पॅलिस्टिनी कामगार आता विश्‍वासास पात्र नाहीत; इस्रायलकडून १ लाख भारतीय कामगारांची मागणी !

भारतासमवेत ६ मासांपूर्वीच ४२ सहस्र कामगारांच्या नियुक्तीसाठी झाला होता करार !

तेल अविव (इस्रायल) – हमासने इस्रायलवर आक्रमण केल्यानंतर आता इस्रायली सरकार त्यांच्या देशात काम करणार्‍या १ लाख पॅलेस्टिनी कामगारांना नोकरीवरून काढणार असल्याचे इस्रायलने स्पष्ट केले आहे. त्यांच्या जागी १ लाख भारतीय कामगारांची नियुक्ती करण्यात येईल. यासाठी इस्रायली शासनाने भारताकडे मागणी केली आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की, आता पॅलेस्टिनी कामगार विश्‍वास ठेवण्यालायक राहिलेले नाहीत. इस्रायल आता पॅलेस्टिनींना कामगार अनुज्ञा (परमिट) देत नाही.

सौजन्य वॉइस ऑफ अमेरिका 

१. ६ मासांपूर्वी, म्हणजेच मे २०२३ मध्ये भारत आणि इस्रायल यांच्यात भारताच्या ४२ सहस्र कामगारांची इस्रायलमध्ये नियुक्ती करण्यावरून उभय देशांत स्वाक्षरी झाली होती. आता मात्र इस्रायलने आणखी १ लाख कामगारांची मागणी केल्यामुळे मूळ करारापेक्षा तिप्पटीहून अधिक कामगारांची मागणी भारताकडे करण्यात आली आहे.

२. इस्रायलमध्ये काम करणारे पॅलेस्टिनी कामगारांचे वेतन हे पॅलेस्टाईनमधील वेतनापेक्षा पुष्कळ अधिक आहे.

३. ज्या पॅलेस्टिनी कामगारांना हटवण्यात आले आहे, ते प्रामुख्याने बांधकाम क्षेत्राशी निगडित आहेत.

४. इस्रायलमध्ये सध्या १८ सहस्र भारतीय कामगार काम करतात.

५. मुळातच मध्य पूर्वेतील देशांमध्ये भारतीय कामगार पुष्कळ मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमिरात या देशांमध्ये काम करणार्‍या भारतीय कामगारांची संख्या जवळपास १ कोटी आहे.

संपादकीय भूमिका

इस्रायलची ही मागणी पूर्ण करण्यासाठी त्याचा प्रामाणिक मित्र भारत प्रयत्न करील ! भारतातून पाठवण्यात येणारे कामगार पॅलेस्टिनी समर्थक नाहीत ना ?, हे मात्र भारताला पहावे लागेल. ‘कोण भारतीय नागरिक इस्रायलचा द्वेष करतात ?’, हे स्पष्ट आहेच. त्यामुळे शासनाला कुणाची निवड करावी ?, हे समजणे कठीण नाही !