मदरशातील हिंदु विद्यार्थी !

उत्तराखंड राज्‍यातील ३० मदरशांमध्‍ये ७४९ एवढ्या मोठ्या संख्‍येने हिंदु विद्यार्थी शिक्षण घेत असल्‍याचे उघड झाले आहे. ‘उत्तराखंड मदरसा शिक्षण परिषदे’चे संचालक राजेंद्र सिंह यांनी सादर केलेल्‍या अहवालात हे उघड झाले. ‘राष्‍ट्रीय बाल संरक्षण आयोगा’च्‍या अंतर्गत मदरसा शिक्षण परिषदेला बजावण्‍यात आलेल्‍या नोटिसीनंतर त्‍यांनी हा अहवाल सादर केला. मागील वर्षी महाराष्‍ट्रात छत्रपती संभाजीनगरमध्‍ये ज्‍या विद्यार्थ्‍यांची नावे जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांमध्‍ये घातली होती, ते विद्यार्थीही मदरशांमध्‍ये जात असल्‍याचे लक्षात आले. अशा घटना देशात अन्‍य ठिकाणी सहज घडत असणार, यात आता शंका नाही.

वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

देशात आजही अनधिकृत मदरशांची संख्‍या मोठी आहे. उत्तरप्रदेशसारख्‍या राज्‍यात अनधिकृत मदरसे बंद करण्‍याची प्रक्रिया चालू आहे. वरील घटना उघडकीस आल्‍यावर उत्तरखंडातील ५ अनधिकृत मदरसे बंद केल्‍याचेही मुख्‍यमंत्री पुष्‍कर सिंह यांनी स्‍पष्‍टीकरणार्थ सांगितले. देशातील प्रत्‍येक राज्‍यात सर्वत्र मोठ्या संख्‍येने अनधिकृत मदरशांची संख्‍या असणार, यात काही शंका नाही. ‘बहुतांश मदरशांमध्‍ये काय चालते ?’ हे वारंवार पुढे येत असल्‍याने ते सर्व जण जाणतात. विद्यार्थ्‍यांना हिंदुविरोधी शिक्षण देणे, त्‍यांच्‍या मनात हिंदुद्वेषाची बिजे पेरणे, त्‍यांना विविध जिहादी कृत्‍यांसाठी प्रवृत्त करणे, मदरशांतील लोकांकडून हिंदु मुलींवर अत्‍याचार होणे, अल्‍पवयीन मुलांचे लैंगिक शोषण होणे, अश्‍लील व्‍हिडिओ दाखवणे, अशी अनेक प्रकारची अवैध कृत्‍ये सतत पुढे येत असतात. या पार्श्‍वभूमीवर ‘हिंदु मुलांना मदरशांत प्रवेशित केले जाणे’, ही एक आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील नियोजनबद्ध घटना असू शकते’, असे कुणाला वाटले, तर त्‍यात चुकीचे काय ? धर्मांधांच्‍या हिंदूंवर कुरघोडी करण्‍याच्‍या विविध क्‍लृप्‍त्‍यांपैकी ही क्‍लृप्‍तीही सध्‍या तरी काही प्रमाणात यशस्‍वी झालेली दिसत आहे. हिंदूंची असाहाय्‍यता, तसेच त्‍यांची गरिबी किंवा पालकांची अनभिज्ञता, यांचा अपलाभ उठवून हिंदु मुलांना मदरशांत प्रवेश देण्‍यात आलेला असू शकतोे; परंतु अंतिमतः हिंदूंमधील धर्माभिमानाचा अभाव, तसेच राष्‍ट्रात काय चालू आहे ? राष्‍ट्र आणि धर्म यांची स्‍थिती कशी आहे ?, यांविषयीची अजाणता किंवा असंवेदनशीलता आदी गोष्‍टींमुळे हिंदु मुले मदरशांत गेली आहेत. त्‍यामुळे उद्या हीच हिंदु मुले स्‍वधर्मियांविरोधात कारवाया करायला लागली, आतंकवाद्यांना जाऊन मिळाली किंवा दंगलीत पुढाकार घेऊन दगडफेक करू लागली, हिंदु मुलींना फसवण्‍यास मुसलमान मित्रांना साहाय्‍य करू लागली, तर हिंदूंनी आश्‍चर्य वाटून घेऊ नये. आता या गोष्‍टी लक्षात आल्‍यावर त्‍या त्‍या राज्‍यातील सरकारे खडबडून जागी होत काही प्रमाणात कारवाया करत आहेत; परंतु गोष्‍टी फार पुढेही गेल्‍या असल्‍याने त्‍या मुळासह उखडायच्‍या असतील, तर यंत्रणांना तेवढे कष्‍ट घ्‍यावे लागणार आहेत.

मदरशांची आवश्‍यकता आहे का ?

