एका सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना मार्गदर्शन करून त्यांच्या साधनेतील शंकाचे निरसन केले, त्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे देत आहोत.
१. वाईट शक्तीच्या त्रासामुळे मनात नकारात्मक विचार येत असतील, तर नामजप करावा !
कु. मिल्की अग्रवाल : कधी कधी माझ्या मनात स्वतःविषयी नकारात्मक विचार येतात, ‘माझ्याकडून काहीच होणार नाही. माझ्यातील स्वभावदोष आणि अहं जाणारच नाहीत.’ माझ्या मनात हे विचार पुष्कळ तीव्रतेने येतात. कधी कधी तर मला रडायलाही येते. मला त्याचा पुष्कळ ताण येतो. याविषयी मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याशीही बोलले, तरीही कधी कधी माझ्या मनात हे विचार पुष्कळ तीव्रतेने येतात. ‘हा माझा विचार आहे कि वाईट शक्तीचा आहे ?’, हे माझ्या लक्षात येत नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्हाला वाईट शक्तीचा त्रास आहे का ?
कु. मिल्की अगरवाल : मध्यम त्रास आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : वाईट शक्तीचा त्रास असेल, तर ‘नामजप करणे’, हाच त्यावरील उपाय आहे; तरच वाईट शक्तीचा जोर न्यून होत जाईल. नंतर असे विचार येणे बंद होईल.
२. मनात अयोग्य विचार आल्यानंतर ‘इ २ (क)’ या स्वयंसूचना पद्धतीनुसार स्वतःला अनेक वेळा चिमटा काढल्यामुळे मनात विचार येणे न्यून होते !
परात्पर गुरु डॉ. आठवले : हा आपल्या मनाचा, म्हणजे मानसिक स्तरावरचा (सायकोलॉजिकल लेव्हलवरचा) त्रास असेल, तर मनात येणारा तो विचार सारणीत लिहावा. हे विचार न्यून होण्यासाठी ‘इ २ (क)’ (टीप) ही स्वयंसूचना पद्धत आहे. त्वरित परिणाम साधण्यासाठी स्वतःला चिमटा काढावा (पिंचिंग).
टीप – स्वयंसूचना पद्धत ‘इ २ (क)’ : स्वभावदोष व्यक्त झाल्यावर स्वतःला शिक्षा करणे. यामुळे मनाला अयोग्य विचाराची जाणीव होईल आणि हळूहळू मनात अयोग्य विचार येणे न्यून होत जाईल.
कु. मिल्की अग्रवाल : त्या वेळी तो विचार एवढा प्रबळ असतो की, मला वाटते, ‘हेच योग्य आहे. असेच होईल.’
परात्पर गुरु डॉ. आठवले : जेव्हा असे विचार मनात येतील, तेव्हा ते जाण्यासाठी चिमटा काढला, तर वेदना होतील. त्यामुळे तो विचार दुसर्यांदा मनात येणारच नाही.