छत्रपती संभाजीनगर येथील बागेश्वर धामच्या दरबारात २ लाख लोकांच्या भोजनाची व्यवस्था !

शीख समाजाकडून भोजनाचे नियोजन !

शीख समाजाच्या वतीने भोजन सिद्ध करत असतांना महिला

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर शहरात बागेश्वर धाम येथील धीरेंद्र  शास्त्री महाराज यांच्या सोहळ्याच्या निमित्ताने चैतन्य आणि संपूर्ण उत्साहाचे वातावरण पसरले आहे. संपूर्ण शहरभर फलक लागले आहेत. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे ३  दिवसांच्या श्रीराम कथेच्या निमित्ताने प्रथमच शहरात आले आहेत. मुख्य कार्यक्रमाच्या मंडपाआधी २ लाख भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

उपस्थित भक्तजन

याविषयी राजेंद्रसिंह जबिंदा यांना या भोजनाच्या एकूण व्यवस्थेविषयी विचारले असता ते म्हणाले की, शीख समाजाच्या वतीने ही लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी कुणीही आम्हाला बळजोरी केलेली नाही. खासदार भागवत कराड यांना बोलून आम्ही ही व्यवस्था आमच्याकडे घेतली. सकाळी ९ वाजल्यापासून भाविक भोजन करत आहेत.

इंद्रजितसिंह छतवाल म्हणाले की, शीख समाजाद्वारे भाविकांसाठी या लंगरचे आयोजन आम्ही केले आहे. ६ नोव्हेंबर या दिवशी दिवसभरात आणि रात्री मिळून या ठिकाणी ७० सहस्र भाविकांनी भोजनाचा लाभ घेतला. ‘कुणीही येथून उपाशी जाऊ नये’, हाच आमचा उद्देश आहे. २ लाख भाविक आले तरी आमची सिद्धता आहे.