हिंदु संस्‍कृती, धर्म आणि राष्‍ट्र यांची हानी करणार्‍या विचारांना हद्दपार करण्‍याच्‍या दृष्‍टीने दीपोत्‍सव !

९ नोव्‍हेंबरपासून चालू होत असलेल्‍या दीपोत्‍सवाच्‍या निमित्ताने…

दीपावली हा उत्‍सवांचा मेळावा आहे. ‘आपल्‍या आयुष्‍यातील सर्व प्रकारचा अंधार नाहीसा व्‍हावा आणि मानवी समाजाची वाटचाल सौख्‍याच्‍या, समृद्धीच्‍या आणि सर्वांगीण विकासाच्‍या दिशेने व्‍हावी, याचे प्रतीक, म्‍हणजे दीपोत्‍सव’, असे आपली संस्‍कृती सांगते. मानवी समाजाच्‍या सर्वांगीण विकासासाठी बुद्धी, ज्ञान, वैभव, तेजस्‍विता, करुणभावना आणि प्रेमभावना यांची नितांत आवश्‍यकता असते. त्‍यावाचून संघशक्‍ती निर्माण करता येत नाही. मानवी समाजाच्‍या विविध कालखंडात नेहमीच आसुरी प्रवृत्तीच्‍या विरुद्ध संघर्ष करण्‍याचा प्रसंग सज्‍जनांवर आला आहे. त्‍यामुळे प्रतिकारशक्‍ती वाचून विकास अशक्‍य आहे. प्रतिकूल आणि अनुकूल काळ हा निसर्गचक्राचाच एक भाग आहे. याचा विचार करूनच आपल्‍या संस्‍कृतीने मानवी समाजाला बळ देण्‍यासाठी आणि संघशक्‍ती बलिष्‍ठ करण्‍यासाठी सण अन् उत्‍सव यांच्‍या निमित्ताने मार्गदर्शन केले आहे. माणसातील विजिगीषू वृत्ती आणि प्रतिकारनिष्‍ठा बलवत्तर रहावी; म्‍हणूनच आपली संस्‍कृती सण-उत्‍सवांच्‍या निमित्ताने अनमोल मार्गदर्शन करते.

भगवान विष्‍णूने वामन अवतारात दिलेला संदेश !

ब्रह्मदेवाने कनक (सोने) आणि कांता (सुंदर महिला) यांत भ्रम ठेवला आहे. तथापि सूर्य अनासक्‍त आहे; म्‍हणून त्‍याला ‘भर्ग’ म्‍हणतात. संपत्ती उपभोगासाठी नाही, तसेच स्‍त्री भोगदासी नाही, तर आपल्‍या सर्वांची माता आहे. त्‍या मातेचे लक्ष्मी म्‍हणून पूजन करा. स्‍त्रीकडे बहिणीच्‍या दृष्‍टीने पहा. आपल्‍या बुद्धीवर आसुरी विकृतीचा कधीही प्रभाव पडू देऊ नका. सद़्‍गुणांची कास धरा.

अशा प्रकारे आसुरी विकृतीपासून दूर राहून कनक आणि कांता यांच्‍याकडे पहाण्‍याचा सुदृढ दृष्‍टीकोन भगवान विष्‍णूने वामन अवतारात अखिल मानव समाजाला दिला. वामनाची ही शिकवण ध्‍यानात घेऊन दीपोत्‍सवाचे नेमके महत्त्व जाणून दीपोत्‍सव साजरा करूया.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर

१. पाशवी वृत्तीच्‍या आतंकवाद्यांना धडा शिकवण्‍याची शिकवण देणारा दिवाळीचा पहिला दिवस !

