तेल अविव (इस्रायल) – इस्रायलने ४ नोव्हेंबरच्या रात्री सेंट्रल गाझामधील माघाझी निर्वासित छावणीवर केलेल्या हवाई आक्रमणामध्ये अनुमाने ५१ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. यांमध्ये सर्वाधिक महिला आणि मुले यांचा समावेश आहे.
गाझामधील हमास संचालित आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या काही दिवसांत इस्रायलकडून झालेल्या आक्रमणात किमान २३१ लोक मारले गेले आहेत. यामुळे युद्धातील एकूण मृतांची संख्या ९ सहस्र ४८८ झाली आहे. मृतांमध्ये ३ सहस्र ९०० मुले असून १ सहस्र ५०९ महिलांचा समावेश आहे. २४ सहस्रांहून अधिक लोक घायाळ झाले आहेत. वेस्ट बँक प्रदेशात १४० जण ठार झाले आहेत.
हमासचा गाझा प्रमुख याह्या सिनवार याच्यापर्यंत पोचू ! – इस्रायल
७ ऑक्टोबरच्या आक्रमणासाठी हमास उत्तरदायी असल्याने आम्ही हमासच्या नेतृत्वापर्यंत पोचू. आम्ही हमासचा गाझा प्रमुख याह्या सिनवारपर्यंत पोचून त्याला संपवू. जेव्हा हे युद्ध संपेल, तेव्हा गाझामध्ये हमास रहणार नाही. गाझापासून इस्रायलला कोणताही धोका रहाणार नाही. तिथे आमच्या विरोधात कुणी डोके वर काढले, तर आम्ही आमच्या मर्जीनुसार कारवाई करू.
६० हून अधिक ओलीस बेपत्ता झाल्याचा हमासचा दावा
गाझावरील इस्रायलच्या आक्रमणांमुळे ६० हून अधिक ओलीस बेपत्ता असल्याचा दावा हमासने केला आहे. इझ अल-दीन अल-कासम ब्रिगेड्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, गाझा विरुद्धच्या सततच्या अमानुष आक्रमणामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत (ओलिसांपर्यंत) कधीही पोचू शकणार नाही. (याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! – संपादक)
इस्रायलच्या विरोधात उठावाची मागणी
४ नोव्हेंबर या दिवशी व्हाईट हाऊसजवळील फ्रीडम प्लाझा येथे सुमारे १० सहस्र पॅलेस्टिनी समर्थकांनी निदर्शने केली. आंदोलक पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यासाठी घोषणाबाजी करतांना दिसले. या वेळी काही लोकांनी इस्रायलच्या विरोधात उठावाची मागणीही केली.
संपादकीय भूमिकाइस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल आक्रमणात गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत असतांनाही हमासकडून २४० ओलिसांची सुटका करण्यात येत नाही. यावरून हमासला जगाच्या पटलावर इस्रायलला ‘अमानुष’ ठरवायचे आहे, असेच लक्षात येते. तो यात यशस्वीही ठरत आहे, असेच चित्र निर्माण होत आहे ! |