ग्रामपंचायत निवडणुकांमध्‍ये महायुतीची सरशी, ६०० हून अधिक जागांवर भाजपचे उमेदवार विजयी !

लोकांचा कल महायुतीकडे ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

मुंबई – राज्‍यातील एकूण २ सहस्र ३५९ ग्रामपंचायतींच्‍या जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्‍यानंतर ६ नोव्‍हेंबर या दिवशी मतमोजणी झाली. यामध्‍ये जवळपास ६०० हून अधिक जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. राज्‍यात अनेक भागांत ग्रामपंचायत निवडणुकांमध्‍ये महायुतीची सरशी झाली आहे. यावर मुख्‍यमंत्री शिंदे यांनी मतदारांनी महायुतीला मत दिले असून लोकांचा कल महायुतीकडे आहे, असे सांगून मतदारांचे आभार मानले. या निवडणुकीत ३५० हून अधिक जागांवर उपमुख्‍यमंत्री तथा राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गटाने वर्चस्‍व निर्माण केले आहे. तिसरा क्रमांक हा शिंदे गटाचा आहे. त्‍यामुळे राज्‍यातील या रणधुमाळीमध्‍ये महायुतीची सरशी झाल्‍याचे चित्र आहे.

मुख्‍यमंत्री शिंदे म्‍हणाले की, मागील वर्षभरात महाविकास सरकारने थांबवलेली कामे ही महायुतीच्‍या सरकारने पूर्ण केली आहेत. या प्रकल्‍पांना चालना देऊन आम्‍ही राज्‍याच्‍या सर्वांगीण विकासाचे काम केले. खर्‍या अर्थाने ‘शासन आपल्‍या दारी’ पोचले आहे. हे सर्व मतदारांनी त्‍यांच्‍या कृतीमधून दाखवून दिले.