बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना साहाय्य करणार्‍या ४७ जणांना देशभरातून अटक

नवी देहली – मानवी तस्करीच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने देशभरातील ८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेश येथील ५५ ठिकाणी धाडी घालून ४७ जणांना अटक केली. भारतात रोहिंग्या मुसलमानांना घुसवून त्यांना देशात वसवण्यामध्ये गुंतलेल्या लोकांना यात अटक करण्यात आली आहे. यामध्ये त्रिपुरामधून २१, कर्नाटकातून १०, आसाममधून ५, बंगालमधून ३, तमिळनाडूमधून २ आणि हरियाणा, तेलंगणा आणि पुद्दुचेरीमधून प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली आहे. याखेरीज राजस्थान आणि जम्मू-काश्मीर येथूनही काही जणांना अटक करण्यात आली आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये आसाम पोलिसांनी रेल्वेतून प्रवास करणार्‍या काही लोकांची चौकशी केली असता ते बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू होते. या चौकशीकडे स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लक्ष ठेवून होते.

१. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या धाडीमध्ये बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्डसह अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. याखेरीज २० लाख रुपये आणि ४ सहस्र ५५० अमेरिकी डॉलर (अनुमाने ३ लाख ७८ सहस्र रुपये) जप्त करण्यात आले आहेत.

२. आसामचे विशेष पोलीस महासंचालक हरमित सिंह यांनी सांगितले की, सीमा सुरक्षा दलाच्या साहाय्याने बांगलादेशातील ४५० घुसखोर, तसेच रोहिंग्या यांना देशात घुसखोरी करण्यापासून रोखून त्यांना परत पाठवण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

अशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने कायदा करावा !