|
आळंदी (जिल्हा पुणे) – आपण या आधी ७०० वर्षे सुलतानीचा नंगानाच सहन केला आहे. सद्यःस्थितीत हिंदु धर्म टिकवण्यासाठी समान नागरी कायदा होणे आवश्यक आहे. आपण जातपात, पंथ भेद बाजूला ठेवून आपला धर्म टिकवण्यासाठी या आंदोलनात सहभागी व्हावे. या आंदोलनाला ‘राष्ट्रीय आंदोलन’ करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. धर्मासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा चालू ठेवूया. लवकरात लवकर हे आंदोलन आपल्याला देशभर चालू करायचे आहे. जसे ३७० कलम हटवले आणि श्रीराममंदिराची निर्मिती केली, त्याप्रमाणेच समान नागरी कायद्याच्या मागणीसाठी सर्व वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी या आंदोलनात सहभागी होऊन आपले धर्मकर्तव्य पार पाडावे, असे आवाहन ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी केले. त्यांनी समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने आळंदी (ता. खेड) येथील इंद्रायणी नदी घाटावर (हवेली विभाग) १ नोव्हेंबरपासून ‘राष्ट्र कल्याण सामूहिक’ जनआंदोलन उपोषण चालू केले आहे. यामध्ये समान नागरी कायदा आणि समान शिक्षण कायदा करावा, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांचा समावेश आहे. हिंदु राष्ट्र सेनेचे कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्रसिद्धीमाध्यमांनी या आंदोलनाला प्रसिद्धी दिली नाही, अशी खंतही महाराजांनी या वेळी व्यक्त केली.
अन्य मागण्या
१. जाती आधारित असलेले आरक्षण रहित करून आर्थिक निकषांवर आणि गुणवत्तेवर आरक्षण देण्यात यावे.
२. महाराष्ट्रात शेतकर्याने पिकवलेल्या शेत मालाला कायमस्वरूपी हमीभाव देण्यात यावा.
३. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या नद्यांमधील पाणी माणसाने पिण्याइतके शुद्ध असावे, तसेच येथे मांस आणि मद्यविक्री कायमस्वरूपी बंद करावी.
४. आळंदी-पंढरपूर पालखी मार्गाचे रूपांतर हे पालखी प्रकल्पात करण्यात यावे आणि प्रत्येक तळ्यांच्या ठिकाणी २५ एकर जागा आरक्षित करून त्या ठिकाणी वारकरी भवन बांधून वारकर्यांची निवासाची व्यवस्था करावी.
५. श्री तुंगारेश्वर वसई या ठिकाणी शासनाने पाडलेला बालयोगी सदानंद बाबांचा आश्रम त्वरित बांधून देण्यात द्यावा.
६. आळंदीतील सिद्धबेटाचा विकास आराखडा सिद्ध करून जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र बनवण्यात यावे, वारकरी शिक्षण संस्थांना आणि अध्यापकांना शासकीय अनुदान द्यावे.
७. श्री संत ज्ञानेश्वर जीवन मुक्तीदान संस्थान आणि गोशाळा यांचा अनेक वर्षे रखडलेला जागेचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा.
८. महाराष्ट्रातील संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक कार्यवाही करून गोशाळांना प्रतिगोवंश प्रतिदिन किमान ५० रुपये अनुदान देण्यात यावे.
९. महाराष्ट्रातील शिक्षणपद्धतीमधून मोगलांचा इतिहास काढून टाकून त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा, भारताचे संविधान, राष्ट्रपुरुषांचे आणि साधू संतांचे चरित्र, नितीमूल्य, तसेच योग प्राणायाम, यांचा समावेश करावा.