सध्याच्या काळात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती भरमसाठ वाढलेली आहे. त्यामध्ये संगणक, भ्रमणसंगणक, दूरदर्शन संच, ध्वनीयंत्रणा यांसह अनेक वस्तू असतात. वेगवेगळी आस्थापने अल्प दर आकारण्याच्या चढाओढीत हलक्या दर्जाच्या वस्तू बाजारात उपलब्ध करतात आणि त्या ‘ऑनलाईन’ घरपोच पाठवल्या जातात. या वस्तू एका वर्षाच्या आत निरुपयोगी ठरतात. त्या दुरुस्त करून वापरणे पण शक्य नसते. त्यामुळे काही घरांत १-२ नादुरुस्त टीव्ही संच, १-२ नादुरुस्त लॅपटॉप, १-२ नादुरुस्त संगणक आणि जुन्या ध्वनीयंत्रणा पडून असतात. ‘वापरा आणि फेकून द्या’, अशा बर्याच चिनी बनावटीच्या वस्तू, म्हणजे विजेरी (टॉर्च) किंवा ‘इमर्जन्सी लाईट’ जवळजवळ प्रत्येक घरात पडून असतात. या वस्तू घरातील जागाही व्यापून टाकतात आणि एक प्रकारचा इ-कचराही निर्माण करतात, ज्याची विल्हेवाट लावणे शक्य होत नाही, ही प्रमुख अडचण आहे.
अशा प्रकारचा ‘इ-कचरा’, त्यांची खोकी, थर्माकोल किंवा जाड प्लास्टिक किंवा वापराविना ठेवलेल्या चपलांचा ढीग आदींमुळे घरात अस्वच्छता निर्माण होते. अशा वस्तूंवर धूळ बसून त्यावर जळमटेही होतात. यामुळे घरातील सात्त्विकता न्यून होऊन घरातील स्पंदने बिघडतात. घरात अस्वच्छता असेल, तर नकारात्मक स्पंदने निर्माण होतात आणि घरात वादविवाद अन् चिडचिडेपणा वाढतो. सध्या अनेक जण वास्तूशास्त्रानुसार घराच्या आतील सजावटीचे काम ‘घरात चांगली स्पंदने निर्माण व्हावीत’, या उद्देशाने करतात. काही जण चिनी ‘फेंगशुई’ हे शास्त्र वापरून घरातील सजावट करतात. घरात अशा अनावश्यक वस्तूंचा कचरा साठून त्यावर धूळ बसून आणि जळमटे होऊन अस्वच्छता झाली, तर हे सारे करून काय उपयोग ? प्रशासनानेही घरोघरच्या या ‘इ-कचर्या’ची समस्या सोडवणे आवश्यक आहे. कलियुगात निर्माण झालेल्या प्लास्टिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू मानवाला वरदानाप्रमाणेच एक प्रकारे शापितही ठरल्या आहेत. त्यांचा अयोग्य वापर केला, तर त्याचे दुष्परिणाम तर होतातच, त्याचप्रमाणे त्या निरुपयोगी ठरल्यावर त्याचा कचराही वाढत जातो. यामध्ये सध्याच्या लोकांची अनावश्यक इ-वस्तू खरेदी करण्याची मानसिकताही कारणीभूत आहे. दिवाळीच्या स्वच्छतेच्या निमित्ताने घरातील हा इ-कचराही टाकणे आवश्यक आहे. या वस्तूंची आस्थापने आणि त्यांचे वितरक यांच्याकडून काही उपाययोजना काढल्या, तर या इ-कचर्यावर जरा तरी बंधने येतील !
– श्री. श्रीराम खेडेकर,
फोंडा, गोवा.