BhagwadGeetaForMBAcourse : अलाहाबाद विश्‍वविद्यालयात व्यवस्थापनाच्या पदवी अभ्यासक्रमात शिकवण्यात येणार भगवद्गीता !

भगवान श्रीकृष्णांनी केलेले उपदेश विद्यार्थ्यांना विस्ताराने समजावण्यात येतील

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – व्यवस्थापनाचे ‘गुरुमंत्र’ शिकवण्यासाठी अलाहाबाद विश्‍वविद्यालयाने एक विशेष अभ्यासक्रम चालू केला आहे. यांतर्गत विद्यार्थ्यांना भगवद्गीता, रामायण, उपनिषदे आणि आर्य चाणक्य यांची शिकवण, हे सर्व यशाच्या मंत्राच्या रूपात शिकवले जाईल. या अभ्यासक्रमात देश-विदेशांतील प्रतिष्ठित लोकांनी घेतलेल्या व्यवस्थापकीय निर्णयांसमवेत अष्टांग योगाचाही अभ्यास असेल.

हा अभ्यास १, २ अथवा ३ वर्षांचा असून हा कालावधी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रशस्तीपत्रक (सर्टिफिकेट कोर्स), पदविका (डिप्लोमा) आणि ‘बीबीए’ची (बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट’ची) पदवी (डिग्री) प्राप्त होईल. ५ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास ‘एम्.बी.ए.’ची पदवी प्राप्त होईल.

अभ्यासक्रम समन्वयक शेफाली नंदन

अभ्यासक्रम समन्वयक शेफाली नंदन म्हणाल्या की, या अभ्यासक्रमात भारतीय व्यवस्थापकीय विचार, अध्यात्मिकता आणि व्यवस्थापन, सांस्कृतिक लोकाचार, मानवी मूल्ये अन् व्यवस्थापन, अष्टांग योग, जीवनाचा समग्र दृष्टीकोन, ध्यानधारणा, ताणतणाव आदी विषयांवर पारंपरिक अध्ययन करवून घेतले जाईल. कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) आणि नवउद्योगांचे व्यवस्थापन (स्टार्टअप मॅनेजमेंट) यांचाही प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.

भगवान श्रीकृष्णाच्या व्यवस्थापकीय निर्णयांचाही अभ्यासक्रमात असेल समावेश !

भगवान श्रीकृष्ण १४ विद्या आणि ६४ कलांनी परिपूर्ण होते. त्यांनी त्यांच्या कौशल्यपूर्ण व्यवस्थापनाच्या जोरावर धर्म आणि सत्य यांच्या बाजूने लढणार्‍या पांडवांना मर्यादित संसाधने असतांनाही यश मिळवून दिले. जर विद्यार्थी हे शिकले, तर त्यांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर यशच मिळेल. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना भगवद्गीता वाचायला वेळ मिळत नाही. त्यामुळे अभ्यासक्रमातच याचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांना त्याच्या अध्ययनाचा लाभ अनुभवास येईल. भगवान श्रीकृष्णांनी केलेले उपदेश विद्यार्थ्यांना विस्ताराने समजावण्यात येतील, अशी माहितीही नंदन यांनी दिली.

संपादकीय भूमिका 

  • हिंदु धर्माची अद्वितीय शिकवण ही सार्वत्रिक, सार्वकालिक आणि सर्वच लोकांसाठी उपयुक्त आहे. असा अभ्यासक्रम चालू केल्याविषयी अलाहाबाद विश्‍वविद्यालयाचे अभिनंदन !
  • आता यावरून कुठल्या तथाकथित धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षाने शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याची ओरड करू लागला, तर आश्‍चर्य वाटू नये !