पुणे – पुणे महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने करबुडव्या २३ सहस्र ५०० मिळकती शोधून काढल्या आहेत. या मिळकती कर कक्षेत आल्याने त्यांच्याकडून १४३ कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे. कर आकारणी न झालेल्या मिळकती शोधण्याची ही मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याने महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांनी दिली.
शहराच्या जुन्या हद्दीमध्ये ११ लाख, तर समाविष्ट गावांमध्ये २ लाख मिळकतींना कर आकारणी करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत शहराच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर नव्याने बांधकामे झाली आहेत. त्यातील अनेक मिळकतींना कर आकारणी झाली नसल्याची तक्रार सातत्याने महापालिका प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. मिळकतकर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. यंदा मिळकतकरातून १ सहस्र ८०० कोटी रुपयांचे उत्पन्न अंदाजपत्रकात आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी गृहीत धरले आहे, तर मिळकतकरातून जवळपास ९ सहस्र कोटींची थकबाकी वसुलीची कर आकारणी आणि कर संकलन विभागापुढे उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर मिळकतकर विभागाने थकबाकी वसुलीसमवेतच करबुडव्या मिळकतींचा शोध चालू केला आहे. त्याअंतर्गत चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत २३ सहस्र ५०० मिळकतींचा शोध प्रशासनाने घेतला असून त्यासाठी मुख्य विभागासमवेतच क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. चालू आर्थिक वर्षात महापालिकेच्या मिळकतकर विभागाने थकबाकी असलेल्या ५३१ मिळकतींना सील लावले आहे. त्यांच्याकडे एकूण ३८ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
संपादकीय भूमिका
|