१. प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडिलांना दर्शन होऊन कुटुंबियांच्या साधनेस आरंभ होणे
‘वर्ष १९९५ पासून माझ्या साधनेला आरंभ झाला. वर्ष १९९५ मध्ये माझे वडील (श्री. विश्वनाथ पवार (वय ६५ वर्षे)) इंदूर येथे प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यासाठी गेले होते. तेथे वडिलांना प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. तेव्हा वडिलांना वाटले की, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हेच माझे गुरु आहेत’, अशा रितीने माझे वडील आणि आमचे कुटुंबीय यांच्या साधनेस आरंभ झाला.
२. लहान असतांना केलेल्या सेवा आणि साधना
सामूहिक नामजप करणे, आई-वडील यांच्या समवेत प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा आणि भंडारे यांसाठी जाणे, तेथे चप्पल नीट लावण्याची सेवा करणे, नामपट्ट्यांचा अहवाल सिद्ध करणे, दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, अशा सेवा माझ्याकडून केल्या गेल्या.
३. सेवेतून आनंद अनुभवता येणे
‘स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग घेणे, बालसंस्कार वर्ग घेणे, सनातन आकाशकंदिलांचे वितरण करणे, बाबांसह सभेला जाणे’, अशा सेवा होत होत्या. सुटीच्या दिवशी दूरचित्रवाणी संच (टी.व्ही.) पहाणे किंवा फिरायला जाणे, यापेक्षा सेवेतील आनंद चांगला वाटायचा.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
गुरुदेव त्यांच्या वाहनामधून साधकांना समवेत घेऊन जायचे. त्यांच्याशी प्रेमाने बोलायचे. गुरुदेवांना ‘साधक जीव कि प्राण आहेत’, असे वाटायचे. इतर ठिकाणी असणार्या संप्रदायांमध्ये संकुचितपणा दिसायचा. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) व्यापक वाटायचे.
५. आध्यात्मिक त्रास होतांना साधक कुटुंबियांमुळे साधना करता येणे
महाविद्यालयीन जीवन जगत असतांना मला आध्यात्मिक त्रास होऊ लागला. तेव्हा माझ्यासाठी आध्यात्मिक त्रास हा पूर्णतः नवीन होता. परम पूज्य डॉक्टरांनी सांगितलेले नामजप केल्याने मला या आध्यात्मिक त्रासातून बाहेर पडता आले. यामध्ये माझ्या आई-वडिलांनी आणि भावाने मला समजून घेऊन साधना करण्यासाठी प्रवृत्त केले. असे आई-वडील आणि भाऊ मिळाल्याबद्दल मी देवाच्या चरणी कृतज्ञ आहे.
६. महाविद्यालयीन शिक्षण घेतांना नास्तिक शिक्षकांनी देवतांचे विडंबन केल्यावर त्यांना विरोध करणे
महाविद्यालयीन शिक्षण घेतांना एक शिक्षक त्यांच्या तासिकेला देवतांचे विडंबन करत असतांना मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. ते चुकीचे बोलत असल्याची जाणीव करून देऊनही ते न थांबल्यामुळे त्यांची वरिष्ठांकडे तक्रार केली. तसेच याविषयी जवळपासच्या साधकांनासुद्धा सांगितले. आम्ही सर्वांनी नास्तिक शिक्षकांना भेटून त्यांना ‘देवतांचे विडंबन का करू नये ?’, हे समजावून सांगितले. त्यामुळे त्यांनी क्षमा मागितली आणि त्यानंतर त्यांनी साधनेला आरंभ केला. हे सर्व दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आले. तो अंकही त्या शिक्षकांना दिला. माझा स्वभाव भिडस्त असूनही गुरुदेवांनी हे सर्व प्रयत्न माझ्याकडून करून घेतले. मला खाऊ (प्रसाद) आणि लेखणी दिली. तसेच ‘आज मी दैनिक ‘सनातन प्रभात’ काढल्याचे सार्थक झाले’’, असे उद़्गार काढले.
