विविध कामांच्या निमित्ताने पंचायत समितीत येणार्या लोकांकडून कागदपत्रांवर पुढील प्रक्रिया जलद होण्यासाठी शासकीय अधिकार्यांना अनेकदा प्रलोभने देण्याचे प्रकार होतात. ही गोष्ट लक्षात घेऊन ५ ऑक्टोबरला सातारा गटविकास अधिकारी म्हणून रुजू झालेले (मूळचे लातूर येथील) सतीश बुद्धे यांनी काही दिवसांतच त्यांच्या कक्षाबाहेर ‘मी माझ्या वेतनात समाधानी आहे. लोकसेवक म्हणून नोकरी करतांना शासनाकडून मिळणारे वेतन पुरेसे असून अधिक माया जमवण्याची माझी इच्छा नाही. जे योग्य काम आहे ते मार्गी लागणारच’, असा फलक लावला. ‘अशा प्रकारचा फलक लावावा लागणे’, हे शासकीय कार्यालयांच्या अत्यंत विदारक स्थितीचे द्योतक आहे. शासकीय कार्यालयात सामान्यांना काम लवकर होण्यासाठी कागदावर वजन ठेवावेच लागते. ‘अडलेली व्यक्ती गाढवाचे पाय धरते’, याप्रमाणे कामे अडलेल्यांना इच्छा असो वा नसो भ्रष्टाचाराच्या साखळीतील एक कडी व्हावेच लागते.
एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मते जगातील अनुमाने १७५ देशांमध्ये भ्रष्टाचारात भारताचा क्रमांक ९४ वा आहे. राजकारण, तसेच पोलीस प्रशासन, व्यापार, कृषी, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, बांधकाम आदी सर्वच शासकीय क्षेत्रांत भ्रष्टाचाराची पाळेमुळे अगदी खोलवर रुजलेली आहेत. न्यायव्यवस्था, सैन्यदले हीसुद्धा ‘भ्रष्टाचारापासून अलिप्त आहेत’, असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. कितीतरी सरकारी अधिकार्यांचे अधिकृत उत्पन्न आणि मालमत्ता यांचा मेळ जुळत नाही. या पार्श्वभूमीवर एका शासकीय अधिकार्याने त्याच्या कक्षाबाहेर उपरोक्त आशयाचा फलक लावणे अत्यंत सुखद आणि दु:खदही आहे. दु:खद यासाठी की, प्रामाणिकपणे काम करणार्या अधिकार्याला काहीच दिवसांत भ्रष्ट कार्यप्रणालीचा उबग आल्याने शेवटी वरीलप्रमाणे फलकाच्या माध्यमांतून स्वत:चे म्हणणे मांडावे लागत आहे ! एकप्रकारे या फलकातून पूर्वीच्या कार्यालयातील भ्रष्टाचाररूपी भस्मासुराचे अस्तित्व स्पष्ट झाले आहे. सुखद यासाठी की, भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेल्या कार्यालयात एक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, तसेच जनसेवक अधिकारी पाय रोवून लढा देण्यास सिद्ध झाला आहे ! निर्भिडपणे तो भ्रष्टाचाराशी दोन हात करत आहे. सरकारी कचेर्यांमध्ये हताशपणे खेटे घालणार्या नागरिकांनी केवळ प्रशासनाकडे बोट दाखवण्यापेक्षा प्रामाणिक अधिकार्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यास निश्चितच भ्रष्टाचार निर्मूलनाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडेल !
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.