छत्रपती संभाजीनगर येथे बागेश्‍वर धामचे धीरेंद्र शास्‍त्री महाराज यांचे मिरवणुकीद्वारे भव्‍य स्‍वागत !

भाविकांकडून ‘जय श्रीराम, हर हर महादेव’च्‍या घोषणा !

बागेश्‍वर धामचे धीरेंद्र शास्‍त्री महाराज यांचे भव्‍य स्‍वागत करतांना भाविक

छत्रपती संभाजीनगर – ‘हर हर महादेव’ आणि ‘जय श्रीराम’चा जयघोष अन् ढोल-ताशांच्‍या गजरात बागेश्‍वर धामचे धीरेंद्र शास्‍त्री महाराज यांचे ५ नोव्‍हेंबर या दिवशी येथील चिकलठाणा विमानतळावर भव्‍य स्‍वागत करण्‍यात आले. रामकथा प्रवचनानिमित्त धीरेंद्र शास्‍त्री महाराज प्रथमच शहरात आले असून महाराष्‍ट्रात प्रवचनासाठी येण्‍याची त्‍यांची ही तिसरी वेळ आहे. विशेष म्‍हणजे त्‍यांच्‍या स्‍वागतासाठी सहस्रों लोक अडीच घंटे विमानतळावर थांबले होते. (असे राजकीय नेत्‍यांच्‍या स्‍वागतासाठी सहस्रों लोक कधी थांबतात का ? – संपादक)

रात्री ८.४५ वाजता बागेश्‍वरबाबांचे आगमन झाले. विमानतळ ते सिडको बसस्‍थानक चौकापर्यंत धीरेंद्र शास्‍त्री महाराज यांची उत्‍साही वातावरणात भव्‍य मिरवणूक काढण्‍यात आली. धीरेंद्र शास्‍त्री महाराज यांच्‍या स्‍वागतासाठी आलेल्‍या अनेक स्‍त्री पुरुष भक्‍तांनी कपाळावर ‘जय श्रीराम’ गोंदवून घेतले होते. या वेळी सहकारमंत्री अतुल सावे, भाजप प्रदेश सरचिटणीस संजय केणेेकर, बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे पदाधिकारी उपस्‍थित होते.

विमानतळावर बजरंग दलाचे प्रमुख हर्षवर्धन केणेकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली ५०० हून अधिक तरुणांची फौजही उपस्‍थित होती. तरुण मोठ्या संख्‍येने भ्रमणभाषवर ध्‍वनीचित्रीकरण करत होते. धीरेंद्र शास्‍त्री यांना पहाण्‍यासाठी पुढे जात असतांना बॅरिकेड्‍सवर अनेक तरुण उभे राहिले.