खोटे गुन्‍हे नोंद करण्‍यातून मराठ्यांच्‍या विरोधात सरकारचे षड्‌यंत्र ! – मनोज जरांगे पाटील, आंदोलनकर्ते

मनोज जरांगे पाटील, आंदोलनकर्ते

छत्रपती संभाजीनगर – मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही, असे २-३ जणांनी ठरवले आहे. त्‍यामुळे खोटे गुन्‍हे नोंद करण्‍यातून मराठ्यांच्‍या विरोधात षड्‌यंत्र रचले जात आहे, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली. सरकारचे शिष्‍टमंडळ ८ नोव्‍हेंबर या दिवशी भेटण्‍यासाठी येणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्‍या नातेवाइकांचे उपाहारगृह त्‍यांच्‍याच जवळच्‍या कुणीतरी फोडले आहे, असा आरोपही त्‍यांनी केला. मराठ्यांना आरक्षण मिळू नये, यासाठी ‘ओबीसी’चे नेते प्रयत्न करत आहेत, असे जरांगे यांनी म्‍हटले आहे.

मनोज जरांगे पाटील म्‍हणाले की, शांततेत आंदोलन चालू असतांना त्‍यांना उसकवण्‍याचा प्रकार चालू आहे. याकडे मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री यांनी लक्ष द्यावे. त्‍यासाठी पुरवणी सूची सिद्ध केल्‍या जात आहेत. यात ४-५ सहस्र मराठ्यांना अडकवण्‍याचा कट आहे. याकडे सरकार लक्ष देत नसेल, तर मराठा नेत्‍यांनी तरी लक्ष द्यावे. मराठा समाज खचणार नाही. मराठा समाजाच्‍या विरोधातील हा डाव मराठा नेत्‍यांनी हाणून पाडावा. बीड, नांदेडसह महाराष्‍ट्रातील पोलीस अधीक्षकांवर दबाव आणला जात आहे.


बीड येथील पोलीस अधीक्षकांवर दबाव !

मनोज जरांगे पाटील म्‍हणाले की, खोटे गुन्‍हे नोंद करण्‍यासाठी येथील पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकला जात आहे. मंत्री छगन भुजबळ हे स्‍वत: पोलीस अधीक्षकांकडे जाऊन बसले होते. त्‍यांनी स्‍वत: नावांची सूची करत त्‍यांच्‍यावर गुन्‍हे नोंद करण्‍यासाठी दबाव आणला आहे, असा आरोपही केला आहे. त्‍या विरोधात मराठा समाजातील नेत्‍यांनी एकत्र येण्‍याचे आवाहनही केले.

आम्‍ही गुन्‍हे नोंद होण्‍याला घाबरत नाही ! – मनोज जरांगे पाटील

ते म्‍हणाले की, खोटे गुन्‍हे नोंद करण्‍यात येत आहेत, हे महाराष्‍ट्रातील मराठ्यांच्‍या लक्षात आले आहे; मात्र आम्‍ही ५४ टक्‍के आहोत. आम्‍ही घाबरणार नाही. मराठा समाजातील घराघरातील नागरिकांनी आता मागे न हटण्‍याचा निश्‍चय केला आहे. आम्‍ही गुन्‍हे नोंद होण्‍याला घाबरत नाही. कितीही गुन्‍हे नोंद केेले, तरी आम्‍ही मागे हटणार नाही.