कुपवाडा (जम्मू-काश्मीर) – येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण ७ नोव्हेंबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, तसेच हेमंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
‘आम्ही पुणेकर’ संस्था आणि ४१ राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. ‘भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणार्या सैनिकांना प्रेरणादायी, ऊर्जादायी ठरेल’, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला.
१. आज कुपवाडा येथे नव्या परंपरेला प्रारंभ झाला असून यापुढे प्रत्येक वर्षी कुपवाडा येथे ७ नोव्हेंबरला ‘छत्रपती शिवाजी महाराज पर्व’ साजरे करण्यात यावे’, असे आवाहन नायब राज्यपाल श्री. सिन्हा यांनी सैनिकांना केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘स्वत:वर विश्वास ठेवा, मी नेहमी तुमच्या समवेत असेन’, अशा शूरवीरांना दिलेल्या संदेशाचे मराठीतून वाचन करत श्री. सिन्हा यांनी विविध इतिहासकार आणि कवी यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम गाथांना उजाळा दिला.
२. या वेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘दैनंदिन जीवनातील प्रत्येक समस्येवर मार्ग दाखवण्यासाठी शिवाजी महाराजांचे विचार दिशादर्शक आहेत.’’
मुख्यमंत्र्यांनी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली !दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मराठा बटालियन असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली. त्यांच्यासमवेत फराळाचा आस्वाद घेत मुख्यमंत्र्यांनी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. |