७. लग्नासाठी स्थळ म्हणून आलेल्या मुलांच्या नातेवाइकांना लग्नानंतर साधनाच करणार असल्याचे ठामपणे सांगणे
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी आश्रमात सेवा केली. समाजातील मुलाच्या समवेत लग्न केल्यास मी साधना करू शकणार नाही; म्हणून येणार्या स्थळांना ‘मी सनातन संस्थेच्या अंतर्गत साधना करते. तुम्हाला मान्य असेल, तरच पुढे जाऊ’, असे स्पष्टपणे सांगायचे. नातेवाइकांकडून या गोष्टीला विरोध व्हायचा. त्यानंतर मी सनातन संस्थेतील साधकाशी लग्न केले.
८. लग्नामध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या छायाचित्राच्या ठिकाणी सूक्ष्मातून ते प्रकाशाच्या स्वरूपात उपस्थित आहेत’, अशी अनुभूती येणे
‘लग्नामध्ये गुरुदेव उपस्थित रहावेत’, अशी आम्हा दोघांची पुष्कळ इच्छा होती; म्हणून आम्ही गुरुदेवांचे छायाचित्र खुर्चीवर ठेवून त्यांचे आशीर्वाद घेऊन लग्नविधी पूर्ण केले. लग्नातील छायाचित्रांमध्ये आमच्या मागील बाजूस ठेवलेले गुरुदेवांचे छायाचित्र अदृश्य होऊन गुरुदेव प्रकाशाच्या स्वरूपात सूक्ष्मातून लग्नात उपस्थित आहेत आणि आशीर्वाद देत आहेत’, अशी अनुभूती आली.
९. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या छायचित्रासमोर बसून त्यांना सर्व चांगल्या-वाईट प्रसंगांचे आत्मनिवेदन करणे
लग्नानंतर मी गोव्यात वास्तव्याला असतांना आम्ही दोघेही आम्हाला होणारे त्रास, चांगले अनुभव, सर्व आजारपण आणि एकमेकांविषयीच्या तक्रारी वेळोवेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या छायचित्रासमोर बसून आत्मनिवेदन करायचो. त्यामुळे आम्हाला त्यांचा पुष्कळ आधार वाटतो.
१०. लग्नानंतर फिरायला गेल्यावर संतभेटीतील आनंद अनुभवता येणे
लग्नानंतर सर्व जण फिरायला जातात. आम्ही प.पू. दास महाराज, प.पू. परूळेकर बाबा, प.पू. राऊळ महाराज यांच्या भेटीला गेलो. त्या वेळी आम्हाला फिरण्यातील सुखापेक्षा संतभेटीतील आनंद अनुभवण्यास मिळाला.
११. नोकरी सोडून पूर्ण वेळ साधना करणे
श्री देव हालसिद्धनाथांच्या कार्यक्रमामध्ये गुरुदेवांचे दर्शन झाले. गुरुदेवांना पाहून त्यांच्यापासून पुष्कळ दूर गेल्यामुळे आम्हा दोघांना वाईट वाटून रडू आले. त्यानंतर काही कालावधीत यजमानांनी पहिली नोकरी सोडली. नंतर ते आणि मी फोंड्यामध्ये राहू लागलो. मी माझी नोकरी सोडून आश्रमात सेवेला येऊ लागले. काही काळाने यजमानांनाही ‘पूर्णवेळ साधना करावी’, असे वाटले आणि तेसुद्धा पूर्णवेळ साधना करू लागले. आम्ही दोघांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवली. समाजात पैसे कमवायची चटक लागल्यावर आश्रमजीवन जगणे कठीण होते; परंतु गुरुदेवांनी आम्हाला पुन्हा आश्रमात येण्याची बुद्धी आणि शक्ती दिली, याबद्दल आम्ही त्यांच्या चरणी कृतज्ञ आहोत.
१२. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना शिकायला मिळालेली सूत्रे
प्रक्रिया राबवतांना ‘आज्ञापालन’, हा गुण वाढवायला पाहिजे’, हे शिकायला मिळाले. आपण स्वभावदोषांच्या आधीन झालो, तर या प्रक्रियेमध्ये शिकता येत नाही. मनमोकळेपणाने बोलण्यामुळे स्वतःला आध्यात्मिक लाभ होतात आणि मन हलके होते. ‘देवाला साधनेचा आढावा देत आहे’, असा भाव ठेवल्यास देव प्रयत्न करून घेतो’, असे प्रयत्न केल्यावर व्यष्टी आढावा हवाहवासा वाटू लागला. सर्व प्रयत्न देव करून घेत होता. आढाव्यात वेळोवेळी आज्ञापालन केले. जे प्रयत्न सांगितले जायचे, ते प्रयत्न त्या वेळी केल्यावर लाभ झाला.