श्री. दुर्गेश परुळकर

‘दीपावली हा सण विजयाचा उत्‍सव आहे’, असे म्‍हटल्‍यास वावगे ठरणार नाही. श्रीकृष्‍णाने नरकासुरावर विजय संपादन करून त्‍याने अपहरण केलेल्‍या माता-भगिनींची मुक्‍तता केली. आर्यांचे संख्‍याबळ न्‍यून करून असुरांचे संख्‍याबळ वाढवण्‍याच्‍या हेतूनेच आर्यांच्‍या स्‍त्रियांना हेतूतः नरकासुराने पळवून नेले होते. नरकासुराचा हा दुष्‍ट हेतू श्रीकृष्‍णाने ओळखला आणि त्‍याच्‍यावर आपल्‍या सैन्‍यासह आक्रमण करून नरकासुराचा वध केला. त्‍याच्‍या बंदिवासात असलेल्‍या आपल्‍या माता-भगिनींची मुक्‍तता केली. असुरांकडे राहिलेल्‍या माता-भगिनींना श्रीकृष्‍ण स्‍वतःसमवेत घेऊन मायदेशी परतले. त्‍यांच्‍या पालकांनी नरकासुराच्‍या बंदीवासात असलेल्‍या आपल्‍या कन्‍यांचा स्‍वीकार केला नाही. श्रीकृष्‍णाने मात्र त्‍यांचे पालनपोषण आणि संरक्षण यांचे दायित्‍व स्‍वीकारून त्‍यांना सामाजिक प्रतिष्‍ठा प्राप्‍त करून दिली. श्रीकृष्‍णाचा हाच आदर्श समोर ठेवून तशी कृती करण्‍याची प्रेरणा समाजाला मिळावी; म्‍हणून आपण नरकचतुर्दशी दिवस उत्‍साहाने साजरा करतो.

सांप्रतकाळात आपल्‍या राष्‍ट्रात माता-भगिनींचे अपहरण होत आहे. त्‍यांचे अपहरण करण्‍यामागे आतंकवाद्यांचा हेतू हिंदूंचे संख्‍याबळ न्‍यून व्‍हावे, हाच आहे. श्रीकृष्‍णाप्रमाणे आतंकवाद्यांच्‍या तावडीतून माता-भगिनींची मुक्‍तता करून त्‍यांच्‍या पालनपोषणाचे दायित्‍व आपण स्‍वीकारले पाहिजे. त्‍यांना सामाजिक प्रतिष्‍ठा प्राप्‍त करून दिली पाहिजे. ‘दुष्‍ट पाशवी वृत्तीच्‍या आतंकवाद्यांना कंठस्नान घालून सुष्‍टांनी स्‍वतःचे सामाजिक आणि राष्‍ट्रीय कर्तव्‍य बजावले पाहिजे’, अशी शिकवण देणारा हा दीपोत्‍सवाचा पहिला दिवस आहे.

२. राष्‍ट्राचे धन राष्‍ट्राकडेच ठेवणे आणि प्रामाणिकपणे धन कमावणे, हेच खरे लक्ष्मीपूजन !

दीपावलीचा दुसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा ! राष्‍ट्राचे धन राष्‍ट्राकडेच राहिले पाहिजे, तरच लक्ष्मीपूजन करण्‍यात अर्थ आहे. विदेशी वस्‍तूंची खरेदी केल्‍यावर स्‍वदेशी धन हे विदेशात जाते. त्‍यामुळे आपल्‍या लक्ष्मीमातेचा अवमान होतो. तिची कितीही पूजा केली, तरी ती आपल्‍यावर प्रसन्‍न होत नाही. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी हेच विचार ‘दिवाळीचे लक्ष्मीपूजन’ या कवितेत व्‍यक्‍त केले आहेत. आजच्‍या आधुनिक काळात विदेशातील अनेक गोष्‍टी आज आपल्‍याला सहजतेने उपलब्‍ध आहेत. ‘आपले राष्‍ट्र आर्थिकदृष्‍ट्या संपन्‍न आणि सबळ व्‍हावे’, असे वाटत असेल, तर विदेशी वस्‍तूंची खरेदी करणे, हे राष्‍ट्रासाठी घातक ठरते.

आपल्‍या देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरकरांचा हाच विचार प्रत्‍यक्ष कृतीत आणला आहे. ‘मेक इन इंडिया’ हे उद्दिष्‍ट डोळ्‍यांसमोर ठेवून देशाचा आर्थिक विकास करण्‍यास त्‍यांनी आरंभ केला. भारतीय बनावटीच्‍या निर्मितीला आरंभ करून देशाची अर्थव्‍यवस्‍था सुदृढ आणि सबल बनवण्‍याचा यशस्‍वी प्रयत्न केला आहे. आपल्‍या सर्व बांधवांचे कर्तव्‍य हेच आहे की, आपण कोणतीही विदेशी बनावटीची वस्‍तू खरेदी न करता स्‍वदेशी वस्‍तूंची खरेदी करावी. त्‍यामुळे आपले धन आपल्‍या देशातच राहून देशाची भरभराट होईल. यासाठी स्‍वदेशी वस्‍तूंची खरेदी करणे, हासुद्धा लक्ष्मीपूजनाचा एक भाग आहे.

