पुणे मेट्रोच्‍या कामाचे प्रत्‍येक वेळी संरचनात्‍मक लेखापरीक्षण नको ! – श्रावण हर्डीकर, ‘महामेट्रो’चे व्‍यवस्‍थापकीय संचालक


पुणे – मेट्रोच्‍या कामाचे प्रत्‍येक वेळी स्‍ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्‍मक लेखापरीक्षण) करणे बंधनकारक नाही. प्रत्‍येक कामाचे संरचनात्‍मक लेखापरीक्षण केल्‍यानंतरच ‘मेट्रो’ चालू केली जाते, असे ‘महामेट्रो’चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. (‘एवढ्या मोठ्या प्रकल्‍पातील लहानशा चुकाही मोठ्या घटनेसाठी कारणीभूत ठरू शकतात’, ही संवेदनशीलता ठेवूनच प्रकल्‍पांचे कार्यपद्धतीनुसार लेखापरीक्षण केले गेले पाहिजे ! – संपादक) पुण्‍यातील ‘मेट्रो’ स्‍थानकांच्‍या उभारणीतील त्रुटी ज्‍येष्‍ठ अभियंत्‍यांनी दाखवल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर हर्डीकर पत्रकार परिषदेमध्‍ये बोलत होते.

ते म्‍हणाले, ‘‘महामेट्रो’ प्रवाशांच्‍या सुरक्षिततेविषयी तडजोड करत नाही. कामाचा दर्जा, परीक्षण, चाचणी शेवटच्‍या टप्‍प्‍यापर्यंत अवलंबली जाते. त्रुटींचे तात्‍काळ संरचनात्‍मक लेखापरीक्षण करून घेतले आहे. त्रुटींची तात्‍काळ दुरुस्‍ती त्‍या-त्‍या वेळी केली जाते. ‘मेट्रो’मध्‍ये तांत्रिक बिघाड झाल्‍यास तातडीने पथक पोचून दुरुस्‍ती करते. तांत्रिक बिघाड झाल्‍याची चौकशी केली जाते. तांत्रिक बिघाडाविषयी काही शंका असल्‍यास संपूर्ण यंत्रणा बंद केली जाते.’’