१३. पती-पत्नी यांनी एकमेकांना समजून घेतल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कौतुक करणे
आम्ही दोघांनी ‘एकमेकांना समजून घ्यायचे आणि व्यावहारिक प्रसंगात न अडकता आध्यात्मिक जीवन जगायचे’, असे ठरवले. एकदा आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा ते आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही खरे नवरा-बायको आहात !’’ देवा, असे साथ देणारे पती तू मला दिल्याबद्दल मी तुझ्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे.
१४. ‘आता गुरुदेवच सर्वांची काळजी घेत आहेत’, या विचारांमुळे पूर्वी वाटणारी कुटुंबियांची काळजी न्यून होणे
पूर्वी आई, वडील आणि भाऊ यांची मला पुष्कळ काळजी वाटायची. त्यामुळे मी २ मासांनी घरी जात असे. आता ‘सर्वांचीच काळजी गुरुदेव घेत आहेत’, याची जाणीव होऊन गुरुदेवांनाच सर्व सांगितले जाते; म्हणून काळजीचे विचार आल्यावर लगेच गुरुदेवांचा चेहरा दिसतो आणि मनपटलावरून सर्व विचार पुसले जातात.
१५. त्रासदायक सूक्ष्म शक्तींच्या सूक्ष्म चित्र साठ्याची सेवा करतांना गुरुदेवांना प्रार्थना केल्यामुळे त्रास न जाणवता विविध अनुभूती येणे
केवळ गुरुदेवांच्या कृपेने मला सूक्ष्म चित्र साठ्याची सेवा करतांना त्रासदायक सूक्ष्म शक्तींची चित्रे पहातांना त्रास होत नाही. गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर ‘गुरुदेवांकडून चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवते. त्यामुळे सेवा करतांना त्रास न होता उत्साह वाढतो. ‘ती सेवा करत रहावी’, असे मला वाटते. काही वेळा ‘माझ्या अंगावर थंड पाण्याचे थेंब पडत आहेत आणि माझे संपूर्ण शरीर हलके होऊन मी हवेत तरंगत आहे’, असे जाणवते.
चांगल्या शक्तींची सूक्ष्म चित्रे पहातांना आनंद, शांती आणि निर्विचार अवस्था’, या अनुभूती येतात. कधी कधी सेवा करतांना हाताच्या बोटांची नखे आणि तळहात गुलाबी होतात. माझ्या उजव्या हातावर दोन ठिकाणी ॐ उमटला आहे.
१६. सेवा करतांना त्रास होतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे विस्मरण होत असतांना ‘पाण्याविना मासोळी’, अशी अवस्था होणे
एकदा सेवा करतांना अचानक त्रास होऊन चार ते पाच दिवस गुरुदेवांचे स्मरण होत नव्हते. ‘मला असे का होत आहे ?’, हे कळत नव्हते. त्यावर उपाय आणि नामजप केले, तरीही काही काळ स्मरण राहून नंतर विसर पडायचा. त्या वेळी मला गुरुदेवांचे स्मरण होत नसल्याने पुष्कळ अस्वस्थ वाटत होते. त्या वेळी माझी ‘पाण्याविना मासोळी’, अशी अवस्था झाली. कालांतराने भाववृद्धीसाठी प्रयोग, नामजपादी उपाय आणि आवरण काढणे’, असे प्रयत्न केल्यावर पूर्वीसारखे गुरुदेवांचे स्मरण होऊ लागले. ‘माझ्या आयुष्यात प.पू. डॉक्टर नसतील, तर काय अवस्था होते ?’, हे मला अनुभवता आले.
‘गुरुदेव, या अनुभूती तुम्हीच दिल्या आहेत आणि तुम्हीच माझ्याकडून लिहूनही घेतल्यात. ‘मी पुष्कळ अल्प पडते. तुम्हीच हा भवसागर पार करून द्या’, ही आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |