|
चेन्नई (तमिळनाडू) – राज्यातील भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी भाजप सत्तेत आल्यास काय करेल?, यावर महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. श्रीरंगम् येथील फेरीच्या वेळी त्यांनी घोषणा केली की, आम्ही सत्तेत येताच ‘हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी (हिंदु रिलिजियस अँड चॅरिटेबल एन्डोअमेंट) मंत्रालय’ रहित करू. या मंत्रालयाच्या माध्यमातूनच तमिळनाडूतील सहस्रावधी प्राचीन हिंदु मंदिरांचे सरकारीकरण करण्यात आले आहे. जेव्हा आम्ही सत्तेत येऊ, तेव्हा हे मंत्रालय नसेल.
अण्णामलाई पुढे म्हणाले की,
१. राज्यात भाजपची सत्ता येताच मंदिरांबाहेर लावलेले पेरियार यांचे पुतळे हटवले जातील. अण्णामलाई यांनी वर्ष १९६७ मधील एका घटनेचा संदर्भ देत सांगितले की, जेव्हा द्रमुक पक्षाने सत्ता हाती घेतली, तेव्हा त्यांनी ‘जे देवाचे पालन करतात, ते मूर्ख असतात. जे देवावर विश्वास ठेवतात, त्यांची फसवणूक केली जाते. त्यामुळे देवाची पूजा करू नका !’ असे फलक मंदिरांबाहेर लावले होते. (द्रमुक पक्षाची हिंदुद्वेषी मानसिकता जाणा – संपादक)
२. श्रीरंगम्च्या भूमीवरून आम्ही तुम्हाला वचन देतो की, आम्ही सत्तेवर आल्यावर आमचे पहिले काम असे ध्वजस्तंभ उपटून टाकणे असेल. त्याऐवजी आम्ही अल्वार आणि नयनार या तमिळ हिंदु संतांचे पुतळे उभारू. महान तमिळ संत थिरुवल्लुवर यांचा पुतळाही उभारला जाईल.
अण्णामलाई यांच्या रूपाने खरा राष्ट्रीय नेता निर्माण होत आहे ! – टी.आर्. रमेशअण्णामलाई यांच्या वक्तव्यावर बोलतांना तमिळनाडूतील ‘टेम्पल वर्शिपर्स सोसायटी’चे अध्यक्ष आणि हिंदुत्वनिष्ठ टी.आर्. रमेश म्हणाले की, राज्यातील मंदिरांचा देवनिधी चुकीच्या पद्धतीने हस्तगत करण्यासाठीच येथील धर्मादाय विभाग कार्यरत आहे. अण्णामलाई यांच्या भूमिकेचे मी स्वागत करतो. ई.व्ही. रामास्वामी यांना मी ‘पेरियार’ (महान माणूस) मानत नाही. रामास्वामी हे भारतीय व्यवस्था, तमिळ भाषा आणि तमिळी संस्कृतीची चिन्हे यांना विरोध करत असत. त्यांनी दलित आणि मुसलमान यांच्या विरोधातही आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. त्यांचे पुतळे काढले गेलेच पाहिजेत. मी सांगू इच्छितो की, अण्णामलाई यांच्या रूपनो एक खरा राष्ट्रीय नेता निर्माण होत आहे. अण्णमलाई हे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहून त्यानुसार कार्य करून दाखवतील, अशी आशाही रमेश यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली. |