिकेयासह अवतीर्ण झाले. त्‍या दिवसाची स्‍मृती म्‍हणून ही गोवत्‍सपूजा चालू झाली.

गोवत्‍स पूजनाचा ऋग्‍वेदातील मंत्र

‘माता रुद्राणां दुहिता वसूनां स्‍वसादित्‍यानाममृतस्‍य नाभिः ।
प्र नु वोचं चिकितुषे जनाय मा गामनागामदितिं वधिष्‍ट ॥ ’

– ऋग्‍वेद, मंडल ८, सूक्‍त १०१, ऋचा १५

अर्थ : गाय ही रुद्रांची माता, वसूंची कन्‍या, आदित्‍यांची बहीण आणि (तूप, दूधरूपी) अमृताचे केंद्र आहे. अशा विशेष उपकारी आणि अवध्‍य (वध करण्‍यास अयोग्‍य) गायीचा विवेकशील मनुष्‍याने वध करू नये.

– सौ. वसुधा ग. परांजपे, पुणे. (साभार : मासिक ‘आदिमाता’, दीपावली विशेषांक, वर्ष १)