वरील घटनेनंतर उत्तराखंड राज्‍याच्‍या मदरसा शिक्षण परिषदेचे नवीन अध्‍यक्ष मुफ्‍ती शमून कासमी यांनी म्‍हटले, ‘उत्तराखंड ही देवभूमी आहे. येत्‍या काळात मदरशात विद्यार्थी कुराणसमवेत योग आणि वेदही शिकतील. पहिले ज्ञान वेदातून आले आणि अंतिम कुराणमधून. सर्वांचा ‘डी.एन्.ए.’ एकच आहे. येथील प्रत्‍येक मदरसा येथील शिक्षण विभागाशी संबंधित असेल. लवकरच आम्‍ही गाय, गंगा आणि हिमालय यांच्‍या संरक्षणासाठी अभियान चालू करणार आहोत. गायीला ‘राष्‍ट्रीय पशू’ घोषित करायला सांगणार आहोत.’ जर ते प्रामाणिकपणे हे बोलत असतील, तर त्‍यांच्‍या कृतीतून ते लवकरात लवकर दिसले पाहिजे आणि एवढेच नव्‍हे, तर त्‍यांच्‍या या सर्व गोष्‍टी जगजाहीर करून सर्व मदरशांत त्‍या लागू होण्‍यासाठी त्‍यांनी त्‍वरेने प्रयत्न केले पाहिजेत. उत्तराखंड राज्‍यात सध्‍या ४१५ मदरसे अधिकृत आहेत, तर ११७ मदरसे ‘वक्‍फ बोर्डा’च्‍या अंतर्गत आहेत. या सर्व ठिकाणी त्‍यांनी वर सांगितलेल्‍या सर्व गोष्‍टी लागू करणे शक्‍य होणार आहे का ? आणि वेदांचे शिक्षण ही काही सोपी गोष्‍ट नाही. अनेक नियमांचे पालन केल्‍यावरच ते शिक्षण घेणे शक्‍य असते. कासमी यांच्‍या वरील वक्‍तव्‍याचा सर्वसाधारण मतितार्थ जरी घ्‍यायचा झाला, तरी जर ‘मुसलमान मुलांनाही हिंदु संस्‍कृतीचेही शिक्षण द्यायचे आहे’, तर मुसलमानांनी ‘मदरशां’च्‍या नावाखाली वेगळे बस्‍तान मांडण्‍याची आवश्‍यकताच नाही. त्‍यांनी मुसलमान मुलांनाच सामान्‍य शाळांमध्‍ये घातले की, सर्व प्रश्‍नच सुटेल !; परंतु याविषयी ते वक्‍तव्‍य करतांना दिसत नाहीत. आसाममध्‍ये मुख्‍यमंत्री बिस्‍वा यांनी ८०० अनधिकृत मदरसे बंद केले. अशी थेट आणि मोठी कारवाई प्रत्‍येक राज्‍यात तेवढ्याच जोराने होणे, ही काळाची आवश्‍यकता आहे. त्‍यामुळे त्‍यांतील चुकीच्‍या गोष्‍टीही आपोआप बंद होतील आणि अशा प्रकारे हिंदु मुलांचे प्रवेशही बंद होतील. मुसलमानांना केवळ ‘मुख्‍य प्रवाहात नसल्‍या’ची ओरड करत रहायची असते; परंतु जेव्‍हा जेव्‍हा मुख्‍य प्रवाहात सहभागी होण्‍याची वेळ येते, तेव्‍हा मात्र ते स्‍वतःला त्‍यापासून कोसो दूर ठेवतात आणि स्‍वतःचे धार्मिक वेगळेपण कसोशीने जपतात. इथेसुद्धा कासमी हे मदरशात हिंदूंचे धार्मिक शिक्षण देण्‍याची गोष्‍ट करतात; असे झाले, तर चांगलेच आहे; परंतु ‘मदरशांचे वेगळे अस्‍तित्‍व न ठेवता आमची मुले सामान्‍य हिंदु मुलांप्रमाणे सामान्‍य शाळांत शिक्षण घेतील’, असे ते म्‍हणत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. उत्तरप्रदेश मदरसा शिक्षण परिषदेचे अध्‍यक्ष इफ्‍तिखार अहमद जावेद यांनी मागील आठवड्यात त्‍यांच्‍या राज्‍यातील मदरशांचे शिक्षण विभागाने निरीक्षण करण्‍यास जोरदार विरोध केला. जर उत्तराखंडातील मदरशात शेकडो हिंदु विद्यार्थी जात असल्‍याचे उघड झाल्‍यावर तेथील अध्‍यक्ष कासमी यांनी वरीलप्रमाणे साळसूद भूमिका घेतली आहे, तर उत्तरप्रदेशात मागील आठवड्यातच जावेद यांनी केलेल्‍या वरील विधानाला ते विरोध करणार का ? त्‍यामुळे ‘मदरशांमध्‍ये पारदर्शकता ठेवायची आहे’, या मुसलमानांच्‍या भूमिकेवर कुणाचाही विश्‍वास बसणे अवघड आहे. असो. सध्‍याचा हा हिंदु मुलांना मदरशांत प्रवेश देण्‍याचा नवीन जिहाद अतीगांभीर्याने घेऊन प्रत्‍येक राज्‍याने प्रत्‍येक मदरसा पिंजून त्‍यांचे छक्‍केपंजे बाहेर काढण्‍याला पर्याय नाही !

देशातील प्रत्‍येक मदरशात हिंदु मुलांचे प्रवेश झाले आहेत का ? ते शोधून त्‍वरेने त्‍यांना योग्‍य शाळेत पाठवले पाहिजे !