|
मदुराई – तमिळनाडू लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत निबंधाच्या शेवटी ‘जय हिंद’ लिहिणार्या महिला उमेदवाराला मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने दिलासा दिला आहे. या महिला उमेदवाराने निबंधाच्या शेवटी ‘जय हिंद’ असे लिहिल्याने तमिळनाडू लोकसेवा आयोगाने तिची उत्तरपत्रिका अवैध ठरवली होती. न्यायमूर्ती बट्टू देवानंद म्हणाले, ‘‘नैसर्गिक संसाधनांच्या वाटाघाटीचे महत्त्व’ या विषयावर निबंध लिहितांना तरुणांनी उत्स्फूर्तपणे भावनिक होणे आणि देशभक्ती अनुभवणे स्वाभाविक असू शकते. त्यामुळे उमेदवाराने उत्तरपत्रिकेच्या शेवटी ‘जय हिंद’ असे लिहिले; म्हणून तिची उत्तरपत्रिका अवैध ठरवता येत नाही. ‘जय हिंद’चा अर्थ ‘भारताचा विजय’ असा असून ही सर्वसामान्यपणे देण्यात येणारी घोषणा आहे. शाळकरी मुलांच्या प्रार्थनेच्या शेवटी किंवा प्रतिष्ठित व्यक्तींच्या भाषणाच्या शेवटी ‘जय हिंद’ ही घोषणा उत्स्फूर्तपणे दिली जाते.’’
उत्तरपत्रिका अवैध ठरवण्याचा निर्णय मागे घेऊन निबंधाचे मूल्यमापन करण्याचा आदेश !
न्यायालयाने पुढे म्हटले, ‘‘अशा चिंतनाच्या आणि आत्मपरीक्षणाच्या क्षणी, काही तरुणांसाठी ‘जय हिंद’ सारख्या विषयाचा सारांश देत निबंध किंवा भाषण यांचा शेवट करणे, हा अभिव्यक्तीचा नैसर्गिक मार्ग आहे.’ त्यामुळे या प्रकरणात ‘जय हिंद चला निसर्गाशी एकरूप होऊन जगूया’ हे घोषवाक्य निबंधाचा नैसर्गिक आणि उत्स्फूर्त परिणाम आहे. यामध्ये कोणत्याही गैरव्यवहाराच्या प्रयत्नाचे संकेत दिसत नाहीत. अनेक संप्रेषणांमध्ये ‘जय हिंद’ हा शेवटचा शब्द आहे, जिथे मातृभूमी म्हणजेच भारताविषयी देशभक्तीची भावना व्यक्त केली जाते.’’
खंडपिठाने तमिळनाडू लोकसेवा आयोगाला या प्रकरणात महिला उमेदवाराची उत्तरपत्रिका अवैध ठरवण्याचा निर्णय मागे घेऊन तिच्या निबंधाचे मूल्यमापन करण्याचा आदेश दिला.