त्‍याचप्रमाणे वाममार्गाने पैसा मिळवण्‍याचा प्रयत्न, म्‍हणजे लक्ष्मीचा अवमान आहे, हे विसरता कामा नये. लबाडी, लुच्‍चेगिरी हा अधर्मपणा आहे. लक्ष्मी नारायणासह येते. प्रामाणिकपणाला बगल देऊन जर काम केले, धन मिळवले, तर नारायण प्रसन्‍न होत नाहीत. नारायणाने आपल्‍याकडे पाठ फिरवल्‍यावर मिळवलेली संपत्ती ही लक्ष्मी नाही; म्‍हणूनच अप्रामाणिकपणे मिळवलेल्‍या संपत्तीला आपण ‘काळा पैसा’ असे म्‍हणतो. शुद्ध, पवित्र व्‍यवहार करत धन प्राप्‍त करावे. अशा धनाची, म्‍हणजेच लक्ष्मीची पूजा करून नारायणालाही प्रसन्‍न करण्‍याचा सण म्‍हणजे लक्ष्मीपूजन होय.

३. बलीप्रतिपदा म्‍हणजे समाजाला दैवी संस्‍कृतीचे शिक्षण देण्‍याचा दिवस !

‘बली म्‍हणजे आजच्‍या परिभाषेतला बळीराजा नव्‍हे’, हे आपण प्रथम ध्‍यानात घेतले पाहिजे.

आजच्‍या परिभाषेतील बळीराजा हे विशेष नाम नसून विशेषण आहे. येथे ज्‍या बळीराजाचा उल्लेख केला जातो तो हिरण्‍यकश्‍यपूचा मुलगा प्रल्‍हाद, प्रल्‍हादाचा मुलगा विरोचन आणि विरोचनाचा मुलगा बली !

बली हा राजनीतीज्ञ होता. बलीच्‍या जीवनावर आसुरी विचारांचा प्रभाव पडला होता. त्‍याने संकटात सापडलेल्‍या लोकांना साहाय्‍य करून आपल्‍याकडे खेचून घेतले. गुणवान लोकांचा सन्‍मान करून सर्वांना आपलेसे करून घेतले. सातत्‍याने यज्ञ करत त्‍याने ब्रह्मवृंदांना भरपूर दक्षिणा देऊन यज्ञकार्यात अडकवले. समाजाला खर्‍याखुर्‍या ज्ञानाचे मार्गदर्शन करण्‍यासाठी त्‍यांना सवड मिळणार नाही, अशी व्‍यवस्‍था केली. त्‍याचा हा अंतस्‍थ हेतू कुणालाही कळला नाही. सर्व ठिकाणी आसुरी प्रवृत्तीच्‍या लोकांना अधिकार पदे दिली. एवढेच नाही, तर बळीराजाने चातुर्वर्ण्‍यव्‍यवस्‍था भंग केली. त्‍याने शिक्षणव्‍यवस्‍थेचे स्‍वातंत्र्य हिरावून घेत ती राजसत्तेकडे सुपुर्द केली. त्‍यामुळे वेदांचे शिक्षण न देता आसुरी शिक्षण देण्‍याची व्‍यवस्‍था शुक्राचार्यांच्‍या मार्गदर्शनाखाली आरंभली गेली. परिणामी संपूर्ण मानवी समाज बौद्धिकदृष्‍ट्या विकलांग केला. संस्‍कृतीचा विकास खुंटला आणि संस्‍कार न झाल्‍यामुळे मानवी समाज निस्‍तेज झाला. ईश्‍वरावर श्रद्धा निर्माण करण्‍याची परंपरा बळीराजाने नष्‍ट केली. संपूर्ण समाजव्‍यवस्‍था विस्‍कळीत झाल्‍यामुळे तिची पुनर्स्‍थापना करण्‍यासाठी भगवान विष्‍णूने वामन अवतार धारण केला. त्‍यांनी समाजात वैदिक संस्‍कृतीचे पुनरुज्‍जीवन करत चातुर्वर्ण्‍यव्‍यवस्‍था अस्‍तित्‍वात आणली. एक प्रकारे बलीचा कुटील डाव उधळून लावत त्‍याला पाताळात धाडले; म्‍हणून हा उत्‍सव आपण आनंदाने साजरा करायचा ते समाजाला दैवी संस्‍कृतीचे शिक्षण देण्‍यासाठी !

थोडक्‍यात दीपोत्‍सव साजरा करतांना हिंदु संस्‍कृती, धर्म आणि राष्‍ट्र यांची हानी करणार्‍या विचारांना हद्दपार करून हा दीपोत्‍सव साजरा करायचा आहे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक, डोंबिवली. (२.११.२०२३)